बदलापूर : ‘‘सकाळी उठल्यापासून महायुतीच्या कामांवर निशाणा साधून बदनाम करणे, आणि शिव्या शाप देण्यात महाविकास आघाडी दंग झाली आहे. निवडून आल्यावर काय विकास कराल ते सांगा, माझ्या नादी लागू नका; मला हलक्यात घ्याल तर, ही दाढी तुमच्या महाविकास आघाडीची गाडी खड्ड्यात टाकेल,’’ या शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र डागले.
मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार किसन कथोरे यांच्या प्रचारार्थ बदलापूर येथे सोमवारी आयोजित महायुतीच्या मेळाव्यात ते म्हणाले, ‘‘महाविकास आघाडीने अडीच वर्षांत केलेली कामे दाखवावी, आम्ही आमची अडीच वर्षांतील कामे दाखवतो. ‘मविआ’ने फक्त आणि फक्त महायुतीच्या कामांवर निशाणा साधून कामांना नावे ठेवणे, चुका काढणे, शिव्या शाप देणे हेच केले आहे.
त्यात निवडून आल्यावर महायुतीच्या या योजना बंद करू, याची चौकशी करू, त्याची चौकशी करू, गुन्हेगारांना तुरुंगामध्ये पाठवू, हेच सांगण्यात आघाडी व्यस्त आहे.
मात्र आंदोलन आणि तुरुंगामध्ये जाऊन, संघर्ष करूनच आम्ही येथे पोहचलो आहेत.’’महाविकास आघाडीकडून सुरू असलेल्या प्रचाराचा समाचार घेत ते म्हणाले, की तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली
केंद्राकडून राज्याला फक्त दोन लाख कोटी इतका तुटपुंजा निधीच आणता आला. मात्र नरेंद्र मोदींच्या काळात हाच निधी १० लाख कोटींच्या घरात गेला. तुम्ही मात्र दिल्लीत ‘’मला मुख्यमंत्री करा, या विनवण्या करायला जात होता. लाडकी बहीण योजना आम्ही यशस्वी करून दाखवली म्हणून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली, आता यांनीच आमची योजना चोरली आणि निवडून आल्यावर तीन हजार देण्याच्या घोषणा केल्या, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना चिमटा काढला.
#ElectionWithSakal