नागपूर : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर दगडफेक झाली असून त्यांच्या डोक्याला जबर जखम झाली आहे. अनिल देशमुख हे या हल्ल्यात गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सोमवारी संध्याकाळी काटोल विधानसभा मतदारसंघामधील नरखेड येथील सांगता सभा आटोपल्यानंतर अनिल देशमुख तीनखेडा भिष्णूर मार्गाने परत येत होते. त्यावेळी काटोल जलालखेडा रोडवरील बेलफाट्याजवळ अज्ञात व्यक्तीने त्यांच्या गाडीवर दगड फेकला. यात अनिल देशमुख यांच्या वाहनाची समोरची काच फुटली आणि त्याचे तुकडे आतल्या बाजूला उडाले. त्यामुळे अनिल देशमुख जखमी झाल्याचे बोलले जात आहे.
बेलफाट्यावर आल्यानंतर अनिल देशमुखांच्या गाडीसमोर एक व्यक्ती आला आणि त्याने एक मोठा दगड देशमुखांच्या गाडीच्या समोरच्या काचेवर मारला. त्यामध्ये अनिल देशमुख गंभीर जखमी झाले असून त्यांच्या डोक्यातून रक्त वाहू लागलं.
हल्ला करणारे हे भाजपचे कार्यकर्ते असल्याचा आरोप यावेळी जखमी झालेले अनिल देशमुख यांनी केल्याचं दिसतंय. ही दगडफेक कोणी केली हे अद्याप स्पष्ट झालं नाही. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दुसऱ्या बाजूला अनिल देशमुख यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना काटोलच्या रुग्णालयात नेल्याची माहिती आहे.
दरम्यान, काटोलमधील भाजपच्या स्थानिक नेत्यांनी ही स्टंटबाजी तर नाही ना अशी शंका ही उपस्थित करायला सुरुवात केली आहे.