संत तत्त्ववेत्ता सॉक्रेटिस (इ. स. पूर्व ४७०–३९९) यांना आदरांजली वाहण्यासाठी २००२ पासून दरवर्षी जगभर नोव्हेंबरचा तिसरा गुरुवार हा दिवस ‘जागतिक तत्त्वज्ञान दिन’ म्हणून युनेस्को आणि संयुक्त राष्ट्रांतर्फे साजरा केला जातो. उद्याच्या (ता. २१) या ‘दिना’निमित्ताने एका नव्या ज्ञानशाखेचा परिचय.
आपण सध्या ‘माहिती युग’ जगत आहोत. साधे रोजचे संभाषण ते वृत्तपत्रे, दूरदर्शन, व्हाट्स अप, फेसबुक, इंस्टाग्राम ही समाज माध्यमे, जाहिराती इत्यादी आपणावर सतत माहितीचा मारा करत असतात. या साऱ्या गोंधळात ‘माहिती’ हा शब्दचं मुळात ‘माहितीपूर्ण’ आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे ‘माहिती’ चे तात्त्विक स्वरूप निश्चित करणे आवश्यक ठरते.
विसाव्या शतकात माहिती तंत्रज्ञान, माहिती आणि संगणन विज्ञान, डिजिटल माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान या नव्या विज्ञान शाखांनी ‘संगणक क्रांती’ केली. १९८० च्या दशकात ‘संगणक आणि तत्त्वज्ञान’ या विषयावर हजारो शोधनिबंध आणि शेकडो ग्रंथ लिहिले गेले.
कृत्रिम बुद्धिमत्ता आणि बोधात्मक विज्ञाने’ विषयाचे युनायटेड किंग्डम मधील तत्त्ववेत्ते आणि संशोधक अरोन स्लोमन यांच्या ‘तत्त्वज्ञानातील संगणक क्रांती’ (दि कंप्युटर रिव्होल्युशन इन फिलॉसॉफी) या १९७८ सालच्या ग्रंथाने तत्त्वज्ञान आणि संगणक विज्ञान या दोन्हीचे परस्पर अवलंबित्व आणि महत्व जगाच्या लक्षात आणून दिले. १९८५ मध्ये अमेरिकन फिलोसॉफीकल असोसिएशन या नामांकित संस्थेने ‘तत्त्वज्ञान आणि संगणक समिती’ स्थापन केली.
संगणक क्रांतीने केवळ संगणक कर्मचारीवर्ग निर्माण केला असे नव्हे तर तत्त्ववेत्त्यांनाचं ‘व्यावसायिक ज्ञान कर्मचारी’ असा वेगळा दर्जा दिला. १९९८ मध्ये वार्ड बायनम आणि जेम्स मूर यांनी संपादित केलेल्या ‘हाऊ कंप्युटर्स आर चेंजिंग फिलॉसॉफी’ (संगणक तत्त्वज्ञानात परिवर्तन कसे घडवतात) या ग्रंथाने तत्त्वज्ञानातील पारंपरिक विचार प्रक्रियेला आणि विचारांच्या विषयाला अत्यंत वेगळी कलाटणी दिली. तिला ‘संगणक कलाटणी’ म्हंटले जाते.
संगणकाची भूमिका
मन, जाणीव, अनुभव, तर्क प्रक्रिया, ज्ञान, सत्य, नीती आणि सर्जनशीलता ह्या तात्त्विक ज्ञानाच्या वस्तू आणि बुद्धी, मेंदू, मेंदूची कार्ये, मेंदूची रचना, मानसिक व मेंदूची विचारप्रक्रिया इत्यादी शरीरशास्त्रीय, जीवशास्त्रीय आणि उत्क्रांतीशास्त्रीय गोष्टींचे पूर्णपणे नवे संशोधन, ज्ञान विकसित संगणकशास्त्राच्या संदर्भात त्या त्या क्षेत्रातील शास्त्रज्ञांनी नव्याने केले.
ती सारी माहिती त्यांनी संगणकावर उपलब्ध करून दिली. या माहितीची मानवी कल्याणासाठी उपयोग करता यावा, या हेतूने ‘संगणक’ ही कल्पनाचं बदलली गेली. परिणामी ‘संगणकाची जीवनातील भूमिका’ हा तात्त्विक मुद्दा चर्चेला आला.
'संगणक म्हणजे आंतरजालाशी जोडलेला, त्या जालावर सातत्याने माहितीची देवघेव करणारा, त्या जालाचा भाग बनलेला, तुमच्याशी संवाद साधणारा, हवी ती माहिती क्षणात समोर आणून टाकणारा, त्यासाठी संगणकाची सारी विचारप्रक्रिया सातत्याने अद्ययावत ठेवू शकेल अशी विविध आवश्यक परवानाधारक सॉफ्टवेअर्स आणि हॉर्डवेअर्स स्थापित असलेला परिपूर्ण संगणक’ अशी संगणकाची व्याख्या करण्यात आली. अशा संगणकाला जणू ‘जिवंत व्यक्ती’ समजले जाते. म्हणूनच तर १९८२ मध्ये जगप्रसिद्ध ‘टाइम मॅग्झीन’ ने चक्क संगणकालाचं ‘मॅन ऑफ द इयर’ म्हणून घोषित केले.
