Nashik East Assembly Constituency : नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात (Nashik East Assembly Constituency) भाजप (BJP) आणि राष्ट्रवादी शरद पवार गटात (NCP Sharad Pawar Group) काल पुन्हा एकदा जोरदार राडा झाला. मतदानाच्या स्लिपा वाटपावरून वाद झाला असून यामध्ये शरद पवार गटाचे उमेदवार गणेश गीते (Ganesh Gite) यांच्या कार्यकर्त्यांची गाडी फोडण्यात आली. यापुढे माझ्या एकही कार्यकर्त्याला हात लावला तर मी पोलीस आयुक्तालयासमोर जाऊन आंदोलन करेल. निवडणुका येतात जातात मात्र अशा पद्धतीची गुंडागर्दी खपवून घेणार नाही, असा इशाराच आता गणेश गीतेंनी ढिकलेंना दिला आहे.
काही दिवसांपूर्वीच नाशिक पूर्व मतदारसंघात राडा झाला होता. राहुल ढिकले (Rahul Dhikale) आणि गणेश गीते समर्थक आमनेसामने आले होते. हा वाद थेट पोलीस आयुक्तालयापर्यंत गेला होता. आता पुन्हा एकदा नाशिक पूर्व मतदारसंघात राडा झाला. राहुल ढिकले समर्थकांकडून शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची एक गाडी फोडण्यात आली. गणेश गीते यांच्या कार्यकर्त्यांकडून या गाडीतून स्लिपा वाटप करत असल्याची माहिती मिळाली तर भाजपच्या पदाधिकाऱ्यांना पैसे वाटपाचा संशय आल्याने हा वाद झाल्याची माहिती मिळत आहे.
याबाबत गणेश गीते म्हणाले की, माझ्या आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद काय झाले हे मला माहित नाही. मी माझ्या कार्यकर्त्यांना फोन केला, त्या ठिकाणी अचानक 50 गुंड जमा झाले. पाच वर्षापासून शहरात गुंड पाळलेले आहेत. या वीस दिवस काम करण्यासाठीच पाळले आहेत. पैसे वाटण्याच्या कारणावरून माझी गाडी फोडली होती. त्यात एक हजार रुपयाची ही रिकव्हरी झाली नाही. आता देखील गाडी फोडली, त्या गाडीत काही सापडले का? निवडणूक आपल्या हातातून जाताना दिसत आहे, त्यामुळे शहराला त्रास देण्याचे काम सुरु केले आहे.
मी पोलीस आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर जाऊन बसणार आहे. या शहराच्या नागरिकाला अशा पद्धतीने त्रास होत असेल तर काय करायचे? गाडी कोणाची होती मला माहित नाही. मात्र, सर्वसामान्याची असेल तर त्याचा काय दोष? माझ्या भावाची गाडी फोडली होती, त्यात पैसे नव्हते. कार्यकर्त्याची गाडी फोडली, त्यात देखील पैसे आढळले नाहीत. ते रामाच्या मंदिराजवळ राहतात, राम मंदिरासाठी प्रसिद्ध असलेल्या शहरात, असे धंदे सुरु आहेत. पाच वर्ष मतदारसंघात विकास केला असता तर ही वेळ आली नसती. माझ्या कार्यकर्त्याला कोणी हात जरी लावला तरी मी पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात जाऊन आंदोलन करेल, अशी गुंडागर्दी खपून घेणार नाही, असा इशारा गणेश गीते यांनी दिलाय.
दरम्यान, मतदानाला अवघा एक दिवस बाकी आहे. मात्र, नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजपमधील अंतर्गत वाद हा चव्हाट्यावर आल्याचे चित्र दिसून येत आहे. भाजपचे माजी नगरसेवक कमलेश बोडके यांनी राहुल ढिकले यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. शरद पवार गटाचे उमेदवार गणेश गीतेंच्या नातेवाईक असल्यामुळे मला पोलिसांसोबत संगनमत करून तडीपारची नोटीस पाठवण्यात आली, असे कमलेश बोडके यांनी म्हटले आहे. यामुळे आता नाशिक भाजपमधील वाद चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा
Sharad Pawar : अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झाल्यानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया