लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससीकडून मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. मुख्य परीक्षेत सहभागी झालेले विद्यार्थी यूपीएससीच्या upsc.gov.in आणि upsconline.nic.in या अधिकृत वेबसाईट जावून आपला निकाल बघू शकणार आहेत. मुख्य परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांना आता मुलाखतीसाठी बोलावलं जाणार आहे. या मुलाखतीमधून जे उमेदवार पास होतील त्यांचं आयएएस, आयपीएस, आयएफएस यांसह विविध सेवांसाठी सिलेक्शन होईल. यूपीएससी परीक्षा तीन टप्प्यात आयोजित केली जाते. यामध्ये प्राथमिक परीक्षा, नंतर मुख्य परीक्षा आणि नंतर मुलाखत यांचा समावेश आहे. यावर्षी यूपीएससीची पहिली परीक्षा 16 जूनला आयोजित करण्यात आली होती. तर मुख्य परीक्षा 20, 21, 22, 28 आणि 29 सप्टेंबर या तारखांना आयोजित करण्यात आली होती.
यूपीएससीद्वारे यावेळी एकूण 1 हजार पदांसाठी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची भरती केली जाणार आहे. या परीक्षेत कट-ऑफ पेक्षा जास्त गुण मिळवणारे उमेदवार भारतीय प्रशासकीय सेवा (IAS), भारतीय परराष्ट्र सेवा (IFS), भारतीय पोलीस सेवा (IPS) आणि इतर केंद्रीय सेवा आणि पदांवर भरतीसाठी पात्र असतील. या मुख्य परीक्षेत यशस्वी झालेल्या सर्व उमेदवारांना 13 ते 19 डिसेंबर दरम्यान त्यांचा अर्ज (DAF-II) भरावा लागेल आणि सबमिट करावा लागेल.
उमेदवारांच्या मुलाखतीनंतर सर्व उमेदवारांच्या मार्कशीट अंतिम निकाल प्रकाशित झाल्यापासून 15 दिवसांच्या आत UPSC च्या अधिकृत वेबसाईटवर अपलोड केल्या जातील, जे 30 दिवसांच्या कालावधीसाठी उपलब्ध असतील. अधिक माहितीसाठी, उमेदवार UPSC च्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in ला भेट देऊ शकतात.