- बेलाजी पात्रे
हिंजवडी - आगामी ऑलिंपिक व विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धात सुवर्णपदकावर नाव कोरून देशाचे आणि मुळशी तालुक्याचे नाव उज्वल करण्याचे स्वप्न उरी बाळगून प्रचंड मेहनत घेणारी सुवर्णकन्या हिमानी चोंधेला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तिच्या पंखांना बळ देण्यासाठी दानशूरांनी पुढे येण्याची गरज आहे.
भुगावची कन्या हिमानी ही १० मीटर एअर रायफल शूटिंग प्रकारातील राष्ट्रीय नेमबाजपटू आहे. सध्या ती भोपाळ राष्ट्रीय स्पर्धेत खेळत आहे. शालेय वयापासून नेमबाजीमध्ये अव्वल स्थान तिने प्राप्त करत आंतरशाला, जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवर ती यश मिळवत गेली.
अर्जुन पुरस्कारार्थी नेमबाजपटू अंजली भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली हिमानी सराव करत आहे. विविध स्पर्धात भाग घेत आतापर्यंत तिने २४ सुवर्ण, ६ रौप्य, ३ कांस्य पदकांची कमाई केली आहे. २०२३ मध्ये तिने राष्ट्रीय पातळीवर अव्वल गुणानुक्रमांक मिळवून देदीप्यमान कारकीर्दीकडे सर्वांचे लक्ष वेधले होते. २०१८ मध्ये राष्ट्रीय स्तरावर व अन्य स्पर्धातही सुवर्णपदके पटकावली आहेत.
दोनवेळा आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही ती सहभागी झाली होती. खडतर प्रवास करून ती इथवर पोहचली आहे. ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करत १० मीटर इनडोअर एअर रायफलमध्ये सुवर्ण पदकासह जगात अव्वल नेमबाज होण्याचं तिचं स्वप्न आहे.
मात्र, प्रचंड गुणवत्ता आणि प्रतिभा असूनही घरची नाजूक परिस्थिती तिच्या खेळाच्या आड येत आहे. तिच्या पंखात ताकद येण्यासाठी तिला आर्थिक पाठबळ देण्याची गरज आहे. सध्या आर्थिक अडचणींचा सामना करत ती खेळाला सामोरी जात आहे.याबाबत तिचे वडिल सूर्यकांत चोंधे यांनीही आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे.
असा आहे खर्च
हिमानीला नेमबाजीच्या सरावासाठी आधुनिक साहित्याची गरज आहे. दिवसाला किमान ४ हजार रुपयांचे पॅलेट्स (गोळ्या) लागतात. शिवाय आधुनिक रायफलची आवश्यकता आहे. तिची किंमत सुमारे ४ लाख आहे. त्यामुळे आगामी स्पर्धांसाठी अतिशय खर्चिक असलेला सराव तिला झेपत नाही.
शिवानी अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातील असून, वडील सूर्यकांत हे भूगाव येथे झेरॉक्स दुकान चालवतात. त्यांचाही नुकताच मोठा अपघात झाला होता, त्यातून ते थोडक्यात बचावले आहेत. दवाखाना अन दुसरीकडे शिवानीचा खर्चिक सराव म्हणजे त्यांच्यापुढे मोठा डोंगर बनून उभा आहे.
हिमानीची गुणवत्ता पाहता भविष्यात ती देशासाठी योगदान देईल, या आशेने आम्ही तिच्यासाठी शक्य तेवढे प्रयत्न करत आलोय. ती खूप जास्त मेहनती आहे आणि जिद्दी आहे. तिला थांबविण्याची इच्छा मला नाही. मात्र, अलीकडे अपघातामुळे माझे कुटुंब अतिशय आर्थिक विवंचनेत सापडले आहे. हिमानीचा खर्च आता पेलवेनासा झाला आहे. समाजाने तिला आर्थिक आधार दिल्यास ती सर्वस्व पणाला लावून देशासाठी पदके जिंकेल, असा मला विश्वास आहे.
- सूर्यकांत चोंधे, हिमानीचे वडील
हिंजवडीकर धावले मदतीला
हिंजवडीचे माजी उपसरपंच तानाजी हुलावळे व मित्रपरिवार हिमानीच्या मदतीसाठी सरसावले आहेत. त्यांनी १ लाख ३० हजार रुपयांची मदत तिच्याकडे सुपूर्त केली. या वेळी उद्योजक आनंद बुचडे, बाबासाहेब साखरे, विनायक चोथे, रोहिदास धुमाळ उपस्थित होते. हिमानी प्रतिभावान नेमबाज असून, तिच्या खडतर प्रवासात आर्थिक अडचण येऊ नये म्हणून आम्ही यथाशक्ती मदत केलीय, असे मत तानाजी हुलावळे यांनी व्यक्त केले.