एक असतो राजा; तो आपल्या प्रजेची स्वतःच्या कुटुंबाप्रमाणे काळजी घेत असतो. त्याच्या राज्यात साहित्य, कला, संस्कृती, विज्ञान-तंत्रज्ञान आणि आध्यात्म या सर्व क्षेत्रातील व्यक्तींचा यथोचित सन्मान होत असतो.
राज्यातील प्रजा ही राजावर प्रेम करणारी आणि समाधानी असते.... अशी काल्पनिक गोष्ट आपण लहानपणी अनेकदा ऐकली असेल मात्र, अगदी मागच्याच शतकात असे एक राज्य आणि असा एक राजा होता. त्या राजाची कथा सांगणारे पुस्तक म्हणजे अप्पा पंत लिखित
मुलखावेगळा राजा. महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई आणि मानसन्मान प्रकाशन पुणे यांनी हे पुस्तक प्रकाशित केले आहे.
ज्या राजाची कथा या पुस्तकात सांगितली आहे तो राजा म्हणजे साताऱ्याजवळील औंध संस्थानचे राजे भवानराव तथा बाळासाहेब पंतप्रतिनिधी. ही कथा सांगितली आहे खुद्द त्यांचे पुत्र अप्पा पंत यांनी. मात्र, स्वतःच्या वडिलांची चरित्रकथा सांगत असले, तरी त्यातील तपशील हे सत्याला धरून असतील याची पुरेपूर काळजी अप्पा पंत यांनी घेतली आहे. त्यामुळेच औंधाच्या राजाबद्दल सांगितलेल्या कथेत ओघाने येणाऱ्या स्वतःच्या चरित्रात स्वतःच्या तरुणपणातील गुण-दोषांचे अगदी निखळ वर्णन लेखकाने केले आहे.
राजा हा राज्याचा उपभोग घेण्यासाठी नव्हे तर प्रजेची सेवा करण्यासाठी असतो याचा आदर्श बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांनी आपल्या आचरणातून कसा घालून दिला याचे अत्यंत नेमके वर्णन लेखकाने केले आहे. व्यसनाधीनतेच्या आहारी न जाता नियमित सूर्यनमस्कार घालणारा आणि आपल्या प्रजेलाही सूर्यनमस्काराचे महत्त्व पटवून देणारा राजा; भारतभरात आणि परदेशात देखील सूर्यनमस्काराची महती पोहोचवण्यासाठी धडपडणारा राजा.
कीर्तनात रंगून जाणारा आणि स्वतः कीर्तने करणारा राजा; जातपात न मानता अगदी स्वतःच्या स्वयंपाकघरात सर्व जाती-धर्माच्या व्यक्तींना प्रवेश देणारा; अनेक कलाकारांना प्रेरणा देणारा राजा असे बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांचे विविध पैलू लेखकाने या पुस्तकाच्या माध्यमातून समाजासमोर आणले आहेत.
परंतु, हे गुण म्हणजे केवळ समुद्रातील शिखराचे टोक वाटावे असे काही धाडसी निर्णयदेखील बाळासाहेबांनी त्यांच्या आयुष्यात घेतले. महात्मा गांधींच्या आदर्श ग्राम या संकल्पनेनुसार आपल्या राज्यात लोकशाहीचा प्रयोग त्यांनी आपल्या राज्यात राबविला. हा प्रयोग कशा पद्धतीने यशस्वी केला? याचे वर्णन वाचताना या राजाबद्दल अधिक आदर निर्माण होतो.
सूर्यनमस्काराचा प्रसार करणाऱ्या या राजाबद्दल त्याच्या सूर्यनमस्कारावरील अस्थेबद्दल प्रदेशातील एका वृत्तपत्राने चुकीचा आणि खोटा मजकूर प्रकाशित केला, त्यानंतर या राजाच्या मुलाने काही कायदेशीर तरतुदींच्या आधारे संबंधित वृत्तपत्राला त्यांची चूक लक्षात आणून दिली.
त्यानंतर या वृत्तपत्राने त्याबद्दल माफी मागून राजाला दंडापोटी काही रक्कमदेखील पाठविली, मात्र या राजाने त्या रकमेतून काय केले हे जाणून घेण्यासाठी मात्र आपल्याला हे पुस्तक वाचावे लागेल. हे पुस्तक इंटरनेटवर पीडीएफ स्वरूपात अगदी मोफत उपलब्ध आहे.
(संकलन : रोहित वाळिंबे)