जखमी अण्णांना दुसऱ्या वाहनातून पत्नी आणि कार्यकर्त्यांनी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. अण्णाच्या उजव्या हातावर धारदार चाकूने खोल जखम झाली आहे.
गुहागर : वंचित आघाडीचे (Vanchit Bahujan Aaghadi) उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष विकास ऊर्फ अण्णा जाधव यांच्यावर तालुक्यातील नरवण येथील सावली हॉटेलजवळ काल दुपारी प्राणघातक हल्ला झाला. जखमी जाधव यांच्यावर गुहागर येथील ग्रामीण रुग्णालयात (Guhagar Rural Hospital) उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. या घटनेमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी तातडीने गुहागरमध्ये दाखल झाले आहेत.उत्तर रत्नागिरी (North Ratnagiri) जिल्हाध्यक्ष अण्णा जाधव पत्नी आणि कार्यकर्त्यांसह दोडवलीत चालले होते. काल दुपारी नरवण येथील सावली हॉटेलमध्ये जेवण्यास ते थांबले होते. अण्णांना दूरध्वनी आला म्हणून ते हॉटेलबाहेर आपल्या मोटारीजवळ येऊन भ्रमणध्वनीवरून संभाषण करत होते.
त्याचवेळी दुचाकीवरून आलेल्या तिघांशी त्यांची मिनिटभर चर्चा झाली. तिथे असलेल्या एकाने अण्णांच्या मोटारीवर दगड मारला आणि अण्णांवर चाकूने हल्ला केला. मानेवर होणारा वार अण्णांनी उजव्या हाताने अडवला आणि ओरडा करण्यास सुरुवात केली. त्यामुळे हॉटेलमध्ये बसलेली त्यांची पत्नी आणि कार्यकर्ते अण्णांच्या दिशेने धावले. हे पाहताच हल्लेखोरांपैकी एकाने पिस्तूल काढले. परंतु, ते न चालवताच आलेल्या दुचाकीस्वारांनी तेथून पलायन केले. अण्णांच्या दोन कार्यकर्त्यांनी दगड घेऊन दुचाकीने पळालेल्या हल्लेखोरांचा पाठलाग केला. मात्र, ते पसार झाले.
जखमी अण्णांना दुसऱ्या वाहनातून पत्नी आणि कार्यकर्त्यांनी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. अण्णाच्या उजव्या हातावर धारदार चाकूने खोल जखम झाली आहे. या प्राणघातक हल्ल्यामुळे अण्णांसह त्यांचे कुटुंबीय आणि त्यांच्यासोबत असलेले कार्यकर्ते तणावाखाली आहेत. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक सचिन सावंत यांनी ग्रामीण रुग्णालयात अण्णांची भेट घेतली. निवडणूक असल्यामुळे वातावरण तंग होऊ नये यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी राजमाने गुहागरमध्ये दाखल झाले आहेत. त्यानंतर अण्णा आणि त्यांच्या पत्नीचा जबाब घेण्याचे काम सुरू झाले होते.
घटनेची माहिती मिळताच भाजपचे तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे, शिवसेनेचे अमरदीप परचुरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुरेश सावंत यांच्यासह महायुतीच्या अनेक कार्यकर्त्यांनी ग्रामीण रुग्णालयाकडे धाव घेतली. दुपारी ३ पासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत पोलिस अधिकारी आणि अण्णा जाधव पत्रकारांशी, कार्यकर्त्यांशी संवाद साधतील अशी अपेक्षा होती. मात्र, अण्णा जाधव, त्यांच्या पत्नी आणि पोलिसांनी सायंकाळी ६ पर्यंत या घटनेची अधिक माहिती दिलेली नाही.
पोलिस संरक्षणात जाधव स्थानबद्धगुहागरमध्ये महायुतीची रॅली असून पाटपन्हाळे येथे महाविकास आघाडीची प्रचार सभा आहे. त्यामुळे हे दोन राजकीय कार्यक्रम पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत अण्णा जाधव यांना पोलिस संरक्षणातच ठेवण्यात आले असल्याचे पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आले.