भारताच्या ऑस्ट्रेलिया दाैऱ्यापूर्वी अनेक सामन्यांमध्ये विराट कोहलीचा फॉर्म दिसला नाही. 2024 हे वर्ष देखील कोहलीसाठी आतापर्यंत चांगले राहिलेले नाही. कोहलीची बॅट ना बांग्लादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत वा न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत चालली नाही. विराट कोहलीच्या नावावर ऑस्ट्रेलियात अनेक कसोटी विक्रम आहेत. त्यामुळे बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये त्याचा फॉर्म परत येण्याची अपेक्षा चाहत्यांना आहे. भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनेही कोहलीच्या फॉर्मबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आणि विराटच्या ऑस्ट्रेलिया कसोटी दौऱ्याबाबत भाकीतही केले.
यंदाची ही मालिका विराट कोहलीसाठी विशेष महत्त्वाची ठरू शकते. कारण हा त्याचा ऑस्ट्रेलियातील शेवटचा कसोटी दौरा असू शकतो. असे सौरव गांगुलीचे मत आहे. 36 वर्षांचा असलेल्या कोहलीला भविष्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर खेळणे कठीण होऊ शकते. याबद्दल बोलताना गांगुली म्हणाला, “तो एक चॅम्पियन फलंदाज आहे आणि त्याने यापूर्वी ऑस्ट्रेलियात चमकदार कामगिरी केली आहे. त्याने 2014 मध्ये या ठिकाणी चार शतके आणि 2018 मध्ये एक शतक झळकावले होते. त्याला या मालिकेत आपली छाप सोडायला आवडेल. हा त्याचा शेवटचा ऑस्ट्रेलिया दौरा असू शकतो, याची जाणीव देखील त्याला आहे.”
सौरव गांगुलीने विराट कोहलीच्या खराब कामगिरीवर फारशी चिंता व्यक्त केली नाही आणि म्हणाला, “न्यूझीलंडविरुद्ध खेळपट्ट्या फलंदाजीसाठी खूप कठीण होत्या, पण कोहलीला ऑस्ट्रेलियात चांगल्या विकेट्स मिळतील. मला पूर्ण आशा आहे की तो या मालिकेत चांगली कामगिरी करेल.” या सर्व गोष्टी गांगुलीने मीडियाशी बोलताना सांगितल्या.
विराट कोहलीने 2023 मध्ये 8 कसोटी सामने खेळले. या 8 कसोटी सामन्यांमध्ये त्याने 55.91 च्या सरासरीने 671 धावा केल्या. यामध्ये 2 शतके आणि 2 अर्धशतकांचा समावेश आहे. 2023 मध्ये विराट कोहलीची सर्वोच्च धावसंख्या 186 धावा होती.
पण विराट कोहलीचे 2024 हे वर्ष फॉर्मच्या दृष्टीने चांगले ठरले नाही. कोहलीने 2024 मध्ये 6 कसोटी सामने खेळले. या 6 कसोटी सामन्यांमध्ये त्याने 22.72 च्या सरासरीने 250 धावा केल्या. 2024 मध्ये आतापर्यंत विराट कोहलीची सर्वोच्च धावसंख्या फक्त 70 धावा आहे.
हेही वाचा-
IPL 2025: हे खेळाडू आरसीबी मध्ये परतणार? हा सर्वात मोठा दावेदार!
कोहलीच्या खराब फॉर्मपासून ते गौतम गंभीरच्या फ्लॉप कोचिंगपर्यंत, टीम इंडियासाठी या 5 मोठ्या समस्या
IND vs AUS: विराट कोहली पर्थमध्ये इतिहास रचणार, पुजारा-द्रविडचा हा विक्रम धोक्यात