CM Devendra Fadnavis : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरातून जीएसटी चोरीचा शोध; मूल्यवर्धित कर सुधारणा विधेयकावर चर्चा
esakal December 21, 2024 07:45 PM

नागपूर : मागील वर्षी अडीच लाख कोटींचा जीएसटी तिजोरीत जमा झाल्याने देशात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर होते. हे जीएसटीमधील चोरी कमी झाल्याने शक्य झाले. या चोऱ्या पकडण्यासाठी कृत्रीम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य आहे. जीएसटी चोरी पकडण्यासाठी कमीत कमी धाडी टाकून एआयच्या बळावर चोऱ्या शोधून काढल्या.

महाराष्ट्राचे हे एआय मॉडेल इतर राज्ये स्वीकारत आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. विधानपरिषदेत मूल्यवर्धित कर (सुधारणा) विधेयकावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

या विधेयकाद्वारे तीन महत्त्वाच्या सुधारणा करीत असल्याचे सांगताना महसूल वाढीसाठी त्या फायद्याच्या ठरणार आहेत. या दुरुस्त्यांद्वारे या कायद्याची व त्याद्वारे केल्या जाणाऱ्या करवसुलीची व्याख्या स्पष्ट होईल. २ हजार ५०० लिटरपेक्षा अधिक विक्री एका वेळेस झाल्यास ती किरकोळ विक्री नसेल यामुळे बरेचसे नुकसान वाचणार आहे, असे त्यांनी सांगितले.

मंत्र्यांचे ज्ञान अगाध आहे

‘सरकारचे बाकी मंत्री याबाबत गंभीर नाहीत आणि इतर मंत्र्यांचे अगाध ज्ञान मी बघितले आहे. त्यामुळे या विधेयकावर मुख्यमंत्र्यांनीच उत्तर देणे अपेक्षित आहे,’ अशी टिप्पणी करून एकनाथ खडसे यांनी अनेक सूचना केल्या. शशिकांत शिंदे चर्चेत सहभागी झाले होते.

उत्पन्न वाढीसाठी उच्चस्तरीय समिती

करेतर उप्तन्न वाढीसाठी सरकारने प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यासाठी उच्चस्तरीय समितीची गठित करण्याची मागणी खडसे यांनी केली. त्यांच्या सूचनेनुसार उच्चस्तरीय समिती गठित करण्यात येईल, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.