अनिल देशमुखांवरील हल्ल्या प्रकरणी पोलिसांचा मोठा खुलासा; संपूर्ण प्रकरणाचा घटनाक्रम सांगितला
रजत वशिष्ठ, एबीपी माझा November 19, 2024 09:43 PM

नागपूर : राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या कारवर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली होती. या घटनेत अनिल अनिल देशमुख गंभीर जखमी झाले होते. त्यात त्यांच्या डोक्याला दुखापत झाली होती. देशमुख हे काटोलकडे जात असताना बेलफाट्याजवळ अज्ञात व्यक्तीने हा हल्ला (Attack on Anil Deshmukh) केला असल्याचे सांगितले जात आहे. हा हल्ला भाजपच्या लोकांकडून करण्यात आल्याचा आरोप अनिल देशमुख यांच्याकडून करण्यात आलाय.

दरम्यान, आज अनिल देशमुखांची त्यांची प्रकृती स्थिर असल्याने त्यांना आज डिस्चार्ज दिला गेलाय. तर दुसरीकडे अनिल देशमुख यांच्यावरील कथित हल्ल्याप्रकरणी पोलिसांची महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दिलीप पाटील भुजबळ आणि पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार हे पत्रकार परिषदेला संबोधित करत असताना त्यांनी या संपूर्ण प्रकरणाचा घटनाक्रम सांगत काही खुलासे केले आहेत.

पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाचा घटनाक्रम सांगितला

अनिल देशमुख यांच्या फोर्ड इंडेवर या वाहनावर दगडफेक झाली. तेव्हा अनिल देशमुख समोर तर मागे दोघे बसले होते. तेव्हा पोलिसांचे दोन सुरक्षा रक्षक मागच्या वाहनात होते. घटना घडली तेव्हा वाहनाची गती कमी होती. त्यात चार जण समोर आले आणि एक मोठ्ठा दगड समोरील काचेवर तर दुसरा दगड बाजूच्या दाराच्या खिडकीतून फेकून मारण्यात आला. या दगडफेकीत अनिल देशमुख जखमी झाले होते.

अनिल देशमुख यांच्यावरील हल्ला प्रकरणी घडलेल्या घटनेसंदर्भात काटोल पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा प्रयत्न, बेकायदेशीरपने रस्ता अडविणे, इतराची सुरक्षितता धोक्यात आणने, या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. फॉरेन्सिक टीम ने काल रात्री पासून न्यायवैद्यक पुरावे गोळा करणे सुरू केले आहे. तसेच त्या परिसरातील सर्व रस्त्यांचे cctv फूटेज तपासले जात आहे. त्या भागातील मोबाईल टॉवरच्या माध्यमातून त्या काळात त्या परिसरात होत असलेल्या मोबाईल कॉल्सचा अभ्यास केले जात आहे. दरम्यान, काटोल मधील कायदा सुव्यवस्था सांभाळण्यासाठी अतिरिक्त पोलिस कुमक लावण्यात आली आहे. Srpf च्या तुकड्या ही तैनात करण्यात आल्या आहे. त्यामुळे नागरिकांनी निर्धास्तपणे मतदान करावे. असे आवाहन नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दिलीप पाटील भुजबळ आणि पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी पत्रकार परिषदेला संबोधित करत असताना केलंय.  

पोलीस जवानाने अनिल देशमुखांच्या गाडीत बसणे अपेक्षित होतं

दगडफेकीत तीन टप्पे दिसतात. अनिल देशमुख यांच्या कारचे स्पीड कमी होताच, पहिला दगड समोरील काचेवर मारण्यात आला, दुसरा दगड अनिल देशमुख यांच्या बाजूच्या खिडकीतून मारला, तर तोच दगड कारच्या आतील बाजूस पडला आणि तिसरा दगड बाजूच्या आरशावर मारण्यात आला. ते दगड आम्ही जप्त केले आहे. असेही पोलिसांनी सांगीतेले आहे. दरम्यान पुराव्यांच्या आधारे पोलीस पुढील तपास करत आहेत. अनिल देशमुख यांना नागपूर शहर आणि ग्रामीण या दोन्ही भागात सुरक्षा पुरवण्यात आली आहे. त्यानुसार त्यांच्या सुरक्षेसाठी असलेले पोलीस जवान त्यांच्या गाडीत बसणे अपेक्षित होते. मात्र काल घटना घडली तेव्हा अनिल देशमुख यांच्या सुरक्षेसाठी नेमलेले पोलीस जवान मागच्या गाडीत बसले होते.  त्यांच्या या कृतीची चौकशी केली जाणार आहे.

हे ही वाचा 

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.