नागपूर : राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना केंद्रीयकृत पद्धतीने गणवेश देण्याची योजना यावर्षी कार्यान्वित करण्यात आली. मात्र, या योजनेत हजारो विद्यार्थ्यांना गणवेशापासून वंचित राहण्याची वेळ आली.
त्यामुळे आता पुन्हा राज्याच्या शिक्षण विभागाने ‘एक राज्य एक गणवेश’ योजनेंतर्गत शाळा स्तरावर व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून दोन गणवेश उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दोन गणवेश देण्यात येतात. यापूर्वी शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात येत होते.
त्यासाठी शाळेच्या खात्यावर पैसे टाकण्यात येत होते. दरम्यान गेल्यावर्षी मुंबईतून केद्रीयकृत समितीच्या माध्यमातून गणवेश देण्याचा निर्णय झाला. मात्र, या निर्णयानंतर अद्यापही हजारो विद्यार्थी गणवेशापासून वंचित राहीले.
त्यामुळे या प्रकाराने शिक्षण विभागाची चांगलीच नाचक्की झाली. त्यामुळे या यंत्रणेत बदल करून पूर्वीप्रमाणे गणवेशाचे वितरण करण्याचा निर्णय शिक्षण सचिव आय ए कुंदन यांनी घेतला. त्यानुसार राज्यात ‘एक राज्य एक गणवेश’ योजनेतंर्गत विद्यार्थांना गणवेश देण्यात येईल. त्याचा रंग एकसारखा असणार आहे.
असा असेल गणवेशविद्यार्थ्यांना आकाशी रंगाची शर्ट आणि निळ्या रंगाची पॅन्ट, विद्यार्थिनिंसाठी आकाशी रंगाची बाह्या असलेली गडद निळ्या रंगाची पिनो- फ्रॉक, आकाशी रंगाची शर्ट आणि गडद निळ्या रंगाची स्कर्ट, सलवार कमीज असल्यास रडद निळ्या रंगाची सलवार आणि आकाशी रंगाची कमीज असेल.