टीम इंडियाचा युवा आणि स्फोटक फलंदाज तिलक वर्मा याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि चौथ्या टी 20i सामन्यात सलग 2 शतकं झळकावली. तिलक वर्मा याने यासह संजू सॅमसन याच्या सलग 2 टी 20i शतकांच्या विक्रमाची बरोबर केली. तिलकला या कामगिरीचा जबरदस्त फायदा झाला आहे. आयसीसीने टी 20i रँकिंग जाहीर केली आहे. तिलक वर्माने या रँकिंगध्ये मोठी झेप घेतली आहे. तिलकला या 2 शतकांमुळे थोडाथोडका नाही, तर तब्बल 69 स्थांनाचा फायदा झाला आहे. तिलकने यासह टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव यालाही मागे टाकलं आहे.
तिलक वर्मा या रँकिंगआधी टी 20i रँकिंगमध्ये 72 व्या स्थानी होता. मात्र त्याला 2 शतकांमुळे जबरदस्त बूस्टर मिळाला आहे. तिलक 72 व्या क्रमांकावरुन थेट तिसऱ्या स्थानी येऊन पोहचला आहे. तिलकने आपलाच कर्णधार सूर्यकुमार यादव याला मागे टाकला आहे. सूर्याला एका स्थानाने नुकसान झाल्याने त्याची चौथ्या स्थानी घसरण झाली आहे. तिलकची रेटिंग 806 तर सूर्याची 788 इतकी आहे. टॉप 10 मध्ये या दोघांव्यतिरिक्त यशस्वी जयस्वाल हा देखील आहे. यशस्वी यालाही एका स्थानाचं नुकसान झालं आहे. यशस्वी सातव्यावरुन आठव्या क्रमांकावर आला आहे. यशस्वीच्या खात्यात 706 रेटिंग पॉइंट्स आहेत.
टीम इंडियाचा विकेटकीपर बॅट्समन संजू सॅमसन याने 35 दिवसांमध्ये 3 टी 20i शतकं केली. संजू या 3 शतकांनंतर 17 स्थानांची झेप घेत 22 व्या क्रमांकावर पोहचला आहे. संजू सॅमसन याच्या नावावर एका वर्षात 3 टी 20i शतकं करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड आहे.
तिलक वर्माची मोठी झेप
दरम्यान या बॅट्समन रॅकिंगमध्ये ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज ट्रेव्हिस हेड पहिल्या स्थानी आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर इंग्लंडचा फिल सॉल्ट आहे. हेड आणि सॉल्ट या दोघांचे रेटिंग पॉइंट्स अनुक्रमे 855 आणि 828 इतके आहेत.