BJP solves home minister’s rift; shinde’s Shiv Sena will get these ministries
Marathi December 03, 2024 11:26 PM


मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेचे मुख्यनेते आणि विद्यमान काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदावरील दावा तर सोडला. पण, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सध्या असलेले गृहमंत्रिपद मिळावे, म्हणून ते अडून बसले होते. हे पद दिले, तर सत्तेत सहभागी होऊ अथवा सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याचा विचार एकनाथ शिंदे यांच्या मनात चालल्याची चर्चा होती. मात्र, शिंदेंचं मन वळविण्यात भाजपच्या वरिष्ठांना यश आले असून ते सत्तेत सहभागी होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी ‘आपलं महानगर’ला दिली आहे. (BJP solves home minister’s rift; shinde’s Shiv Sena will get these ministries)

28 नोव्हेंबरला अमित शहा यांच्या उपस्थितीत दिल्लीत महायुतीच्या नेत्यांची एक बैठक झाली. या बैठकीला काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे तिघेही उपस्थित होते. यावेळी एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्यासमोर तीन पर्याय ठेवले.

– Advertisement –

हेही वाचा – Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा; म्हणाले, “एकनाथ शिंदेंना दिल्लीतील…”

पहिला होता, मुख्यमंत्रिपदाचा. शिंदेंचे म्हणणे होते की, “विधानसभा निवडणुका माझ्या नेतृत्त्वाखाली लढल्यानं महिला, ओबीसी आणि मराठा मतदारांनी महायुतीच्या बाजूने कौल दिला. मीच पुन्हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होईन या अपेक्षेने जनतेने मतदान केले. त्यामुळे मला मुख्यमंत्री न केल्यास जनतेत चुकीचा संदेश जाईल.”

– Advertisement –

दुसरा पर्याय होता, मुख्यमंत्रिपद न मिळाल्यास काही मंत्रिपदांचा. “देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री केल्यास गृहमंत्री, अर्थमंत्री आणि महसूलमंत्री ही खाती शिवसेनेला देण्यात यावी. मगच, उपमुख्यमंत्रिदाचा निर्णय घेऊ,” असे शिंदेंनी अमित शहा यांना सांगितले.

तिसरा होता, सत्तेतून बाहेर राहण्याचा आणि सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याचा. गृह, अर्थ आणि महसूल ही तीन खाती शिवसेनेला दिली नाहीतर सरकारमध्ये शिवसेनेचा सहभाग असणार नाही. राज्य सरकारला शिवेसना बाहेरून पाठिंबा देईल. पक्षाचे खासदार सुद्धा नरेंद्र मोदी यांच्या सरकारला हिंदुत्त्वासाठी बाहेरून पाठिंबा देतील,” असे आश्वासन शिंदे यांनी अमित शहा यांना दिले.

मात्र, मुख्यमंत्रिपद सोडण्यास भाजपनं स्पष्ट शब्दांत नकार दिला. त्यामुळे शिंदे हे गृहमंत्रिपदावर अडून बसले. दिल्लीतील बैठकीनंतर शिंदे हे साताऱ्यातील दरे गावाला निघून गेले. त्यांचे सगळे कार्यक्रम देखील रद्द करण्यात आले. त्यामुळे ते भाजपवर नाराज असल्याची चर्चा होती. दोन दिवसांच्या मुक्कामानंतर शिंदे हे ठाण्यात आले. दरे गावात शिंदे आजारी होते. ठाण्यात आल्यावर डॉक्टरांनी शिंदेंना आराम करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे ते कोणासही भेटले नाहीत.

असे असले तरी राजकीय हालचाली सुरूच होत्या. भाजपकडून शिंदेंची मनधरणी करण्याचा प्रयत्न सुरू होता. त्याप्रमाणेच, शिंदेंच्या शिवसेनेतील आमदारांनी सत्तेच्या बाहेर राहण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे अखेर शिंदेंनी सत्तेत सहभागी होण्यास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

हेही वाचा – Maharashtra CM : मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेदरम्यानच फडणवीसांचा शिंदेंना फोन; काय आहे नेमकं प्रकरण

सूत्रांनी ‘आपलं महागनर’ला दिलेल्या माहितीनुसार, शिंदेंच्या शिवसेनेला उपमुख्यमंत्री आणि नगरविकास ही खाती देण्यात येणार आहेत. त्यामुळे शिंदेंनी गृहमंत्रिपदावरील दावा सोडला आहे. आता एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची एकत्रित बैठक होणार आहे.

एकनाथ शिंदे यांनी सत्तेत सहभागी व्हावं…

एकनाथ शिंदे यांनी सत्तेच्या बाहेर राहून काम करणार, असं म्हटल्याचा दावा शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी केला होता. “‘मी सत्तेच्या बाहेर राहून काम करतो,’ असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं. पण, तुम्ही सत्तेत राहूनच काम करायचं, असा आमचा आग्रह होता. एकनाथ शिंदे यांनी सत्तेच्या प्रक्रियेत सहभागी व्हावं, असा आमचा आग्रह असल्याचे गोगावले म्हणाले होते.


Edited by : Akshay Sable



Source link

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.