Nagpur Winter Session 2024 LIVE UPDATE : शरद पवारांनी परभणीत मयत सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांची घेतली भेट
Sarkarnama December 21, 2024 07:45 PM
Sharad Pawar : शरद पवारांनी परभणीत मयत सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांची घेतली भेट

परभणी इथं मयत सोमनाथ सूर्यवंशी याच्या घरी शरद पवार पोचले असून, सूर्यवंशी कुटुंबियांशी संवाद साधला. मयत सोमनाथ यांची आईने माझा मुलगा दोषी नव्हता. त्याचा खून केला आहे. दोषींना फाशी झाली पाहिजे, अशी मागणी केली. सोमनाथला कोणताही आजार नव्हता. तसंच घरात शिक्षण घेणारा तो पहिलाच होता. सोमनाथ याचा मृतदेह घेऊन जाताना पोलिसांनी त्रास दिल्याचा आरोप मयत सोमनाथ याच्या भावाने केला.

IPS Navneet Kanwat : बीडच्या पोलिस अधीक्षकपदी IPS Navneet Kanwat यांची नियुक्ती

IPS Navneet Kanwat यांची बीड जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणात तपासात कुचराई केल्याच्या ठपका ठेवत बीडचे पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. अविनाश बारगळ हे वैद्यकीय रजेवर गेले आहेत. अविनाश बारगळ यांनी 7 ऑगस्ट 2024 ला पोलिस अधीक्षक म्हणून पदभार हाती घेतला होता. यानंतर बीडमध्ये आज नव्या एसपींची नियुक्ती करण्यात आली आहे. IPS Navneet Kanwat हे बीडचे नवीन पोलिस अधीक्षक राहणार असून, ते यापूर्वी पोलिस उपायुक्त छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी कार्यरत होते. आता बीडमधील कायदा सुव्यवस्था सुरळीत करण्याचे आवाहन कावत यांच्यासमोर असणार आहे.

Santosh Deshmukh Murder Case : शरद पवार यांनी घेतली मयत संतोष देशमुख कुटुंबियांची भेट

शरद पवार यांनी बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच मयत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी त्यांच्याबरोबर खासदार नीलेश लंके, खासदार बजरंग सोनावणे, आमदार संदीप क्षीरसागर, माजी आमदार राजेश टोपे आदी नेते होते. देशमुख कुटुंबियांकडून शरद पवार यांनी घटनाक्रम समजावून घेतला. देशमुख कुटुंबियांनी घटनेत पोलिस प्रशासनाचा हलगर्जीपणावर ठपका ठेवला. तसेच बीडमध्ये वाढलेल्या गुंडगिरी रोखा, देशमुख परिवाराला न्याय मिळवून द्यावा, पसार आरोपींना तत्काळ अटक व्हावी, खटला जलदगती न्यायालयात चालवावा, अशी मागणी देशमुख कुटुबियांनी शरद पवारांकडे केली.

BMC Election : मुंबई महापालिका निवडणूक शिवसेनायुबीटी पक्ष स्वबळावर लढणार

मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याचा आग्रह पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा आहे. तसा निरीक्षकांच्या अहवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे सादर झाला आहे. यावर उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, शिवसेनायुबीटीचे नेते संजय राऊत यांनी मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत. महाविकास आघाडीतील काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी यावर आम्ही देखील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी बोलून निर्णय घेणार असल्याचे म्हटले. यामुळे महाविकास आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना एकत्रितपणे समोरे जाणार नसल्याचे दिसते. महाविकास आघाडीत बिघाडीवर भाजप नेते मंत्री गिरीश महाजन आणि शिवसेना नेते मंत्री संजय शिरसाट यांनी टोलेबाजी केली आहे.

