अभिनेत्याने मध्येच सोडली 'लक्ष्मीच्या पावलांनी' मालिका; खरं कारण सांगत म्हणाला- मला सतत फोन...
esakal December 21, 2024 07:45 PM

स्टार प्रवाहची लोकप्रिय मालिका 'लक्ष्मीच्या पावलांनी' सध्या टीआरपी यादीत टॉप १० मध्ये आहे. मालिकेची कथा आणि मालिकेतील कलाकारदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. कला आणि अद्वैत यांच्यातील भांडणं आणि फुलणारं प्रेम हे दोन्ही प्रेक्षकांना आवडतंय. मात्र अशातच नुकतीच एका अभिनेत्याने या मालिकेतून एक्झिट घेतली होती. आता त्यावर अभिनेत्याने मौन सोडलं आहे. त्याने स्वतः एक व्हिडिओ शेअर करत ही मालिका सोडण्याचं कारण सांगितलंय.

मालिकेत अद्वैतचे तीन भाऊ दाखवण्यात आले आहेत. त्यातील एक राहुल म्हणजेच अभिनेता ध्रुव दातार याने मालिका मध्येच सोडण्याचा निर्णय घेतला. तो मालिकेत खलनायकाची भूमिका साकारत होता. मात्र आता नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये त्याने मालिका सोडण्याचं कारण सांगितलंय. सतत चाहते त्याला तू मालिका का सोडलीस असा प्रश्न विचारत होते. त्यावर त्याने उत्तर दिलंय. आपण वैयक्तिक कारणांमुळे मालिका सोडली असल्याचं त्याने सांगितलंय.

ध्रुवने एक व्हिडिओ शेअर केलाय. त्यात तो म्हणाला, 'माझा हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे मला खूप लोकांचे फोन, प्रश्न येतात की तू सिरीयल का सोडलीस. तर माझ्या काही वैयक्तिक कारणांमुळे मला ही सिरीयल सोडावी लागली. पण जो काही मला रिस्पॉन्स येतोय की आम्ही तुला मिस करतोय. तुझं काम खूप छान होतं. तर खूप खूप धन्यवाद. तुम्ही जो मला पाठिंबा दाखवलाय. तुम्ही जसा मला सपोर्ट केलाय तसाच नवीन राहूलला पण दाखवा. भेटू लवकरच. असच प्रेम करत राहा.'

ध्रुव दातारने मालिका सोडल्यानंतर त्याच्या जागी आता नवीन अभिनेता दिसणार आहे. अभिनेता अद्वैत कडणे ही भूमिका साकारणार आहे. तो यापूर्वी 'आई कुठे काय करते' आणि 'शुभविवाह' या मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता तो नवीन भूमिकेत दिसत आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.