School Holiday: मतदान केंद्र असलेल्या पालिकेच्या शाळांना उद्या सुट्टी, तर शिक्षण आयुक्त म्हणतात उद्या शाळा सुरु राहणार
Saam TV November 18, 2024 04:45 PM

विधानसभा निवडणुकीसाठी काही तास उरलेले असतानाच राज्यात अनेक राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मतदानाच्या दोन दिवस आधी शाळांना सुट्ट्या देण्यावरुन गोंधळ उडालेला असताना आता आणखी एका पत्रकामुळे संभ्रम वाढला आहे. सर्व शिक्षकांची निवडणूक कामासाठी नियुक्ती झाली असल्यास नजीकच्या शाळेतील शिक्षकांची नियुक्ती करुन १८ आणि १९ नोव्हेंबरला या शाळा सुरु ठेवाव्यात, अशी सुधारित सूचना शिक्षण आयुक्तालयाने जारी केली आहे. प्रत्यक्षात मतदान केंद्र असणाऱ्या मुंबई पालिकेच्या शाळांना मात्र 19 नोव्हेंबरला सुट्टी असेल. एका प्रतिष्ठीत माध्यमाशी संवाद साधताना भूषण गगराणी यांनी यासंदर्भातील माहिती दिली.

राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळा 18- 19 नोव्हेंबर रोजी सुरू राहणार असून, मुख्याध्यापकांच्या मदतीनं याचं नियोजन गटशिक्षणअधिकाऱ्यांनी करावं असं आयुक्तालयानं स्पष्ट केलं आहे. दरम्यान, प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कागदपत्र आणि मतदान यंत्र जमा करेपर्यंतच्या एकूण कामासाठी साधारण 40 ते 45 तासांचा कालावधी जातो.

आयुक्तालयाने दुसरे पत्र जारी करत ज्या शाळेतील सर्व निवडणूक कामात व्यग्र असतील, अशाच शाळांसाठी ही सूचना असून इतर शाळा सुरुच राहतील, असे स्पष्ट केले होते. मात्र, तिसऱ्या पत्रकाने नवा गोंधळ उडाला आहे. धर्तीवर राज्यातील शाळांच्या व्यवस्थापनासंदर्भात आता नव्या पत्रकानं नवा संभ्रम निर्माण केल्याचं पाहायला मिळत आहे.

मतदानानंतर कागदपत्रे व मतदान यंत्रे जमा करेंपर्यंत कर्मचाऱ्यांना नेमून दिलेले ठिकाण सोडता येणार नाही. हे सर्व सुमारे ४० ते ४५ तास सलग करावे लागणार आहे. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना घरी जायला रात्रीचे २ वाजतील, तर काहींना गावातच देखील थांबावे लागेल, असा परिस्थितीत सकाळी शाळेत उपस्थित राहणे अशक्य असल्याने २१ तारखेचा दिवस कर्तव्याचा समजून शिक्षकांना सुट्टी देण्यात यावी, अशी मागणी शाळा आणि शिक्षकांनी केली आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.