Sharad Pawar vs Ajit Pawar Baramati : विधानसभा निवडणुकीचा प्रचार करण्याची मुदत सोमवारी सायंकाळी ५ वाजता संपणार आहे. प्रचारासाठी शेवटचे काही तास शिल्लर राहिल्यामुळे उमेदवार आणि पक्षातील नेते, कार्यकर्त्यांची पळापळ सुरू आहे. प्रत्येकजण आपली ताकद पणाला लावत आहे. बारामतीमध्येही अजित पवार आणि शरद पवार यांनी आपली ताकद पणाला लावली आहे. अजित पवार यांच्याविरोधात शरद पवार पूर्ण ताकदीने मैदानात उतरलेत. शरद पवार आणि अजित पवार यांच्या प्रचार सभेचा समारोप बारामतीध्ये होणार आहे. त्यामुळे राज्याचे लक्ष बारामतीकडे लागलेय. बारामतीमध्ये कुणाचा आव्वाज आज घुमणार? याची चर्चा सुरु आहे. (Maharashtra Assembly Election 2024)
महाराष्ट्रातील 288 मतदारसंघांपैकी अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिलेला मतदारसंघ म्हणजे बारामती होय. बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार असा सामना रंगणार असल्यामुळे कुटुंबातील दोन व्यक्ती एकमेकांच्या समोर आल्यामुळे अवघ्या राज्याचे लक्ष या मतदारसंघाकडे लागले आहे. गेल्या वीस दिवसांपासून सुरू असलेला आरोप प्रत्यारोपांच्या फैरी आज संपणार आहेत. बारामतीमध्ये दोन्ही बाजूने जोरदार प्रचार करण्यात आला. स्वत: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती तालुका अक्षरशः पिंजून काढला. अनेक वेळा अजित पवार यांनी पहाटेपासूनच त्यांच्या गावभेटींना सुरुवात करत अनेक गावकऱ्यांना लोकसभेला तुम्ही साहेबांचा आदर करत ताईंना निवडून दिलं. आता मला निवडून द्या, अशी साद घातली. प्रचाराच्या सुरुवातीलाच अजित पवारांनी बारामतीकरांना भावनिक साद दिल्यामुळे प्रचाराला एक वेगळी रंगत आलेले पाहायला मिळाले.
दुसऱ्या बाजूला महा विकास आघाडीने अजित पवारांचे पुतणे आणि शरद पवारांचे नातू युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिली. कणेरी मारुतीला प्रचाराचा नारळ फोडल्यानंतरच शरद पवारांनी अजित पवार यांची नक्कल केली होती. शरद पवार यांनी सुद्धा बारामती तालुक्यातील अनेक गावांना भेटी देत कोपरा सभा घेतल्या. तसेच युवा नेतृत्वाला संधी मिळायला हवी म्हणून युगेंद्र याला निवडून द्या, असे आवाहन सुद्धा त्यांनी केलं.
मागील चार दिवसांपासून शरद पवार आक्रमक झाले आहेत. अजित पवार यांनी काही आमदारांना हाताशी धरत सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शरद पवार यांनीही रणनिती आखण्यास सुरुवात केली. लोकसभेला त्यांनी मतदारसंघ हेरून उमेदवार उतरवले अन् जिंकून आणले. आता विधानसभेलाही शरद पवार यांनी आपला डाव टाकला. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांनी आक्रमक रुप धारण केलेय. कागल, बीड, आंबेगाव अथवा इतर कोणता मतदारसंघ शरद पवार यांनी आक्रमक भाषण केले. वळसे पाटलांच्या बालेकिल्ल्यामध्ये गद्दाराला पाडा पाडा पाडा... असे आक्रमक आवाहन त्यांनी मतदारांना केले. शरद पवार यांच्या आक्रमक भाषणामुळे पश्चिम महाराष्ट्रातील वातावरण बदलल्याचे चित्र आहे. शरद पवार यांच्या आक्रमक भाषणाला अजित पवार यांच्याकडूनही उत्तर मिळालेय.
आज प्रचाराचा शेवटची संधी, त्यात समारोप बारामती, म्हणजेच होम ग्राऊंडवर होतेय. त्यामुळे साहेब आणि दादा काय बोलणार..याकडे लक्ष लागलेय. शरद पवार आज बारामतीमध्ये कोणता डाव टाकणार? अजित पवारांविरोधात शरद पवार काय बोलणार? याची चर्चा सुरु झाली आहे.