नाशिकमधील हॉटेलमध्ये 1 कोटी 98 लाखांची रोकड सापडली; मिंधे गटाच्या उमेदवारासाठी पैसे आल्याची चर्चा
Marathi November 19, 2024 10:24 PM

महाराष्ट्रात बुधवारी मतदान होणार आहे. मतदानाच्या आदल्या दिवशी भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांना पैसे वाटताना पकडण्यात आले. तसेच त्यांच्या हॉटेलच्या खोलीतून सुमारे 10 लाख सापडल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. आता नाशिकमध्ये एका हॉटेलच्या खोलीतून तब्बल 1 कोटी 98 लाखांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. मिंधे गटाच्या उमेदवारासाठी ही रक्कम आल्याची चर्चा होत आहे.

नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरातील हॉटेल रॅडिसन ब्लूमध्ये बुकिंग केलेल्या एका रूममध्ये तब्बल 1 कोटी 98 लाख रुपयांची रोकड सापडली आहे. जयंत बाळासाहेब साठे (रा. आनंदनगर कोपरी, जि. ठाणे) यांनी दोन बॅगांमध्ये ही रोकड हॉटेलमध्ये आणल्याची माहिती मिळाली आहे. यावेळी देवळाली मतदारसंघातील मिंधे गटाच्या उमेदवार राजश्री अहिरराव यांच्यासह माजी नगरसेवकही या ठिकाणी उपस्थित होते, अशी माहिती मिळाली आहे.

निवडणूकीला एक दिवस शिल्लक असताना भरारी पथकांनी नाशिकमध्ये ही मोठी कारवाई केली. नाशिक पश्‍चिम मतदारसंघातील भरारी पथक क्रमांक तीन व चार यांना फोनद्वारे आणि सी-व्हिजिल ॲपवर बॅग भरून रोकड नाशिकमध्ये आल्याची तक्रार प्राप्त झाली. त्याआधारे पथकाने सकाळी 10.30 वाजता हॉटेल रॅडिसन ब्लूमधील रूम क्रमांक 707 ची तपासणी केली. जयंत साठे यांनी बुक केलेल्या या रूममधील टेबलाच्या ड्रॉवरमध्ये पाचशे, दोनशे आणि शंभर रुपयांचे मूल्य असलेल्या 97 लाख 90 हजारांच्या नोटा, तर दुसऱ्या बॅगेत पाचशे रुपयांच्या नोटांची 195 बंडले (97 लाख 50 हजार रुपये) आणि टेबलाच्या ड्रॉवरमध्ये 2 लाख 60 हजार रुपयांची रोख रक्कम आढळली. या संपूर्ण कारवाईत एकूण 1 कोटी 98 लाख रुपयांची रोकड भरारी पथकाने जप्त केली आहे. ही रक्कम आपलीच असल्याची कबुली जयंत साठे यांचीच भरारी पथकाला दिली. त्यानुसार पंचनामा करण्यात आला. रोख रक्कम जिल्हा कोशागार विभागात जमा करण्यात आली आहे.

या कारवाईपूर्वी हॉटेलमध्ये मिंधे गटाच्या उमेदवार राजश्री अहिरराव व माजी नगरसेवक उपस्थित असल्याची माहिती मिळाली आहे. भरारी पथकाला बघताच त्यांनी येथून पळ काढला. त्यामुळे ही रोकड अहिरराव यांच्यासाठी आली होती, अशी चर्चा सुरू आहे. निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर एवढ्या मोठ्या प्रमाणात रोकड कशासाठी आली होती, याची चौकशी करत आहोत. दोषी आढळल्यास संबंधित व्यक्तीवर योग्य कारवाई करण्यात येईल. यापुढील दोन दिवस भरारी पथकांची करडी नजर असणार आहे, असे भरारी पथकाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.