निवडणूक आयोगाची सिस्टीम बरोबर नाही, काँग्रेसच्या नितीन राऊत पाठोपाठ नितीन गडकरी यांचा संताप; म्हणाले.....
रजत वशिष्ठ, एबीपी माझा November 20, 2024 04:13 PM

Nagpur Vidhan Sabha Election 2024 : गेल्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) उपराजधानी नागपूरात (Nagpur) फक्त 54 टक्के मतदान झालं, म्हणजेच 46 टक्के नागपुरकरांनी आपले मतदानाचं कर्तव्य बजावलच नाही. हे ऐकून नागपूरकर किती बेजबाबदार आहेत, असंच कोणालाही वाटेल. मात्र नागपूरात कमी मतदानामागे मतदारांची अनास्था हेच एकमेव कारण नव्हते, तर मतदारयाद्यांमधील प्रचंड घोळ, राजकीय पक्षांचं दुर्लक्ष आणि प्रशासनाची (Election Commission Voter List) घोडचूक इत्यादि अनेक कारणं देखील कारणीभूत असल्याचे मत  समोर आले होते.

गेल्या लोकसभा निवडणुकीत नागपूर प्रशासनाने  75 टक्क्यांपर्यंत मतदान वाढवू, असा गाजावाजा केला. त्यासाठी कसोशीचे प्रयत्न देखील केले. मात्र प्रत्यक्षात नागपुरात फक्त 54 टक्केच मतदान होऊ शकले होते. दरम्यान याच मुद्यावरून मोठं राजकीय  रणकंदन होत हे प्रकरण थेट कोर्टापर्यंत गेलं होतं. दरम्यान, ही परिस्थिति विधानसभा निवडणुकीत सुधारेल अशी अपेक्षा होती. मात्र हाच मतदार याद्यांमधील घोळ अद्याप कायम असल्याचे चित्र आहे, त्यावरून आता  काँग्रेसच्या नितीन राऊत यांच्या पाठोपाठ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी निवडणूक आयोगाची सिस्टीम बरोबर नसल्याचे म्हणत संताप व्यक्त केला आहे. 

निवडणूक आयोगाची सिस्टीम बरोबर नाही- नितीन गडकरी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज त्यांच्या घराजवळच्या मतदान केंद्रावर जाऊन सहकुटुंब मतदान केलं. त्यानंतर त्यांनी बुथवर जाऊन कार्यकर्ते आणि पाधाधिकाऱ्यांशी विचारणा करत बूथची पाहणी केली. या पाहणी दरम्यान मतदार याद्यांमध्ये त्यांना अनेक मतदारांची नाव मतदार यादीत नसल्याने लोक नाराज होऊन परत चालले असल्याचे आढळून आले. त्यावरून नितीन गडकरी यांनी निवडणूक आयोगाची ही सिस्टीम बरोबर नाही, सिस्टीम फुल प्रूफ राहिली पाहिजे, असं बोलत नाराजी व्यक्त केली.

पोलिसांसह निवडणूक आयोगावर काँग्रेसच्या नितीन राऊतांचा गंभीर आरोप 

निवडणूक आयोगाने (Election Commission) पुरेशी तयारी न करताच निवडणूक घेतली, वेळेवर पोलिंग अधिकारी बदलले आहे. तर अनेक मतदारांचे नाव मतदार यादीतून डिलीटेड आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी गोंधळाची स्थिती असल्याचा आरोप काँग्रेस नेते नितीन राऊत (Nitin Raut) यांनी केला आहे. 

नागपुरात काही मतदान केंद्रात अडीच तासांपर्यंत मतदान थांबले होते. त्यामुळे ईव्हीएम खराब झाल्याने मतदान काही वेळ थांबले होते, त्या मतदान केंद्रावर वाया गेलेला वेळ संध्याकाळी सहानंतर वाढवून देण्यात यावा अशी मागणी ही नागपूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आणि काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी केली आहे. एवढेच नाही तर त्यांनी नागपूर पोलिसांवर दंडूकेशाहीचा आरोप करत घणाघात केला आहे. नागपूर पोलीस भाजप उमेदवारच्या सांगण्यावरून काम करत असल्याचा आरोप करत राऊत यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना बूथ लावण्याबद्दल पोलिसांनी केलेल्या विचारणेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. 

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.