ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात ब्रिस्बेनमध्ये झालेला सामना हा पावसामुळे ड्रॉ राहिला. त्यामुळे ही मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. आता या बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील कसोटी मालिकेत एकूण 2 सामने बाकी आहेत. या उर्वरित चौथ्या आणि पाचव्या सामन्याआधी संघाला मोठा झटका लागला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भीती व्यक्त केली जात होती तसंच झालंय. ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू जोश हेझलवूड हा दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने याबाबतची माहिती दिली आहे.
ऑस्ट्रेलियाने अंतिम 2 सामन्यांसाठी 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. हेझलवूडला दुखापतीमुळे या उर्वरित मालिकेतून बाहेर पडावं लागलं आहे. हेझलवूडला स्नायूंच्या दुखापतीमुळे बाहेर व्हावं लागलं. हेझलवूडला ब्रिस्बेन कसोटीआधी सरावादरम्यान त्रास जाणवला. हेझलवूड त्यानंतरही तिसऱ्या सामन्यात खेळला. मात्र हेझलवूडला याच दुखापतीमुळे तिसऱ्या सामन्यादरम्यान मैदान सोडावं लागलं होतं. त्यानंतर हेझलवूडला या मालिकेतून बाहेर व्हावं लागणार असल्याचं म्हटलं जात होतं. आता तो अधिकृतरित्या बाहेर झाला आहे. त्यामुळे हेझलवूड याच्या जागी सीन ऍबॉट आणि झाय रिचर्डसन या दोघांचा समावेश करण्यात आला आहे.
दरम्यान जोश हेझलवूड याने या मालिकेतील पहिल्या सामन्यात एकूण 5 विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या सामन्यातून त्याला बाहेर व्हावं लागलं. त्यामुळे हेझलवूडच्या जागी स्कॉट बोलँड याला संधी देण्यात आली. त्यानंतर हेझलवूडने तिसऱ्या सामन्यात कमबॅक केलं आणि बाहेर झाला. त्यामुळे आता हेझलवूडच्या जागी प्लेइंग ईलेव्हनमध्ये कुणाचा समावेश केला जाणार? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.
अंतिम 2 सामन्यांसाठी ऑस्ट्रेलिया संघ : पॅट कमिन्स (कर्णधार), शॉन ॲबॉट, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, ट्रेव्हिस हेड (उपकर्णधार), जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, सॅम कोन्स्टास, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, मिचेल मार्श, झाय रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ (उपकर्णधार), मिचेल स्टार्क आणि ब्यू वेबस्टर.
बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यु ईश्वरन, देवदत्त पडिक्कल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), सर्फराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नीतीश कुमार रेड्डी आणि वॉशिंगटन सुंदर.