सर्वाधिक उमेदवारांच्या लढतीत उत्तर नागपूरचा गड कोण राखणार; प्रस्थापितांच्या विजयाचे 'उत्तर' अपक्ष बिघडवणार?
एबीपी माझा वेब टीम November 18, 2024 06:13 PM

Nagpur North Vidhan Sabha constituency Election 2024 Result : विधानसभा निवडणुकीची (Vidhan Sabha Election 2024) रणधुमाळी चांगलीच रंगली आहे. सत्तेत येण्यासाठी राज्यातील सर्वच पक्ष ताकदीने प्रयत्न करत आहेत. दरम्यान, या निवडणुकीत अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या उत्तर नागपूर विधानसभा (Nagpur North Vidhan Sabha) मतदारसंघात नेमकं कोण बाजी मारणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. कारण नागपुरातील 12 मतदारसंघापैकी या मतदारसंघात सर्वाधिक म्हणजेच 26 उमेदवार निवडणुकांच्या रिंगणात आहे, ज्यातील सुमारे 11 अपक्ष उमेदवारांनी शड्डू ठोकला आहेत. त्यामुळे एकंदरीत उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार आणि लहान पक्षाच्या उमेदवारांनी मोठ्या पक्षांची चिंता वाढवली असल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे बौद्ध आणि मुस्लीम मतांच्या विभाजनाचा फटका प्रमुख उमेदवारांना बसून प्रस्थापितांमध्येही काटेची टक्कर होण्याची शक्यता आहे. 

डॉ. नितीन राऊत विरुद्ध डॉ. मिलींद माने यांच्यात थेट लढत 

दरम्यान, उत्तर नागपूर मतदारसंघातून माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. नितीन राऊत (Dr Nitin Raut) यांच्याविरोधात भाजपने पुन्हा एकदा डॉ. मिलींद माने (Dr Milind Mane) यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. डॉ. माने यांनी 2014 मध्ये नितीन राऊत यांचा पराभव केला होता. तर 2019 मध्ये डॉ. राऊत (Dr Nitin Raut) यांनी डॉ. मानेंना पराभूत करून आपला पराभवाचा वचपा काढला होता. आळीपाळीच्या या खेळी नंतर तिसऱ्यांदा भाजप आणि काँग्रेसच्या या दोघा दिग्गजांमध्ये ही लढत रंगणार आहे. त्यामुळे उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघात महायुती की मविआ, या पैकी कोण बाजी मारणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.   

अनुसूचित जातीच्या मतांचे विभाजन झाले तर.... 

उत्तर नागपूर हा एकेकाळी रिपब्लिकन पक्षाचा गड होता. आंबेडकरी विचारधारेला मानणारा मोठा वर्ग या मतदारसंघात आहे. मात्र विद्यमान आमदार डॉ. नितीन राऊत यांनी १९९९ पासून चार वेळा उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला. तर 2014 मध्ये भाजपच्या डॉ. मिलिंद माने यांनी डॉ. नितीन राऊतांचा पराभव करत हा विजयी अश्व रोखून धरला. यावेळी अनुसूचित जातीच्या मतांचे विभाजन होऊन यावेळी काँग्रेसला फटका बसल्याने भाजपच्या डॉ. मानेंचा विजयाचा मार्ग सुकर झाला होता. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत अनुसूचित जातीच्या मतांचे विभाजन झाले तरच भाजपसाठी संधी निर्माण होऊ शकते, हे स्पष्ट आहे. हे समीकरण बघता डॉ. मानेंच्या विजयासाठी भाजप धुरीण काय डावपेच आखतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे, बसपचे बुद्धम राऊत आणि अपक्षांची भूमिका या निवडणुकीत महत्वाची ठरणार आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.