Lawrence Bishnoi Brother Anmol Bishnoi Arrested in California: गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा (Lawrence Bishnoi) भाऊ अनमोल बिष्णोई (Anmol Bishnoi) याला अमेरिकेत (America) अटक करण्यात आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनमोलला कॅलिफोर्नियामध्ये (California) ताब्यात घेण्यात आलं आहे. तुरुंगात बंद गँगस्टर लॉरेन्सच्या धाकट्या भावाच्या प्रत्यार्पणासाठी मुंबई पोलिसांनी अमेरिकेला प्रस्ताव पाठवला होता. अमेरिकन अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की, अनमोल बिष्णोई त्यांच्या देशात आहे. अनमोलवर 18 गुन्हे दाखल आहेत. राष्ट्रीय तपास संस्थेनं (NIA) त्यांच्या अटकेवर 10 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे.
बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणी मुंबई पोलीस अनमोलचा शोध घेत आहेत. अनमोलनं अन्य आरोपी सुजित सुशील सिंहच्या माध्यमातून शस्त्र आणि आर्थिक मदत केल्याचा दावा मुंबई पोलिसांच्या तपासात करण्यात आला आहे. अनमोलनं कथितरित्या सिद्दीकी आणि त्यांचा मुलगा झिशान यांचे फोटो स्नॅपचॅटद्वारे नेमबाजांना भाड्यानं देण्यासाठी पाठवले होते. खुनाच्या महिनाभरापूर्वी गोळीबार करणाऱ्यांनी परिसराचा शोध घेतला होता.
अनमोल बिष्णोईचं नाव इतरही अनेक हाय-प्रोफाईल प्रकरणांमध्ये असल्याचं समोर आलं आहे. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येत मदत केल्याचा आणि बॉलिवूड सेलिब्रिटींवर हल्ल्याचा कट रचल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे. बॉलिवूड स्टार सलमान खानच्या अपार्टमेंटबाहेर गोळीबार झाल्याची घटनाही घडली होती. यामध्येही अनमोलचाच हात असल्याचं बोललं जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येमध्ये सहभागी असलेला शूटर हत्येपूर्वी अनमोल बिष्णोईच्या संपर्कात होता, असं यापूर्वी गुन्हे शाखेच्या तपासात समोर आलं होतं. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अनमोल आणि तीन संशयित शूटर कॅनडा आणि अमेरिकेत जात असताना स्नॅपचॅटद्वारे संपर्कात असल्याचं सांगितलं जात आहे.
अनमोलच्या अटकेच्या एक दिवस आधी, रविवारी बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेनं महाराष्ट्राच्या अकोल्यातून गुजरातमधील रहिवासी असलेल्या एका व्यक्तीला अटक केली होती. पीटीआयनं एका अधिकाऱ्याच्या हवाल्यानं सांगितलं की, बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची संख्या आता 25 वर पोहोचली आहे.
मुंबई गुन्हे शाखेनं 10 लाख रुपयांचं बक्षीस ठेवलं होतं, अनमोल बिष्णोईबद्दल माहिती देणाऱ्याला 10 लाख रुपयांचं बक्षीस देण्याची घोषणा केली होती. दरम्यान, एजन्सीनं 2022 च्या दोन प्रकरणांमध्ये बिष्णोई विरुद्ध आरोपपत्र दाखल केलं होतं. यामध्ये 2022 साली पंजाबचा गायक सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येचाही समावेश आहे.