अनिल देशमुखांवरील हल्ल्यानंतर संजय राऊतांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; म्हणाले, आज रात्रीपर्यंत....
हितेश पांचाळ November 19, 2024 02:43 PM

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर सोमवारी रात्री हल्ला करण्यात आला. अनिल देशमुख यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली आहे. अनिल देशमुखांवरील हल्ला भाजपने (BJP) केल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. तर ही स्टंटबाजी असल्याचे भाजपने म्हटले आहे. आता या प्रकरणावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी संशय व्यक्त केला आहे.  

संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर काल नागपूरमध्ये हल्ला झाला. अत्यंत निर्घुण हल्ला झाला. आपण एक चित्र पाहिलं असेल, त्यांच्या डोक्यावर दगडफेकीमुळे जखम झाली. ते रक्त बांबळ झालेले आहे. हल्ला करताना भारतीय जनता पक्षाकडून घोषणा देण्यात येत होत्या, असा दावा त्यांनी केला आहे. 

संजय राऊतांनी व्यक्त केला संशय 

राज्याच्या माजी गृहमंत्री मंत्र्यावर ठार मारण्याचा हल्ला होतो. मुंबईमध्ये माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची हत्या होते. अनिल देशमुख यांच्या सारख्या ज्येष्ठ नेत्यांवर, माजी गृहमंत्र्यांना ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरात राज्याच्या कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे उडाले आहे. त्याला जबाबदार शिंदे सरकार आणि गृहमंत्री देवेंद्र फडवणीस आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. उद्याच्या निवडणुका सकाळपासून होणार आहे. आम्हाला चिंता वाटते की, आज रात्रीपर्यंत विरोधी पक्षातल्या कित्येक कार्यकर्त्यांना धमक्या आणि त्यांच्यावर हल्ले होतील. खोटे गुन्हे देखील दाखल केले जातील. हे प्रकार राज्यभरात सुरू झाल्याची भीती संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. 

नरेंद्र मोदींकडून आम्हाला स्टंट शिकण्याची गरज नाही

मी आणि उद्धव ठाकरे यांनी याबाबत चिंता व्यक्त केली. अनिल देशमुख यांच्या सोबत आम्ही दूरध्वनीद्वारे चर्चा केली. महाराष्ट्राला धक्का बसावा आणि चिंता वाटावी असे कालचे प्रकरण आहे. भाजपवाले म्हणतात हा स्टंट आहे. नरेंद्र मोदींकडून आम्हाला स्टंट शिकण्याची गरज नाही. देशमुख यांचे चिरंजीव निवडणुकीसाठी उभे आहेत. काटोल मतदारसंघातून ते निवडून लढवत आहेत. सात वेळा देशमुख हे निवडून आले आहे. हे जे काय चाललं आहे ते भारतीय जनता पार्टीची नौटंकी आहे. महाराष्ट्रातल्या निवडणुकीमध्ये कधी असं वातावरण झालं नव्हतं, असा हल्लाबोल देखील संजय राऊत यांनी केला.

आणखी वाचा 

Sanjay Raut : राज ठाकरेंनी 25 वर्षात काय केलं? उद्धव ठाकरेंचा पक्ष पुढे गेला, संजय राऊतांचा पलटवार; म्हणाले, आम्हाला त्यांचं वाईट वाटतं!

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.