: सध्याच्या काळात लग्नसराईवर लाखो-कोटींचा खर्च होत आहे. त्यामुळे लग्नसराईचे बजेट मोठ्या प्रमाणात वाढत आहे. एका अहवालानुसार, येत्या काही महिन्यांत देशात 35 लाखांहून अधिक विवाहसोहळे पार पडले जाणार आहे. ज्यावर 4.25 लाख कोटी रुपये खर्च होऊ शकतात. जर तुमच्या कुटुंबातील कोणाचे लग्न होणार असेल किंवा तुम्ही स्वतः लग्न करणार असाल तर लग्नाचा विमा ही गोष्ट उपयुक्त ठरू शकते. लग्नाचा विमा घेणे का महत्त्वाचे आहे याचा काय फायदा होणार ते सविस्तर जाणून घेऊयात.
लग्नाचा विमा का आवश्यक आहे?
आजच्या युगात लग्नांमध्ये प्रचंड खर्च होतो. लग्नसमारंभात कोणत्याही कारणामुळे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी विवाह विमा ही उपयुक्त गोष्ट आहे. हा असा विमा आहे ज्यामुळे आपले कार्य रद्द होणे किंवा पुढे ढकलणे अशा कोणत्याही व्यत्ययामुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानापासून आपल्याला संरक्षण मिळते. नैसर्गिक आणि मानवनिर्मित धोक्यांमुळे वैयक्तिक किंवा सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाल्यास या विण्याचा फायदा होतो.
लग्नाच्या विम्याचे फायदे
नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींमुळे विवाह सोहळा रद्द करणे, मालमत्तेचे नुकसान किंवा दुखापत/मृत्यू या विम्यांतर्गत समाविष्ट आहेत. तसेच अवकाळी पाऊस, वादळ, गारपीट, त्सुनामी अशा घटना तसेच आग, भूकंप, पूर (परिणामी कार्यक्रम रद्द करणे) यामुळे लग्नस्थळाचे नुकसान झाल्यास विम्याचे पैसे मिळतात. तसेच लग्नाच्या वेळी दंगल, कर्फ्यू (स्थानिक पोलिस आणि/किंवा संबंधित सरकारी प्राधिकरणाने घोषित केल्यानुसार) यामुळे वधू, वर आणि रक्ताच्या नातेवाईकांचा मृत्यू झाल्यास विम्याचा फायदा होतो.
कोणत्या परिस्थितीत तुम्हाला लाभ मिळणार नाही?
लग्नाच्या विम्यात प्रत्येक गोष्ट कव्हर केली जात नाही. अचानक वाढलेले बजेट आणि इतर वैयक्तिक निर्णय कव्हर केले जात नाहीत. त्यामुळे, पॉलिसीचे नियम नीट वाचाव्यात. कोणत्या परिस्थितीत विमा कंपन्या लाभ नाकारू शकतात हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. अन्यथा याचा तुम्हाला फटका बसू शकतो. हा विमा घेण्यासाठी तुम्हाला 2 लाखांपर्यंतचे संरक्षण, 4 आणि 6 लाखांपर्यंतचे संरक्षण उपलब्ध आहे. त्यानुसार याच्या किमती बदलत जातात.