Robin Uthappa Arrest Warrant: माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पा अडचणीत, अटक वॉरंट जारी
Robin Uthappa: टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. त्याच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. ही बातमी समोर आल्यानंतर क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. उथप्पा एकेकाळी टीम इंडियाचा महत्त्वाचा खेळाडू होता. मात्र आता त्याला अटक होण्याची शक्यता आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
पीएफ घोटाळ्याचा आरोप
माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पावर भविष्य निर्वाह निधी (PF)घोटाळ्याचा आरोप आहे. प्रादेशिक पीएफ आयुक्त सदक्षरी गोपाल रेड्डी यांनी उथप्पाविरुद्ध हे अटक वॉरंट जारी केले आहे. यासोबतच पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेऊन आवश्यक ती कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात उथप्पाची अडचण वाढण्याची शक्यता आहे.
उथप्पाने या कंपनीत केला घोटाळा
रॉबिन उथप्पा हा सेंच्युरीज लाइफस्टाइल ब्रँड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे व्यवस्थापन पाहत होता. रॉबिनवर कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या पगारातून पीएफ कापून नंतर त्यांच्या खात्यात जमा न केल्याचा आरोप होता. अहवालानुसार हा संपूर्ण घोटाळा 23 लाख रुपयांचा असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याला आता अटक होण्याची शक्यता आहे.
आयुक्त गोपाल रेड्डी यांनी पुलकेशीनगर पोलिसांना पत्र लिहून या वॉरंटची अंमलबजावणी करणार असल्याचे सांगितले आहे. मात्र उथप्पाने आपले राहण्याचे ठिकाण बदलले आहे, त्यामुळे पोलिसांना हे वॉरंट पीएफ कार्यालयात परत करावे लागले. त्यानंतर पोलीस आणि पीएफ विभाग माजी क्रिकेटपटूच्या निवासस्थानाचा शोध घेत आहेत. हे प्रकरण कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेशी निगडीत असल्याने याकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. सध्या पोलीस आणि पीएफ विभाग संयुक्तपणे याचा तपास करत आहेत.
क्रिकेट विश्वात खळबळ
रॉबिन उथप्पाचे नाव भारतीय क्रिकेटमधील लोकप्रिय नाव आहे. त्याने भारतीय संघासाठी अनेक महत्त्वपूर्ण खेळी केल्या आहेत. मात्र, सध्या तो वादाच्या भोवऱ्यात सापडला असून, त्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये आणि क्रिकेट विश्वात निराशेची लाट पसरली आहे. आता रॉबिन उथप्पा या आरोपाचा सामना कसा करतो हे पाहने महत्वाचे ठरणार आहे. याप्रकरणी पुढील कारवाईनंतर अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.