- प्रा. विजय नवले, करिअरतज्ज्ञ
भारत हा उत्सवप्रिय देश आहे. सण, समारंभ, कार्यक्रम, सोहळे, स्पर्धा, धार्मिक विधी, खानपान, यात्रा, प्रकाशन, अनावरण, उदघाटन अशा अनेक प्रकारांचे आयोजन आपल्याकडे फार आधीपासून आणि मोठ्या संख्येने चालू आहे. आता हे उत्सव नव्या स्वरूपात होताना दिसतात. कोणताही कार्यक्रम आता नेटकेपणाने, सुनियोजित पद्धतीने करण्याकडे कल आहे.
यजमानांनी स्वतः राबण्यापेक्षा तज्ञ संस्थेमार्फत कामे करवून घेण्याचा प्रघात आहे. आता त्यासोबतच प्रशिक्षिण अभ्यासक्रमांची रचना करण्यात आलेली आहे. इव्हेंट्स मॅनेजमेंटमधील विविध प्रकारचे पदवी शिक्षण बारावी नंतर उपलब्ध आहे. त्यापैकी एक पदवी आहे बीबीए इव्हेंट मॅनेजमेंट.
कालावधी व पात्रता
बारावीनंतर हा तीन वर्षांचा अभ्यासक्रम आहे. कोणत्याही शाखेतील बारावी उत्तीर्ण विद्यार्थी बीबीए इव्हेंट्स मॅनेजमेंटसाठी पात्र असतात. राज्यस्तरावर यासाठी स्वतंत्र प्रवेशपरीक्षा नाही. परंतु, काही विद्यापीठे, स्वायत्त संस्था, खाजगी तसेच अभिमत विद्यापीठे प्रथम वर्ष प्रवेशासाठी त्यांच्या प्रवेशपरीक्षा घेत असतात.
अभ्यासक्रमाचे स्वरूप
बहुतांशी ठिकाणी हा पदवी अभ्यासक्रम पूर्ण वेळ स्वरूपाचा आहे. तरीही काही ठिकाणी पार्ट टाइम स्वरूपाचे, तर काही ठिकाणी दूरस्थ पद्धतीचे इव्हेंट्स मॅनेजमेंटचे कोर्सेस असतात. सध्या तर ऑनलाईन मोडमध्येसुद्धा आपण हे शिक्षण घेऊ शकतो. पूर्ण वेळ नियमित तीन वर्षांचा महाविद्यालयीन बीबीए कोर्स हा सहा सेमिस्टरचा असतो. नियमित तासिकांच्या माध्यमातून विषयांची थिअरी शिकविली जाते.
इव्हेंट्स मॅनेजमेंटमधील अनुभवी, तज्ज्ञ प्राध्यापक वर्गात शिकवतात. हा कोर्स खासकरून प्रात्यक्षिके आणि असाइन्मेंट्सवर आधारित आहे. परीक्षेतील मार्कांपेक्षा कौशल्य प्राप्त करणे हे विद्यार्थ्यांचे ध्येय असते. बऱ्याच असाइन्मेंट्स या टीम वर्क स्वरूपाच्या असतात. काही कामे वैयक्तिक स्वरूपात शिकण्यासाठी असतात. प्रोजेक्ट वर्कमधून हे विद्यार्थी अधिक सखोलपणे शिकतात.
फिल्ड व्हिजिट्स आणि ऑन साईट काम यांचे प्रयोजन कार्यक्षेत्राचा परिचय होण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. प्रदर्शने, स्पर्धा, फेस्टिव्हल्स, प्रॉडक्ट लॉन्चिंग, कॉर्पोरेट इव्हेंट्स आदी कार्यक्रमांमधून ही मुले इंटर्नशिप करू शकली तर त्यांना प्रोफेशनल काम करण्याची पद्धत नेमकेपणाने समजते.
अभ्यासक्रमातील विषय
बिजनेस कम्युनिकेशन, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, इव्हेंट प्लॅनिंग, व्हेन्यू मॅनेजमेंट, इव्हेंट प्रॉडक्शन प्रोसेस, अकाउंट्स अँड फायनान्स, मार्केटिंग मॅनेजमेंट, प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट, स्पॉन्सरशिप, इव्हेंट रिसोर्स मॅनेजमेंट, ब्रँड मॅनेजमेंट, स्पेशल इव्हेंट्स, वेडिंग प्लॅनिंग, इव्हेंट मार्केटिंग, कॉर्पोरेट इव्हेंट्स, लीगल अस्पेक्ट्स ऑफ इव्हेंट मॅनेजमेंट, मीडिया मॅनेजमेंट, सोशल मीडिया, सॉफ्ट स्किल्स, पब्लिक रिलेशन्स, रिस्क मॅनेजमेंट, टीम वर्क, लीडरशिप, अँकरिंग, सेफ्टी मॅनेजमेंट, हॉस्पिटॅलिटी अँड हायजिन, ॲडव्हर्टायजिंग आदी विषय अभ्यासक्रमात आहेत.
पुढील शिक्षण
सीईटी, ‘कॅट’सारख्या परीक्षा देऊन एमबीए करणे शक्य आहे. त्यात इव्हेंट मॅनेजमेंटसह अन्य स्पेशलायझेशन्स करता येतात. उदा. मार्केटिंग, एचआर, इ. परदेशातसुद्धा शिक्षणासाठी जाता येईल. पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंटदेखील करता येतो. कोणत्याही पदवीनंतर जे शिक्षण घेता येते, ते शिक्षण जसे की पत्रकारितेची पदवी, लॉ, एमएसडब्ल्यू, एमए आदी शिक्षण घेता येईल.
करिअरच्या संधी
शिक्षण झाल्यानंतर पदवीधर मंडळी इव्हेंट्स मॅनेजमेंट कंपनीत सुरुवातीला काम करतात. इथे सर्व प्रकारचे एक्स्पोजर मिळाले, तर अधिक उत्तम किंवा एकाच कामातील पारंगतता आली तरी तेसुद्धा उपयुक्त आहे. टप्प्याटप्प्याने महत्त्वाच्या जबाबदाऱ्या मिळतात.
ब्रँड डेव्हलपमेंट मॅनेजर, इव्हेंट को-ऑर्डिनेटर, सेलिब्रिटी मॅनेजर, प्रमोशन मॅनेजर, डिझाइन मॅनेजर, मार्केटिंग मॅनेजर, पब्लिक रिलेशन्स ऑफिसर, लॉजिस्टिक्स एक्स्पर्ट, प्रदर्शन आयोजक, स्टेज मॅनेजर, हॉस्पिटॅलिटी हेड, सर्व्हिसेस प्रोव्हाइडर आदी पदांवर काम करण्याची संधी मिळते. अनुभवानंतर काही जण स्वतःची इव्हेंट कंपनी चालू करतात.
काही मंडळी आपल्या कौशल्यावर आधारित एखादे काम करण्याचे कॉन्ट्रॅक्ट घेण्याचा व्यवसाय करतात, तर काही जण ‘फ्री-लान्स कन्सल्टन्ट’ बनतात. उद्योजकता आणि स्वयंरोजगार या करिअरच्या मोठ्या संधी इथे आहेत. इव्हेंट्समधील शिक्षणाच्या आणि कामाच्या अनुभवाचा फायदा इतर क्षेत्रांतील संबंधित कामांमध्येसुद्धा होतो.