मुलाखतीत बोला आत्मविश्वासाने!
esakal November 20, 2024 11:45 AM

स्पर्धा परीक्षेसह विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेताना विद्यार्थ्याला मुलाखत द्यावी लागते, तसेच नोकरीसाठी उमेदवारी करताना मुलाखत चांगली होणं खूप आवश्यक असतं. अनेक विद्यार्थ्यांना मुलाखतीचा ताण येतो, बोलायची भीती वाटते, प्रश्नांची उत्तरे माहीत असली, तरी ऐन वेळी आठवत नाही. यावर कशा प्रकारे मात करता येईल, हे आपण खालील उपायांद्वारे जाणून घेऊया -

फक्त माहिती नको

कोणत्याही मुलाखतीत विद्यार्थ्याच्या ज्ञानापेक्षा त्याच्या दृष्टीकोनाची परीक्षा घेतली जाते. तो एखाद्या गोष्टीकडे कसा पाहतो, यावरून त्याचे व्यक्तिमत्त्व जोखण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे मुलाखतीची तयारी करणे म्हणजे विद्यार्थ्यांनी स्वतःच्या मनाची तयारी करणे होय. अगदी मनापासून मुलाखतीचे आव्हान स्वीकारा, मुलाखतीचे तंत्र समजून घ्या आणि आत्मविश्वासाने बोला. यासाठी लागतो मनाचा निग्रह, सराव आणि अचूकता.

मन ठेवा रे खंबीर!

स्पर्धा परीक्षेत मुलाखतीपर्यंत जाणे म्हणजे परीक्षेची अर्धी लढाई जिकंणे होय. या परीक्षेतील पूर्व व मुख्य परीक्षेमध्ये विद्यार्थ्याच्या ज्ञानाचा व आकलनाचा कस लागतो. हे दोन्ही अडथळे जे विद्यार्थी लीलया पार करतात त्यांच्यासाठीच असतो मुलाखतीचा पुढचा महत्त्वाचा टप्पा. मुलाखत म्हणजे तरुणांना आंतर-बाहृय जाणून घेण्याची प्रक्रिया होय. यासाठीच तज्ज्ञ मुलाखतकाराची नेमणूक केलेली असते.

स्पर्धा परीक्षेच्या चाळणीतून तयार झालेला विद्यार्थ्यी हा समाजातील सर्व आव्हानांना सामोरा जाणारा असावा, त्यांच्याकडून देशाची सेवा होताना कोणतीही कसर बाकी राहुन नये, समाजासमोर एखादे संकट आले, तर हा अधिकारी संकटाना घाबरून लांब न जाता त्याच्याशी दोन हात करण्यासाठी सदैव मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम असावा. मुलाखत घेणारी व्यक्ती असेच गुण विद्यार्थ्यांमध्ये शोधत असते. त्यासाठी असंख्य प्रश्न विचारून मुलाखत देणाऱ्याच्या मानसिक स्थितीचा अंदाज घेतला जातो व योग्य व्यक्तीची निवड केली जाते.

अचूकता हवी

मुलाखत आणि विद्यार्थ्यांच्या मनाचा गोंधळ याचे फार जवळचे नाते असते. मुलाखतीसाठी पात्र ठरलो याचा आंनद काही काळातच पात्र विद्यार्थ्यांच्या मनाची हुरहुर वाढवतो. मात्र, मुलाखत समोरा समोर होणार असल्याने अनेकांच्या मनाचा थोडा गोंधळ उडतोच.

या गोंधळला मुलाखतीबाबतचे काही समज व गैरसमज कारणीभूत ठरतात. गैरसमज जितके अधिक तितकी गोंधळाची स्थिती जास्त. यासाठी इतर कोणाचेही फार न ऐकता स्वतःचे मन शांत ठेवा, अभ्यासावर विश्वास ठेवा, अचूक माहिती द्या, येत नसेल तर काही तरी खोटे सांगू नका, तुम्ही घाबरला किंवा गोंधळला आहात असे समोरच्याला वाटू देऊ नका.

पूर्वतयारी

मुलाखतीची पूर्ण प्रक्रिया व पद्धती समजून घ्या. त्यासाठी आयोगाने दिलेल्या सूचना त्याच्या वेबसाइटवर जाऊन वाचा. ऐकीव गोष्टींवर फार विश्वास ठेवू नका. मुलाखतीची भीती घालणाऱ्या मित्रांपासून व शिक्षकांपासूनही या कालावधीत दूर रहा. ज्यांना मुलाखतीचा अनुभव आहे, अशा व्यक्तींचा सल्ला घ्या. मुलाखतीत मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीची काय मानसिकता असू शकेल याचा अंदाज बांधा.

जर तुम्ही स्वतः कोणाची तरी मुलाखत घेतली असती, तर काय प्रश्न विचारले असते याची एक यादी तयार करा. प्रश्नांचे उत्तर देताना हजरजबाबीपणा आणि सद्सद्विवेक सदैव जागृत ठेवा. मुलाखतीला जाण्याआधी दोन-तीन दिवसांची वर्तमानपत्रे वाचा व महत्त्वाच्या घडामोडींची माहिती घ्या.

आत्मविश्वास

सर्वांत महत्त्वाचा असतो, तो म्हणजे आत्मविश्वास! तुमच्याकडे भरपूर माहिती असून उपयोग नाही, ती माहिती अचूकपणे पोहोचवण्याला, योग्य प्रकारे मांडणी करण्याला, आपले मत ठामपणे देण्याला महत्त्व आहे आणि यालाच आपण आत्मविश्वासाने बोलणं असं म्हणतो. त्यामुळे आत्मविश्वासाने, शांतपणे, धीटपणे बोला. स्वतःवर विश्वास ठेवा. घसा कोरडा पडतो आहे असे वाटल्यास थोडे पाणी प्या.

तुम्हाला ज्या पोशाखात आरामदायी वाटेल असा पोशाख निवडा. अर्थात, तुम्ही अधिकारी होण्याच्या मुलाखतीला जात आहात, याचे पोशाख करताना भान ठेवा. एखाद्या प्रश्नाचे उत्तर माहीत नसेल, तर नाही सांगा. मात्र, चुकीची माहिती देऊन अतिआत्मविश्वासाच्या आहारी जाऊ नका.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.