वूमन्स टीम इंडियाने पहिल्यावहिल्या अंडर 19 आशिया कप स्पर्धेतील अंतिम फेरीत धडक मारली आहे. टीम इंडियाने सुपर 4 मधील सामन्यात श्रीलंकेवर 4 विकेट्सने विजय मिळवला. श्रीलंकेने टीम इंडियाला विजयासाठी 99 धावांचं आव्हान दिलं होतं. टीम इंडियाने हे आव्हान 31 बॉलआधी पूर्ण केलं. भारताने 14.5 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 102 धावा केल्या आणि अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. टीम इंडियाकडून गोंगाडी त्रिशा आणि जी कामालिनी या दोघींनी सर्वाधिक धावा केल्या. तर इतरांनीही छोटेखानी खेळी करत विजयात योगदान दिलं. तर 4 विकेट्स घेणाऱ्या आयुषी शुक्ला हीला ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्काराने गौरवण्यात आलं.
टीम इंडियासाठी गोंगाडी त्रिशा हीने 24 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 3 फोरसह 32 रन्स केल्या. तर जी कामालिनी हीने 26 चेंडूंमध्ये 3 चौकार आणि 1 षटकारासह 28 धावा केल्या. तर मिथीला विनोद हीने 12 बॉलमध्ये 4 फोरसह नॉट आऊट 17 रन्स करत टीम इंडियाला विजयी केलं. तर इतर फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला नाही. श्रीलंकेकडून चामोडी प्रबोदा हीने 3 विकेट्स मिळवल्या. तर शशिनी गिमहानी हीने दोघांना बाद केलं.
त्याआधी टीम इंडियाने टॉस जिंकत श्रीलंकेला बॅटिंगसाठी भाग पाडलं. भारतीय गोलंदाजांनी कर्णधार निकी प्रसाद हीचा निर्णय योग्य ठरवला. भारतीय गोलंदाजांसमोर श्रीलंकेच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. मात्र कर्णधार मनुडी नानायकारा आणि सुमुदु निसांसला या दोघींनी छोटेखानी खेळी करत श्रीलंकेची लाज राखली. मनुडी नानायकारा आणि सुमुदु निसांसला दोघींनी प्रत्येकी 33 आणि 21 धावा केल्या. भारतासाठी आयुषी शुक्ला हीने सर्वाधिक 4 विकेट्स मिळवल्या. पारुनिका सिसोदीया हीने दोघांना बाद केलं. तर शबनम शकील आणि द्रीथी केसरी या दोघींनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
आयुषी शुक्ला ‘मॅन ऑफ द मॅच’
दरम्यान आता अंडर 19 आशिया कप महाअंतिम सामन्यात भारतासमोर बांगलादेशचं आव्हान असणार आहे. दोन्ही संघांमध्ये ट्रॉफीसाठी जोरदार चुरस पाहायला मिळणार आहे. हा सामना रविवारी 22 नोव्हेंबरला खेळवण्यात येणार आहे.