Stamp Duty Charges : दस्तांसाठी आता 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क आकारले जाणार

मुद्रांक सुधारणा विधेयक विधान परिषदेत एकमताने मंजूर झाले आहे. यानुसार मुद्रांक शुल्कसाठी आता 500 रुपये मोजावे लागणार आहे. व्यवहारात सुसूत्रता आणण्यासाठी हे विधेयक दुरुस्ती विधेयक आणण्यात आल्याची माहिती मंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली. राज्यात विविध 12 प्रकारच्या दस्तांसाठी 100 आणि 200 रुपयांऐवजी आता 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क आकारले जाणार आहे. मात्र हे शुल्क आकारताना सामान्य नागरिकांवर त्याचा कोणताही भार पडणार नसल्याची ग्वाही मंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली.

Sharad Pawar : शरद पवार त्यांच्या सर्व खासदारांसह बीड अन् परभणी दौऱ्यावर...

ज्येष्ठ नेते शरद पवार आज बीड आणि परभणी जिल्हा दौऱ्यावर असून, प्रशासनाकडून अलर्ट मोडवर आहे. शरद पवार बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची आणि परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत. शरद पवार यांच्याबरोबर त्यांचे सर्व खासदार असणार आहेत. या दोन्ही कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर शरद पवार दुपारी दोन वाजता पत्रकारांशी संवाद साधणार आहे. दरम्यान, शरद पवार मस्साजोग गावाला सकाळी दहा वाजता जाणार होते. परंतु वातावरणातील बदलामुळे त्यांचा दौरा एक तास पुढे, म्हणजेच 11 वाजता उशिराने होईल.

Rahul Gandhi : राहुल गांधींविरुद्ध हक्कभंगाचा प्रस्ताव

संसद भवनाच्या आवारात सत्ताधारी पक्षाचे खासदार प्रतापचंद्र सरंगी आणि मुकेश राजपूत यांना झालेल्या धक्काबुक्की प्रकरणी भाजपकडून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच हक्कभंगाची नोटीस देखील बजावण्यात आली. भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी राहुल यांच्याविरोधात हक्कभंगाची आणि सभागृहाचा अपमान केल्याची नोटीस बजावली आहे.

Nilesh Lanke : नाराज छगन भुजबळ पवारसाहेबांकडे आल्यावर त्यांचे स्वागतच...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज असलेले आणि मंत्रिमंडळातून डावलेले ज्येष्ठ नेते छगन भुजबळ पुन्हा शरद पवारसाहेंबाकडे आले, तर स्वागत होईल, अशी प्रतिक्रिया खासदार नीलेश लंके यांनी दिली. पण ते आपल्या संपर्कात नाहीत, असे खासदार लंके यांनी सांगितले. छगन भुजबळ मुंबईत दाखल झाले आहेत.

Kurla BEST Bus Accident : कुर्ला बस अपघातातील आरोपी संजय मोरे याला आज न्यायालयात हजर करणार

मुंबईतील कुर्ला बस अपघातामधील आरोपी चालक संजय मोरे याची आज पोलिस कोठडी संपत असून, त्याला आज न्यायालयासमोर हजर केले जात आहे. संजय मोरे याला न्यायालयाने 11 दिवस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला होता. या कालावधीत अपघातप्रकरणी काय तपास केला, याची माहिती देखील पोलिस न्यायालयासमोर ठेवणार आहे. हा अपघात नऊ डिसेंबरला झाला होता. यात नऊ जणांचा मृत्यू झाला.

Mahayuti Government : खातेवाटप अधिवेशन संपल्यावर?

महायुती सरकारचे खातेवाटप लांबले आहे. अधिवेशनानंतर नाताळच्या सुट्ट्या लागणार आहे. या काळात नाराजी व्यक्त करणाऱ्यांना वेळ मिळणार नाही. त्यामुळे जे काही करायचे ते अधिवेशन संपल्यानंतर किंवा शेवट्या दिवशी, अशी माहिती समोर आली आहे. आज किंवा उद्या खातेवाटप जाहीर होईल, असे सांगितले जात आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.