टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेला 22 नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील पहिला सामना हा पर्थ येथे खेळवण्यात येणार आहे. रोहित शर्मा याच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराह टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. टीम इंडियाने आतापर्यंत जोरदार सराव केला आहे. सामन्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. ऑस्ट्रेलियाने अशात 140 कोटी भारतीयांच्या बरोबर वर्षभरापूर्वीच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केला आहे. ऑस्ट्रेलियाने भारताला आज सकाळी 19 नोव्हेंबरच्या सकाळी डिवचण्याचा प्रयत्न करत नको ती आठवण करुन दिली आहे.
ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमने सोशल मीडियावरुन आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 चे फोटो पोस्ट केले आहेत. बरोबर वर्षभरापूर्वी आजच्याच दिवशी ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला पराभूत करत वनडे वर्ल्ड कप ट्रॉफीवर नावं कोरलं होतं. त्यामुळे टीम इंडियाचं 12 वर्षांनंतर वर्ल्ड चॅम्पियन होण्याचं स्वप्न थोडक्यासाठी हुकलं होतं. ज्यामुळे टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मासह सारा भारत रडला होता. ऑस्ट्रेलियाने त्याचीच आठवण करुन देत 140 कोटी भारतीयांच्या वर्षभरापूर्वीच्या जखमेवर मीठ चोळलंय.
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेतील अंतिम सामना खेळवण्यात आला. टीम इंडियाने साखळी फेरीतील 9 आणि सेमी फायनल असे सलग आणि एकूण 10 सामने जिंकून अंतिम फेरीत प्रवेश मिळवला होता. तर टीम इंडिया आणि वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलिया उभी होती. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. ऑस्ट्रलेयाने टीम इंडियाला 240 वर रोखल्याने विजयासाठी 241 धावांचं आव्हान मिळालं. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान 7 ओव्हर राखून आणि 4 विकेट्स गमावून सहज पूर्ण केलं. ऑस्ट्रेलियाने 43 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 241 धावा केल्या. ट्रेव्हिस हेड याच्या शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने हे आव्हान सहज पूर्ण केलं होतं.
टीम इंडियाला डिवचण्याचा प्रयत्न!
हा फक्त टीम इंडियाचाच नाही, तर साऱ्या भारतीयांचा पराभव होता. टीम इंडियाच्या खेळाडूंना अप्रतिम कामगिरी करत अंतिम फेरीपर्यंत धडक मारली. मात्र अवघ्या थोडक्यासाठी वर्ल्ड कपपासून दूर राहिली. पराभवानंतर खेळाडूंवर टीका केली जाते. मात्र त्यावेळेस टीम इंडिया ज्या पद्धतीने खेळली होती, त्यानंतर कुणालाच टीका करण्याची संधी नव्हती. मात्र भारताला वर्ल्ड कप जिंकता आला नव्हता. अंतिम सामन्याच्या निकालानंतर कॅप्टन रोहितसह विराट कोहली या 2 अनुभवी खेळाडूंना अश्रू अनावर झाले. त्यांच्या डोळ्यात वर्ल्ड कप पराभवाचं दु:खं दिसत होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेळाडूंची भेट घेत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.
वनडे वर्ल्ड कप गमावल्याने भारतीय चाहते दुखावले गेले होते. मात्र रोहितसेनेने त्या दुखातून सावरुन टी 20I वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत धमाका केला. भारताने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर थरारक विजय मिळवत 13 वर्षांच्या आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची प्रतिक्षा संपवली होती.