सांगली : काँग्रेसप्रती आमची निष्ठा दाखवायला प्रत्येक वेळी आम्हाला परीक्षा द्यावी लागते हे आमचं दुर्दैव आहे अशी खंत वक्तव्य खासदार विशाल पाटील यांनी व्यक्त केली. सांगली विधानसभेतील अपक्ष उमेदवार जयश्री पाटील यांच्या प्रचार सांगता सभेत खासदार विशाल पाटील यांनी हे वक्तव्य केलं. माझी अपक्ष उमेदवारी ही कार्यकर्त्यांच्या आणि सांगलीकर जनतेच्या आग्रहास्तव असल्याचं वक्तव्य अपक्ष उमेदवार जयश्री पाटील यांनी केलं. सांगली विधानसभेतील अपक्ष उमेदवार जयश्री पाटील यांच्या प्रचाराची सांगता विशाल पाटलांच्या सभेने झाली. यावेळी विशाल पाटील आणि जयश्री पाटील यांनी अनेक मुद्द्यावरून भाष्य केले.
संसदेत भाजप आणि मोदी सरकारचा प्रभावीपणे विरोध हा एकट्या खासदाराने केला आणि त्या खासदाराला दुर्दैवाने महाविकास आघाडीने पाठिंबा दिलेला नव्हता. त्यामुळे काँग्रेसप्रती आमची निष्ठा दाखवायला प्रत्येक वेळा आम्हाला परीक्षा द्यावी लागते हे आमचं दुर्दैव आहे असं विधान खासदार विशाल पाटील यांनी केलं.
यावेळी बोलताना जयश्री पाटील म्हणाल्या की, "मिरजमधील दंगलीनंतर दोनदा मदनभाऊंचा झालेला पराभव हा सर्वांच्याच जिव्हारी लागला होता. त्यामुळे माझी अपक्ष उमेदवारी ही कार्यकर्त्यांच्या आणि सांगलीकर जनतेच्या आग्रहास्तव ठेवली गेलेय. रविवारी मल्लिकार्जुन खरगे यांनी काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचार सभेच्या भाषणात सर्वात जास्त मलाच टार्गेट केलं. त्यामुळे सांगलीत भाजपशी काँग्रेसच्या उमेदवाराची लढाई नसून ती माझ्याशी लढाई आहे असे वाटतेय. त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार हाच भाजपची बी टीम आहे हे त्यांच्या भाषणावरून दाखवून दिले."
सांगली विधानसभेतील अपक्ष उमेदवार जयश्री पाटील यांच्या प्रचाराच्या सांगता सभेत खासदार विशाल पाटील बोलत होते. विधानसभा निवडणुकीत आमच्यावर काही आरोप होत गेले, त्यामुळे वाईट वाटलं असं ते म्हणाले. विशाल पाटील म्हणाले की, लोकसभेलादेखील मी निवडून आल्यावर भाजपला पाठिबा देणार आहे, भाजपचे पाकीट घेऊन विशाल पाटील उभे राहिलेत असेही आरोप केले गेले होते. त्यावेळी तेच लोक सांगत आहेत की आम्ही भाजपची सुपारी घेतली. पण मी निवडून आल्यावर पहिल्यांदा काँग्रेसला पाठिंबा दिला आणि उद्धव ठाकरे यांची माफीदेखील मागितली असं विशाल पाटील म्हणाले.
विशाल पाटील म्हणाले की, "काँग्रेसमध्ये जो पक्षाच्या चिन्हावर निवडून येतो तो प्रत्येक वेळी वेगळी भूमिका घेत असतो. त्यामुळे सांगलीत आमची काँग्रेस ही जयश्री पाटील यांच्यासोबत आहे. सांगलीत वसंतदादा पडावेत म्हणून इंदिरा गांधीनीही सांगलीत येऊन सभा घेतल्या होत्या. पण इंदिरा गांधींनी उभ्या केलेल्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त झाले होते. जयश्रीताईंनी काही मागितलं तर घराणेशाहीचा आरोप केला जातो. या मतदारसंघातील काँग्रेस सातत्याने संपेल यासाठी प्रयत्न करत होते तीच लोक आज आम्हाला काँग्रेसच्या निष्ठेची गोष्ट सांगत आहेत."
विशाल पाटील म्हणाले की, "अपक्ष निवडणूक लढवायला किती अडचणी येतात हे मला माहीत होतं. त्यामुळे जयश्रीताईंनी निवडणूक लढवावी ही माझीही इच्छा नव्हती.पण शेवटी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव जयश्रीताईंना उमेदवारी ठेवावी लागली. त्यामुळे सांगली काँग्रेसमध्ये, आमच्या कुटुंबात भांडणे लावायचा प्रयत्न केला गेला हे नक्की आहे. जयश्री पाटील यांचा हिरा हेच चिन्ह काँग्रेसचे खरे निवडणूक चिन्ह आहे. मात्र यंदा सांगली विधानसभेत भाजपचा एवढ्या फरकाने पराभव करा की शेजारच्या मतदारसंघांमधून आपल्याला दिला जाणारा भाजपकडूनचा त्रास संपावा."