असा ‘जिवंत बुद्धिमान संगणक’ सतत माहिती देतो आणि घेतोही. संगणक तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या मते मन हा कार्यक्रम (software) आहे, ते शरीरात मज्जातंतूंच्या कोंदणात बसलेले मांसल यंत्र आहे आणि माणसाचा मेंदू हा एक सजीव संगणक आहे. प्रत्येक व्यक्तीचे मन वेगवेगळे असल्याने प्रत्येक व्यक्तीचे वर्तन त्याच्या त्याच्या सॉफ्टवेअरनुसार वेगवेगळे घडते. याचा अर्थ मानवी निर्णय शरीरशास्त्रीय किंवा भौतिक नियमांनी घेतले जात नाहीत तर निर्णयप्रक्रिया मेंदू या संगणकाचा वापर करून होते.
नवे तत्त्वज्ञान
ज्ञान, सत्य, तर्क, नीती आणि सौंदर्य या तत्त्वज्ञानातील मूलभूत तत्त्वांची व्याख्या आणि स्वरूप या ‘जिवंत संगणका’ ने बदलली असून त्यांचे अर्थ अधिक उपयुक्ततावादी, उद्योगप्रधान, विस्तारवादी केले आहेत. संगणक हे मन, विचार, आत्मा, ईश्वर याचबरोबर समग्र ब्रह्मांडाचे आकलनाचे नवे ज्ञानसाधन बनले आहे.
त्या पार्श्वभूमीवर कृत्रिम बुद्धिमत्ता, तर्कशास्त्र, विज्ञानाचे तत्त्वज्ञान, मनाचे तत्त्वज्ञान यांच्या संशोधनातील ज्ञानविषयक चर्चेतून ‘माहितीचे तत्त्वज्ञान’ या ज्ञानशाखेचा जन्म झाला. प्राचीन काळापासून माहितीवर अनेक संस्कार केले जात आहेत. एखाद्या घटनेची बातमी ते गुप्तहेराची गुप्त माहिती व नवा शोध ह्या माहितीवर तिचे स्वरूप सुधारले जाते.
तिला यथार्थ पडताळा घेण्याजोगे विश्वसनीय आणि म्हणून समर्थनीय स्वरूप दिले जाते; तेव्हा त्या माहितीचे रुपांतर ‘ज्ञान’ मध्ये होते. ही प्रक्रिया कशी घडते, त्यातील निर्णायक घटक कोणते, त्यांची रचना कशी होते, त्यांचा उपयोग कसा करावा , तसेच या प्रक्रियेत मानवी मन, मेंदू, बुद्धि यांच्या महत्वाच्या भूमिका कोणत्या इत्यादी प्रश्नांची चर्चा करणारे हे नवे तत्त्वज्ञान आहे.
भोवतालचे नैसर्गिक जग आणि कृत्रिम मानवनिर्मित जग, याविषयी ‘हे काय आहे?’ हा प्रश्न प्राचीन काळापासून तत्त्वज्ञान उपस्थित करत आले आहे. जसे की ज्ञान म्हणजे काय? नैतिकता म्हणजे काय?, मन म्हणजे काय?, प्रेम म्हणजे काय? या पद्धतीला अनुसरून ‘माहितीचे तत्त्वज्ञान’ ही ज्ञानशाखा ‘माहिती म्हणजे काय?’ हा मूलभूत प्रश्न उपस्थित करते.
त्या संबंधी माहितीचे विश्लेषण देणाऱ्या, त्यांचे मूल्यमापन करणाऱ्या, तसेच माहितीच्या विविध संकल्पना व त्याची मूलतत्त्वे, त्यांच्यातील बदल, बदलाची गता, त्या गतीचे नियम आणि त्यांची उपयुक्तता यांचे एकसंध स्पष्टीकरण देणाऱ्या विविध सिद्धांताचे एकत्रीकरण करणे, हे कार्य हे नवे तत्त्वज्ञान करते.
माहितीच्या तत्त्वज्ञानात तीन गोष्टी कळीच्या आहेत. एक, माहितीचे मुद्दे कोणते (वस्तुस्थिती, विदा, समस्या, घटना, निरीक्षणे इत्यादी); दोन, प्रक्रियेच्या पद्धती कोणत्या (संगणकीय तंत्रे, दृष्टीकोन इत्यादी); तीन, सिद्धांत कोणते मांडले गेले (गृहीतके, स्पष्टीकरणे इत्यादी).
आधुनिक ‘निर्वाण’ मार्ग
व्यक्ती, मानवी समाज (आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय इत्यादींनी दबाव क्षमता असणारा वर्ग, वर्ण, जात-जमात, उपजात, लैंगिक इत्यादी वर्गवारी), पशुपक्षी, वनस्पती, निसर्ग घटना, व्यापारीकरण (उत्पादक-ग्राहक), विविध प्रकल्प-त्याचे वापरकर्ते, नफा-तोटा, पर्यावरण, शेतीविकास, मानवी मूल्ये इत्यादींच्या मार्फत होणारा एकूण मानवी समाजाचा विकास अन उत्क्रांती मोजण्यासाठी अनिवार्य असणाऱ्या माहितीचे तत्त्वज्ञानात्मक विश्लेषण अनिवार्य ठरते.
विद्यापीठीय तत्त्वज्ञान, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व संगणक विज्ञान, माहिती आणि जनसंपर्क विज्ञान, डिजिटल माहिती आणि संप्रेषण विज्ञान, संगणक भाषा, आणि साहित्याची भाषा या क्षेत्रातील तज्ञांनी मिळून या शाखेची रचना केली आहे. हे तत्त्वज्ञान जगाला अर्थात सामान्य रोजमर्रा जीवन जगणाऱ्या माणसाला जगाचे यथार्थ ज्ञान देणारा आणि भ्रम, असत्य, बनावटगिरी इत्यादीतून मुक्ती देणारा आधुनिक ‘निर्वाण’ मार्ग म्हणता येईल.
(लेखक तत्त्वज्ञानाचे निवृत्त प्राध्यापक आहेत.)