अमेरिकेनी युक्रेनला पुरवलेल्या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा रशियाविरोधात वापर करण्याची परवानगी अमेरिकेनी युक्रेनला दिली आहे.
अमेरिकेच्या एका अधिकाऱ्याने बीबीसीला याबाबत माहिती दिली.
मागील अनेक महिन्यांपासून युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की एटीएसीएमएस (ATACMS) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्षेपणास्त्रांवरील निर्बंध हटवण्याचा आग्रह करत होते. युक्रेनला या क्षेपणास्त्रांचा वापर रशियावर हल्ला करण्यासाठी करायचा आहे.
याबाबतच्या वृत्तांवर बोलताना रविवारी झेलेन्स्की म्हणाले की, अशा गोष्टी जाहीर केल्या जात नाहीत. क्षेपणास्त्रे यांचं उत्तर स्वतः देतात.
दरम्यान, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पाश्चिमात्य देशांना असा निर्णय घेण्याबाबत इशारा दिला होता. असं काही झालं तर हा नाटो सैन्याचा थेट सहभाग मानला जाईल असं पुतिन यांनी म्हटलं होतं.
अमेरिकेने युक्रेनला क्षेपणास्त्रांच्या वापराला परवागनी दिल्याच्या वृत्तांवर पुतिन यांनी अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र रशियाच्या इतर नेत्यांनी या निर्णयाला गंभीर म्हटलं आहे.
असं असलं तरी अमेरिकेने युक्रेनला लांब पल्ल्याची क्षेपणास्त्र वापरण्याची परवानगी केवळ कुर्स्क प्रदेशासाठी दिली आहे. याच भागात रशियाने ऑगस्टमध्ये घुसखोरी केली होती. त्यामुळे या भागात युक्रेनच्या सैन्याला ही क्षेपणास्त्रे वापरता येतील.
EPA मागील अनेक महिन्यांपासून वोलोदिमीर झेलेन्स्की एटीएसीएमएस क्षेपणास्त्रांवरील निर्बंध हटवण्याचा आग्रह करत होते.भविष्यात रशिया आणि युक्रेनमध्ये होणाऱ्या संभाव्य वाटाघाटीत उपयोग व्हावा म्हणून बायडन सरकारने युक्रेनला रशियाच्या काही भागावरील ताबा कायम ठेवण्यासाठी मदत करण्याचंही आश्वासन दिलंय.
बायडन यांनी युक्रेनसाठी खूप महत्त्वाचा निर्णय घेतला आहे, अशी प्रतिक्रिया कीवमधील युक्रेनियन सेक्युरिटी अँड कोऑपरेशन सेंटरचे प्रमुख सेर्ही कुझान यांनी बीबीसीला दिली.
"यामुळे युद्धाची दिशाच बदलेल असं नाही. मात्र, यामुळे युक्रेनचे सैन्य रशियाच्या बरोबरीचे होईल," असं सेर्ही कुझान यांनी म्हटलं.
BBC BBCअमेरिकेने युक्रेनला दिलेले एटीएसीएमएस क्षेपणास्त्रे 300 किलोमीटरपर्यंत हल्ला करू शकतात.
एका अमेरिकेच्या अधिकाऱ्याने न्यूयॉर्क टाईम्स आणि वॉशिंग्टन पोस्टला सांगितले आहे की, बायडन सरकारने युक्रेनला लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे वापरण्याची परवानगी देण्याचा निर्णय हा उत्तर कोरियाच्या सैनिकांना युक्रेनमध्ये लढण्याची परवानगी देण्याच्या रशियाच्या निर्णयाला दिलेली प्रतिक्रिया आहे.
सेर्ही कुझान म्हणाले की, रशियाच्या कुर्स्क भागातून युक्रेनियन सैन्याला हुसकावण्यासाठी रशिया आणि कोरियाच्या सैन्याकडून होणाऱ्या अपेक्षित हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर बायडन यांनी हा निर्णय घेतला आहे. काही दिवसांमध्ये रशिया आणि कोरियाकडून या भागात मोठे हल्ले अपेक्षित आहेत.
कुर्स्कमध्ये 11,000 उत्तर कोरियाचे सैनिक असल्याचा अंदाज युक्रेनने व्यक्त केला होता.
बायडन यांच्या या निर्णयामुळे आता अखेर ब्रिटन आणि फ्रान्सचाही युक्रेनला लांब पल्ल्याचे स्टॉर्म शॅडो क्षेपणास्त्रे वापरण्याची परवानगी देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. युक्रेनकडून या क्षेपणास्त्रांचा वापर रशियाच्या अंतर्गत भागात हल्ल्यासाठी होऊ शकतो.
असं असलं तरी बायडन यांच्या या निर्णयावर यूके आणि फ्रान्सने अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)