राष्ट्रवादीत पुन्हा महाभूकंप?, छगन भुजबळ मोठा निर्णय घेणार?; अंतर्गत हालचाली वाढल्या
GH News December 21, 2024 03:09 PM

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची काही नाराजी अद्याप सुरू झालेली नाही. छगन भुजबळ यांनी पक्षातील तीन बड्या नेत्यांवर आरोपांची राळ उडवल्यानंतरही राष्ट्रवादीचा एकही नेता भुजबळ यांची समजूत घालण्यासाठी आलेला नाही. त्यामुळे छगन भुजबळ हे राष्ट्रवादीत एकाकी पडल्याचं चित्र आहे. या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ उद्यापर्यंत मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. भुजबळ आज मुंबईत येणार असून दोन दिवस समर्थकांशी चर्चा करूनच निर्णय घेणार आहेत. त्यामुळे अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीत मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नाराजी व्यक्त करूनही एकही नेता भेटायला आला नाही, किंवा एकाही नेत्याने विचारपूस केली नसल्याने भुजबळ अधिकच नाराज झाल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळेच भुजबळ यांच्या अंतर्गत हालचाली वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भुजबळ आज आणि उद्या मुंबईतील ओबीसी नेत्यांची भेट घेणार आहेत. त्यांची मते जाणून घेणार आहेत. त्यानंतरच ते मोठा निर्णय घेणार असल्याचं सांगितलं जात आहे, असं सूत्रांनी सांगितलं.

अजितदादांवर हल्ला

नाशिकमध्ये भुजबळ यांनी नाशिकमध्ये समता परिषदेच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. त्यावेळी सर्वच नेत्यांनी त्यांना वेगळा निर्णय घेण्याचा आग्रह धरला होता. भुजबळ यांनीही यावेळी मनातील भावना व्यक्त करताना अजित पवारांवर टीका केली होती. त्यांच्या एकाधिकारशाहीवर भुजबळांनी हल्ला चढवला होता. मात्र, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी साथ दिल्याचं म्हटलं होतं. पण त्यानंतरही राष्ट्रवादीचा एकही नेता भुजबळ यांना भेटायला गेला नाही. एकाही आमदार किंवा मंत्र्याने भेट न घेतल्याने भुजबळ पक्षात एकाकी पडल्याचं चित्र आहे. त्यामुळे भुजबळ अधिकच अस्वस्थ झाल्याचं सांगितलं जात आहे.

तीन पर्याय?

छगन भुजबळ यांनी अजित पवार यांच्यापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला तर भुजबळांसमोर तीन पर्याय असल्याचं सांगितलं जात आहे. एक म्हणजे शरद पवार गटात प्रवेश करणं, दुसरं म्हणजे भाजपमध्ये प्रवेश करणं आणि तिसरं म्हणजे ओबीसींचं देशव्यापी संघटन उभं करणं. त्यामुळे भुजबळ कोणता पर्याय निवडतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

आमच्याकडे या, भुजबळांना आवतन

दरम्यान, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांनी छगन भुजबळ यांना शरद पवार गटात येण्याचं आवतन दिलं आहे. छगन भुजबळ हे तळागाळातून आलेले नेतृत्व आहे. त्यांना मंत्रिपदापासून डावलून त्यांच्यावर अन्याय करण्यात आला आहे. भुजबळ जर आमच्याकडे आले तर आम्ही त्यांचे स्वागत करू, अशी प्रतिक्रिया निलेश लंके यांनी दिली आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.