कर्जत : या तालुक्याला 10 वर्ष एक आमदार होता, मंत्री होता, सत्ता हातात होती, त्यांनी 10 वर्ष काय दिवे लावले? ते इथे मोठा बंगला बांधत आहेत. ते म्हणतात आम्ही दुष्काळी, गरीब आहोत आणि बंगला बांधत आहेत. त्यांनी स्वतःचा विकास केला, तुमचा नाही, असे म्हणत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाजपचे उमेदवार राम शिंदे (Ram Shinde) यांच्यावर केला. कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या प्रचार सभेतून ते बोलत होते.
शरद पवार म्हणाले की, 20 तारीख ही महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे. राज्याचा कारभार कुणाच्या हातात द्यायचा त्याचा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. देशाचे पंतप्रधान मोदी जनतेला म्हणायचे की, मला 400 खासदार निवडून द्या. पण 300 खासदार असले तरी देशाचा कारभार चालतो. आम्हालाही आधी प्रश्न पडला की हे असा प्रचार का करत आहेत?. आम्हाला वाटलं होतं की यात काहीतरी डाव आहे. आम्ही शोध घेत होतो, तर त्यांच्याच एका नेत्याने जाहीर भाषणात सांगितले की, 400 खासदार आल्यावर आम्हाला देशाचं संविधान बदलायचे आहे. आम्ही दिल्लीत बसलो होतो. आम्ही ठरवलं की, कोणतेही किंमत मोजायची वेळ आली तरी संविधान बदलू द्यायचे नाही, असे म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला.
अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वसामान्य कुटुंबातील निलेश लंकेला तुम्ही निवडून दिलं. देशात 31 आमचे खासदार तुम्ही निवडून दिले आणि मोदींना काहीही करता आलं नाही. विधानसभा निवडणूक आली आणि त्यांनी लाडकी बहीण योजना आणली. या देशात महिलांना सुरक्षा देणं अधिक गरजेचं आहे. महायुतीच्या काळात महिला अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. राज्यात मागील 2 वर्षात 67 हजार 381 महिलांनी आपल्यावर अत्याचार झाल्याची तक्रार दिली आहे. तर 64 हजार महिला आणि मुली बेपत्ता झाल्या आहेत, अशी आकडेवारी मांडत शरद पवार यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला. मी शेतकऱ्यांना सांगतो की, शेतकऱ्यांच्या घरात दोन मुलं असतील तर एकानेच शेती करावी. दुसऱ्याने काहीतरी काम करावं. या महायुती सरकारच्या काळात 20 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, असा आरोप देखील शरद पवारांनी केला. आत्महत्येमागचे कारण काय तर शेती परवडत नाही, असेही त्यांनी म्हटले.
कर्जत-जामखेड मतदारसंघातील कामाकडे रोहित पवारांचे लक्ष आहे. या तालुक्याला 10 वर्ष एक आमदार होता, मंत्री होता, सत्ता हातात होती त्यांनी काय केलं 10 वर्ष? असे म्हणत शरद पवार यांनी राम शिंदे यांच्यावर टीका केली.मी मागे चौंडीत आलो, तिथे एक टोलेजंग बंगला बांधण्यात आलाय. मी विचार केला की, हा भाग तर दुष्काळी भाग आहे, तर हा बंगला कुणाचा असा प्रश्न मला पडला, असं म्हणत शरद पवारांकडून राम शिंदे यांच्या चौंडीतील घरावरून टीका करण्यात आली. त्यांनी लोकांचा विकास केला नाही. स्वतःच्याच तुंबड्या भरल्यात. या मतदारसंघात विकास करायचा असेल तर या मतदारसंघात एमआयडीसी व्हायला हवी, असेही त्यांनी यावेळी म्हटले.
आणखी वाचा