Vinod Tawde in Virar Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नालासोपारा येथे पैसे वाटपाच्या आरोपावरुन भाजप आणि बहुजन विकास आघाडीमध्ये तुफान राडा झाल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. भाजप केंद्रीय नेते विनोद तावडे यांच्यासह भाजप नालासोपारा विधानसभेचे उमेदवार राजन नाईक यांना हॉटेलमध्ये घेरून दोन्ही गटात तुफान राडा झाल्याचं व्हिडीओमधून स्पष्ट होत आहे. विरार पूर्व मनवेलपाडा येथील विवांत होटलमध्ये हा राडा झाला.यावेळी क्षितिज ठाकूरही घटनास्थळी उपस्थित होते. यावेळी दोन्ही बाजूंनी एकमेकांविरुद्ध घोषणाबाजी सुरु होती.
5 कोटी रुपये घेऊन विनोद तावडे आले होते. तसेच दोन डायऱ्या देखील सापडल्या आहेत. यामध्ये पैशांचं वाटप कसं केलं, याची माहिती होती. याबाबत सदर ठिकाणी पोलीस पोहचले आहेत. आम्ही तक्रार केली आहे. परंतु पुढे काय होणार या तक्रारीचं हे माहिती आहे. याचं सरकार आहे, असं हितेंद्र ठाकूर यांनी सांगितले. त्याचप्रमाणे मला विनोद तावडे मला सारखे फोन करतायत. मला सोडवा..माझी चूक झाली..मला सोडवा, अशी विनंती विनोद तावडे करत आहेत. विनोद तावडे यांनी मला 25 फोन केले आहेत, असा दावा हितेंद्र ठाकूर यांनी एबीपी माझाशी बोलताना केला आहे.
पराभव समोर दिसत असल्यामुळे विरोधक असे आरोप करत आहेत, असं भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी सांगितले. तुम्ही रडीचा डाव खेळू नका, लोकशाही आहे, सामोरे जावा. तसेच सदर प्रकरणाबाबत पोलीस स्थानकांत तक्रार दाखल करा, असं अतुल भातखळकर हितेंद्र ठाकूर यांना म्हणाले.
बविआच्या आरोपानुसार, विनोद तावडे हे मंगळवारी विरार पूर्वेला असणाऱ्या मनोरीपाडा येथील विवांत हॉटेलमध्ये आले होते. त्यावेळी भाजपचे उमेदवार राजन नाईक आणि भाजपचे काही पदाधिकारी हॉटेलमध्ये आले होते. त्यांच्यात बैठक सुरु होती. त्यावेळी बविआचे काही कार्यकर्ते हॉटेलमध्ये आले. याठिकाणी पैसेवाटप सुरु असल्याचा आरोप बविआच्या कार्यकर्त्यांनी केला. या राड्यानंतर पोलीस घटनास्थळी आले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. यावेळी क्षितिज ठाकूरही घटनास्थळी उपस्थित होते. यावेळी दोन्ही बाजूंनी एकमेकांविरुद्ध घोषणाबाजी सुरु होती.