पुणे, ता. १८ : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने स्वारगेट परिसरात मंगळवारपासून (ता. १९) वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे. हा बदल बुधवारपर्यंत (ता. २०) तात्पुरत्या स्वरूपात राहील.
श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथील मतदान केंद्रातून पीएमपी बसमधून मतपेट्या आणि साहित्याची वाहतूक करण्यात येणार आहे. या भागात पार्किंगसाठी पुरेशा व्यवस्था नाही. त्यामुळे स्वारगेट परिसर ते नेहरू स्टेडियमदरम्यान वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत. मंगळवारी सकाळी सहा ते दुपारी एक वाजेपर्यंत, तसेच बुधवारी सायंकाळी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर सायंकाळी सहा ते रात्री १२ या वेळेत वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येत असल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली.
स्वारगेट येथील देशभक्त केशवराव जेधे चौकातून सारसबागेकडे जाणाऱ्या वाहनांना नटराज हॉटेलच्या मार्गिकेवर प्रवेश बंद राहील. त्यामुळे जेधे चौकातून सारसबागेकडे जाणाऱ्या वाहनांनी पुलाखालील डाव्या मार्गिकेने जावे.
स्वारगेट येथील समतल विलगक (ग्रेट सेपरेटर) वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे सोलापूर रस्त्याने सारसबागेकडे जाणाऱ्या वाहनांनी लक्ष्मीनारायण चित्रपटगृह (होल्गा) चौकातून उजवीकडे वळून मित्रमंडळ चौकमार्गे सारसबागेच्या दिशेने जावे, असे आवाहन वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे.