“आजचा दिवस लोकशाहीच्या उत्सवाचा दिवस आहे. महाराष्ट्राचा देखील हा उत्सवाचा दिवस आहे. महाराष्ट्राला उज्वल भवितव्याकडे आणि महाराष्ट्राला शक्तीशाली आणि देशाला आर्थिक महासत्तेकडे घेऊन जाणारा हा उत्सव आहे. म्हणून या उत्सवात सर्व मतदारांनी सहभागी झालं पाहिजे. जास्तीत जास्त लोकांनी मतदान केलं पाहिजे, मतदान पवित्र कर्तव्य आहे, जबाबदारी आहे. ती प्रत्येक नागरिकाने पार पाडली पाहिजे. या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्याची मी विनंती करतो. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रत्येकाला मी मतदान करण्याच आवाहन करतो” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. आज सहकुटुंब त्यांनी ठाण्याच्या कोपरी-पाचापाखाडी विधानसभा मतदारसंघात मतदानाचा हक्क बजावला. त्यांच्यासमोर स्वर्गीय आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांचं आव्हान आहे.
“खरं म्हणजे गेल्या पाच वर्षातला कारभार या जनतेने पाहिलाय़. 2019 ला ला मतदान झालं. त्यावेळेस चुकीच्या पद्धतीने सरकार तयार झालं. जे काही महाराष्ट्रातल्या जनतेच्या अपेक्षेच्या विरुद्ध झालं. 2019 ची ती घटना जनता विसरलेली नाही. गेल्या पाच वर्षात या राज्याची दशा कोणी केली ? आणि राज्याला विकासाची दिशा कोणी दिली? हे लोकांना माहित आहे” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मतदानानंतर माध्यमांशी बोलताना म्हणाले. “या राज्यात विकास योजना सुरु केल्या, कल्याणकारी योजना ज्या आहेत, विकास लोकांना माहित आहे. लाडकी बहिण योजना आहे. या अनेक योजना सर्वसामान्यांसाठी आहेत, लाडकी बहिण, लाडका भाऊ, शेतकरी कामगारांसाठी, ज्येष्ठांसाठी आम्ही योजना आणल्या. त्याचं नक्कीच आम्हाला समाधान आहे” असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
‘मी स्वत: समाधानी आहे’
“गेल्या पाच वर्षात राज्याला पुढे नेण्यासाठी, विकासाकडे नेण्यासाठी, राज्याचा सर्वांगीण विकासासाठी लोकांच्या जीवनात बदत घडवण्यासाठी, महाराष्ट्राला शक्तीशाली बनण्यासाठी महायुतीने प्रयत्न केलाय. या राज्याकतील जनता समाधानी आहे. मी स्वत: समाधानी आहे. अडीच वर्षांचा आमचा कार्यकाळ लोकांनी पाहिलाय. महाराष्ट्रातील जनता भरभरुन विकासाला मतदान करतील. मतदानाचा वाढणारा टक्का लोकशाहीला मजबूत करणार आहे. म्हणून सगळ्यांनी मतदान करावं, अशी विनंती करतो” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ‘राज्यात पुन्हा महायुतीच सरकार बहुमताने येईल’ असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.