उत्तर भारतात धुके-थंड-बर्फ
Marathi November 19, 2024 02:25 PM

बिहारमध्ये रेल्वेगाड्या-विमानोड्डाणांना विलंब : मध्यप्रदेशात शाळांच्या वेळेत बदल : लडाख-काश्मीरमध्ये बर्फवृष्टी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली, पाटणा

देशात थंडीबरोबरच धुक्मयाचा प्रभावही सातत्याने वाढत आहे. बिहारमध्ये धुक्मयामुळे दृश्यमानता कमी झाल्यामुळे 17 रेल्वेगाड्यांना उशीर झाला. तसेच सहा विमानांच्या टेकऑफ आणि लँडिंगलाही विलंब झाला. मध्यप्रदेशातही थंडीचे वातावरण सुरू झाल्यामुळे आता शाळांच्या वेळेतही बदल करण्यात येत आहेत. भोपाळमधील अनेक खासगी शाळांनी वेळेत 30 मिनिटांची वाढ केली आहे. इंदूर, जबलपूर, ग्वाल्हेर-उज्जैनमध्येही वेळा बदलण्याची तयारी सुरू आहे. 20 नोव्हेंबरपासून मध्यप्रदेशात पुन्हा थंडी वाढणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.

दिल्लीसह आसपासच्या राज्यांमध्ये वातावरणात बराच फरक पडला असून प्रदूषण पातळीही अतिगंभीर स्थितीत पोहोचली आहे. सोमवारी मध्यप्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, झारखंड, पश्चिम बंगालमध्ये तापमान सामान्यपेक्षा 2 अंशांनी घसरले. दिल्लीत रविवारी 11.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. जम्मू-काश्मीर आणि लडाखच्या काही भागात रविवारी संध्याकाळी आणि सोमवारी सकाळी बर्फवृष्टी झाली. बर्फवृष्टीमुळे श्रीनगर-कारगील हा मार्गही काही काळ बंद करण्यात आला होता.

बिहारमध्ये वाढत्या थंडी आणि धुक्मयामुळे रेल्वेगाड्यांच्या वेग मंदावला आहे. धुके आणि थंडीच्या लाटेमुळे पाटणा रेल्वे स्थानकावरून जाणाऱ्या अनेक गाड्या उशिराने धावत आहेत. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. प्रवाशांना तासन्तास रेल्वे स्थानकावर प्रतीक्षा करावी लागत आहे.

मध्यप्रदेशात थंड वाऱ्यांमुळे थंडीचा प्रभाव आहे. त्यामुळे आता शाळांच्या वेळेतही बदल करण्यात येत आहेत. भोपाळमधील अनेक खासगी शाळांनी वेळेत 30 मिनिटांची वाढ केली आहे. राजस्थानमध्ये थंडीचा कडाका अद्याप सुरू झाला नसला तरी दाट धुके पडू लागले आहे. उत्तर राजस्थानच्या 8 जिल्ह्यांमध्ये सोमवारी सकाळी दाट धुके पसरले होते. रविवारी जयपूरमध्ये कमाल तापमान 30 अंश सेल्सिअसच्या खाली नोंदवले गेले. या मोसमातील हा सर्वात थंड दिवस ठरला.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.