सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
जयदीप भगत, बारामती November 18, 2024 08:13 PM

पुणे : बारामती विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचे राज्याचं लक्ष लागलं असून देशातील बड्या नेत्यांचीही नजर येथील मतदारसंघात आहे. यंदा प्रथमच येथील मतदारसंघात पवार विरुद्ध पवार असा सामना रंगला असून काका विरुद्ध पुतण्या अशीच लढाई येथे आहे. त्यामुळेच, पवार कुटुंबीय देखील बारामतीमधील शेवटच्या प्रचारसभेत सक्रीय सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे. युगेंद्र पवार यांच्यासाठी शरद पवारांची (Sharad pawar) जाहीर सभा बारामती मतदारसंघात होत असून अजित पवार यांचीही सभा येथे होत आहे. त्यामुळेच, दोन्ही पवारांचे कुटुंब सभेच्यास्थळी दिसत असून शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार यांचा एका फोटो व्हायरल झाला आहे. त्यामध्ये, हाती फलक घेऊन त्यांनी शरद पवारांचं समर्थन केल्याचं पाहायला मिळालं. तर, अजित पवारांच्या (Ajit pawar) सभेसाठी त्यांच्या आई देखील सभेला उपस्थित आहेत. यंदा विधानसभा निवडणुकीसाठी मी 8 व्या वेळेला उभा आहे, ज्यांनी सभेचे नियोजन केलं त्यांचा अंदाज चुकला आहे. 1999 ला निवडणुकीमध्ये काय होतंय, काय नाही असे वाटत होतं. पण, 50 हजारांनी मला निवडून दिलं, असा इतिहास अजित पवारांनी बारामतीमधील सभेत म्हटलं. 

माझ्यावर फक्त बारामतीची जबाबदारी नाही, माझ्यावर एका पक्षाची जबाबदारी आहे, महायुतीमधील एका घटक पक्षाचा प्रमुख म्हणून माझ्यावर जबाबदारी आहे. मी बारामतीमतदारसंघातील अनेक गावात सकाळी जायचो, माझ्या भगिनीही तेव्हा सकाळ सकाळ मला भेटायच्या, त्यांच्या अडचणी सांगायच्या, असे म्हणत अजित पवारांनी बारामतीसाठी केलेल्या प्रचाराची आठवण करुन दिली. साहेबांनी 1990/91 ला मला संधी दिली. साहेबांनी मला प्रतिनिधित्व दिल्यानंतर आपण कमी केले तर बारामतीकर बिनपाण्याने करतील, साहेबांनी एवढं काम केलं मला जमेल का याची धाकधूक होती. तेव्हापासून लवकर उठायची सवय लागली, तेव्ह पासून फक्त विकास विकास हेच केलंय. एका झटक्यात काम होतात, तहान लागायच्या आधी पाणी देतात म्हणून किंमत राहत नाही, असा मिश्कील टोलाही अजित पवारांनी लगावला. तसेच भावनिकतेच्या मुद्द्यावरुन मतदारांना आवाहन करत अजिबात भावनिक होऊ नका, असेही अजित पवार यांनी म्हटले. 

भावनिक आणि मिश्कील टोला

अजित पवारांनी बारामतीमधील जाहीर सभेत कधी भावनिक तर कधी मिश्कील फटकेबाजी केली. टेक्स्टाईल पार्कमधील प्रतिभा पवार यांच्याबाबत घडलेल्या प्रकारावरही अजित पवारांनी भाष्य केलं. तसेच लोकसभा निवडणुकीची आठवण काढताना म्हटले की, मी मागे एकटा पडलो होतो, यावेळी माझी आई माझ्यासोबत आहे. माझ्या बहिणी माझ्यासाठी फिरत आहेत. माझ्या पोटच्या पोरांनी तर माझ्यासाठी फिरलंच पाहिलं. माझी बायकोही फिरतेय, तिने तर माझ्यासोबत असलंच पाहिजे. कारण, लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही त्यांना राज्यसभा दिलीय, असा भावनिक आणि मिश्कील टोलाही अजित पवारांनी लगावला.  

दरम्यान, आपल्या ग्रामीण भागात बस स्थानक चांगले आहे, इतकं भोरच वाईट आहे. महिलांना विकास दाखवल्यावर एक महिला म्हणाली बाई मला माहीतच नव्हतं. काम करण्याची हिंमत आणि धमक आपल्यात आहे. अजून काही करायचं बाकी आहे, त्यासाठी तुम्हाला 20 तारखेला घड्याळाचे बटन दाबावे लागेल. घड्याळाचा बटन दाबले की तुमचं काम झालं, असंही अजित पवारांनी म्हटलं. 

प्रतिभा पवारांच्या हातातील फोटोने लक्ष वेधले

बारामतीच्या निवडणुकीत कधी नव्हे ते शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार चर्चेत आल्या आहेत. आधी अजितदादांनी त्यांची जाहीर तक्रार केली. प्रतिभाकाकी या आधी कधी कुणाच्या प्रचारात आल्या नाहीत. आता नातवाचा इतका पुळका का आलाय असा प्रश्न मी त्यांना विचारणार असल्याचं अजित पवार म्हणाले. तर बारामती टेक्स्टाईल पार्कच्या गेटवर प्रतिभा पवारांना अडवण्यात आल्याची घटनाही घडली. त्यानंतर आता प्रतिभा पवार यांनी शरद पवारांच्या बारामतीच्या शेवटच्या सभेत हजेरी लावली. नुसताच त्या ठिकाणी हजेरी लावली नाही तर त्यांनी युगेंद्र पवार यांना आशीर्वाद दिला. यावेळी, त्यांच्या हातातील फलकाने सर्वांचे लक्ष वेधले, त्यामध्ये लिहिले होते, जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडंच चांगभलं हुतंय... असा आशय लिहिला होता. त्यामुळे, हा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. 

''आपल्या राजाच्या वडिलांच्या नावाची बदनामी नको; शहाजी नाव काढून खोके पाटील ठेवा, कोर्टात जावा''

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.