मुंबई : सत्ता असलेल्या प्रत्येक राज्यात अदानी उद्योगसमूहाशी हातमिळवणी करणाऱ्या काँग्रेसनेच त्यांचे प्रस्थ वाढवले असे नमूद करत प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वद्रा यांच्यासमवेत असलेली त्यांची छायाचित्रे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे सोमवारी पत्रकारांसमोर सादर केली.
मविआ सरकारच्या कार्यकाळात उद्योग महाराष्ट्रातून बाहेर गेले. आमचे सरकार रोजगारनिर्मितीत अग्रेसर असल्याचे सांगत धारावीकरांना चांगले घर मिळण्यास राहुल गांधींचा विरोध असल्याचा आरोपही भाजपने केला आहे. तावडे यांनी पत्रकार परिषदेतून गांधींवर हल्ला चढवला. गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा असल्याचे नमूद करत ते म्हणाले, की काँग्रेसची सत्ता असताना उद्योग साम्राज्यात अदानींचा उदय झाला हे विसरू नये. ज्येष्ठ नेते विजय गिरकर, भाजप माध्यम विभागाचे राष्ट्रीय सह प्रभारी संजय मयूख उपस्थित होते.
काँग्रेसची केंद्रात व अनेक राज्यात सत्ता असताना गौतम अदानी यांना विविध प्रकल्पांची कंत्राटे कशी मिळाली याची यादी वाचून दाखवीत तावडे यांनी अदानींचा उद्योग साम्राज्यातील उदय काँग्रेसच्या कृपेनेच झाला असल्याचे नमूद केले. ते म्हणाले ,"धारावीच्या पुनर्विकासाच्या कामाची निविदा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना निघाली.
त्यावेळी अदानींबरोबर अबुधाबीतील शेखशी संबंधित ‘सेकलींक’ या कंपनीनेही निविदा भरली होती. रेल्वेने जमीन दिल्यानंतर या प्रकल्पाच्या अटींमध्ये बदल झाला. बदललेल्या अटींनुसार पुनर्विकासाचे काम सुरू आहे. धारावीत राहत असलेल्या प्रत्येकाला पक्के घर मिळणार आहे. धारावीतील छोट्या व मध्यम उद्योगांना २२५ चौरस फुटांचे गाळे देऊन योग्य पद्धतीने पुनर्वसन केले जाणार आहे.
धारावीकरांनी आयुष्यभर झोपडीतच राहावे अशी राहुल गांधींची इच्छा असल्यानेच ते या प्रकल्पाला विरोध करीत आहेत. अबुधाबीच्या शेख शी संबंधित असलेल्या कंपनीला या प्रकल्पाचे कंत्राट मिळाले नाही म्हणून राहुल गांधी हे या प्रकल्पाला विरोध करीत आहेत का, असा सवालही तावडे यांनी उपस्थित केला.
राजीव गांधी पंतप्रधान असताना अनेक प्रकल्पांची कामे मिळाल्याचे खुद्द अदानींनीच सांगितले आहे, असे नमूद करून तावडे यांनी काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यांत अदानींना मिळालेल्या कामांची यादीच वाचून दाखविली. महाराष्ट्रातून महायुती सरकारच्या काळात एक तरी प्रकल्प बाहेर गेल्याचे राहुल गांधींनी समोरासमोर येऊन सिद्ध करावे, असे आव्हान त्यांनी दिले.
काँग्रेसची मानसिकता संकुचित
‘‘जातीय जनगणनेची मागणी करणाऱ्या राहुल गांधी आणि काँग्रेसची मानसिकता संकुचित आहे. या मागणीतून जातीजातींमध्ये समाज विभागला जावा, अशी काँग्रेसची इच्छा आहे. राहुल गांधींच्या मागणीनुसार आरक्षण दिले गेले तर त्यात ओबीसी समाजाचे नुकसानच होईल, म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक हैं तो सेफ हैं’ असा नारा दिला आहे,’’ असे तावडे म्हणाले.
#ElectionWithSakal