Maharashtra Vidhan Sabha Election 2024: महाराष्ट्राची निवडणूक पारदर्शक ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाने (Election Commission) दोन महत्त्वाचे निर्णय घेतेले आहे. यात नागपूरसह मुंबई, ठाणे, पुणे या मोठ्या शहरातील प्रत्येक मतदान केंद्र वेबकास्टिंग द्वारे पहिल्यांदाच निवडणूक आयोगाच्या नजरेखाली असणार आहे. तसेच राज्यातील प्रत्येक ईव्हीएमच्या बारीक-सारीक हालचालीवरही चक्रीका ॲपच्या माध्यमातून निवडणूक आयोगाची नजर ठेवणार आहे. ईव्हीएम (EVM) काही फूटही इकडे तिकडे हलवली गेली, तरी ॲपच्या माध्यमातून वरिष्ठ प्रशासनिक अधिकारी आणि निवडणूक आयोगाला या माध्यमातून कळेल, अशी व्यवस्था यात करण्यात आली आहे.
नागपूर सह मुंबई, पुणे, ठाणे या राज्यातील मोठ्या महानगरपालिका क्षेत्रातील प्रत्येक मतदान केंद्र वेब कास्टिंग द्वारे प्रशासनाच्या नजरेखाली राहणार आहे. त्यामुळे मतदान केंद्रावर कुठलाही गैरप्रकार झाल्यास तो लगेच निवडणूक यंत्रणेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलिसांच्या नजरेत येऊ शकणार आहे. राज्यात असा प्रयोग पहिल्यांदाच होत असून मोठ्या महानगरातील प्रत्येक मतदान केंद्रामधील दोन कॅमेराद्वारे आउटपुट (लाईव्ह स्ट्रीमिंग) जिल्हाधिकारी कार्यालयासह प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील निवडणूक निर्णय अधिकारी तसेच संबंधित शहरातील पोलीस कंट्रोल रूममध्येही उपलब्ध राहणार आहे. नागपूर जिल्ह्यात तर शहरातील शंभर टक्के आणि ग्रामीण भागातील 50 टक्के, असे 75 टक्के मतदान केंद्र वेबकास्टिंग द्वारे प्रशासनाच्या नजरेखाली ठेवले जाणार आहे.
यंदा निवडणूक आयोगाने ईव्हीएम (EVM)च्या हालचालीवर ही बारीक नजर ठेवण्याचे ठरवले आहे. त्यासाठी ईव्हीएमची हाताळणी करणाऱ्या प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मोबाईल मध्ये विशेष चक्रीका ॲप डाऊनलोड करण्यात आले आहे. चक्रीका ॲप® च्या माध्यमातून संबंधित अधिकारी व कर्मचारी कुठे जात आहे, ईव्हीएम कुठे नेली जात आहे, त्याची प्रत्येक हालचाल निवडणूक यंत्रणेच्या आणि निवडणूक आयोगाच्या नजरेखाली राहणार आहे. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक राहावी यासाठी राज्यात पहिल्यांदाच हे दोन नवीन उपाय प्रशासनाकडून अमलात आणले जात आहे.
सर्वात आधी एक गोष्ट लक्षात घ्या ते म्हणजे, जर तुमच्याकडे मतदार ओळखपत्र नसेल तरीही तुम्ही निवडणुकीत मतदान करू शकता. यासाठी फक्त एक महत्त्वाची गोष्ट करणं गरजेचं आहे. ओळखपत्र नसलं तरी चालेल, पण अधिकृत मतदार यादीत तुमचं नाव असलं पाहिजे. जर तुमचं यादीत नाव असेल तर तुम्ही घरी येणाऱ्या निवडणूक स्लिपची (Voter Slip) प्रिंटआउट घेऊन जाऊन मतदान करू शकता. फक्त या निवडणूक स्लिपसोबत तुम्ही खालील पैकी एक कागदपत्र मतदान केंद्रावर घेऊन जाऊ शकता. निवडणूक आयोगाने विविध 12 प्रकारची ओळखपत्रे मतदानासाठी मंजूर केली आहेत.
आधारकार्ड, मनरेगाचे जॉब कार्ड, बँकेचे किंवा टपाल कार्यालयाचे छायाचित्र असलेले पासबुक, आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या कार्ड, पारपत्र, पेन्शन कार्ड, केंद्र किंवा राज्य सरकारचे ओळखपत्र, दिव्यांग कार्ड किंवा खासदार-आमदारांनी दिलेले ओळखपत्र यांचा समावेश आहे.
हे ही वाचा :