नाशिक : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) 288 जागांसाठी आज मतदान (Voting) पार पडत आहे. महायुती (Mahayuti), महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि इतर पक्षांच्या एकूण 4136 उमेदवाराचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. नाशिकमधील 15 विधानसभा मतदारसंघात सकाळी सात वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली. त्यानंतर नांदगाव विधानसभा मतदारसंघात (Nandgaon Vidhan Sabha Constituency) अपक्ष उमेदवार समीर भुजबळ (Sameer Bhujbal) आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सुहास कांदे (Suhas Kande) यांच्यात जोरदार राडा झाल्याचे पाहायला मिळाले. तर दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना येवला विधानसभा मतदारसंघात (Yeola Vidhan Sabha Constituency) स्थानिक विरोधकांनी घेरल्याचे दिसून आले.
येवला विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे छगन भुजबळ आणि महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाने माणिकराव शिंदे (Manikrao Shinde) यांच्यात थेट लढत होत आहे. दोन्ही उमेदवारांनी सकाळी मतदानाचा हक्क बजावला. यानंतर छगन भुजबळ हे येवला-लासलगाव मतदारसंघातील विविध मतदान केंद्रांना गाठीभेटी देत होते. यावेळी काही स्थानिक विरोधकांनी त्यांना अडवले. येवल्यातील खरवंडी मतदान केंद्रावर ही घटना घडली. स्थानिक विरोधक व छगन भुजबळांमध्ये काही काळ बाचाबाची देखील झाली. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.'मी उमेदवार असल्याने मला मतदान केंद्रात जाण्याचा अधिकार आहे, असे यावेळी भुजबळांनी स्थानिक उमेदवारांना म्हटले.
तर नगरसुल येथे छगन भुजबळ आणि माणिकराव शिंदे यांची अचानक समोरासमोर भेट झाली. त्यावेळी भुजबळ यांनी शिंदे यांच्याशी हस्तांदोलन केले. तसेच भुजबळ आणि शिंदे यांनी एकमेकाला शुभेच्छा दिल्या. हे पाहून सारेच अचंबित झाले. दोन्ही उमेदवार एकमेकाविरोधात उभे असतानाही त्यांच्यातील अशा प्रकारचा अतिशय दिलखुलास गप्पा मारल्याने राज्यकीय वर्तुळात या भेटीची जोरदार चर्चा रंगली. दरम्यान, शिंदे यांच्यासह अनेकांनी वीस वर्षांपूर्वी छगन भुजबळ यांना येवल्यातून उमेदवारी करण्याचा आग्रह धरला. त्यानंतर भुजबळ यांनी तो मान्य केला. तेव्हापासून भुजबळ हे सलग चार वेळा येवल्यातून निवडून येत आहेत. मात्र यंदा निवडणुकीपूर्वी अचानक शिंदे यांनी भुजबळ यांची साथ सोडत त्यांच्या विरोधात उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला. मात्र आता मतदानाच्या दिवशीच दोन्ही उमेदवारांची भेट झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
आणखी वाचा