डीपीएस फ्लेमिंगो तलावाला संवर्धन राखीव म्हणून घोषित करा
esakal December 21, 2024 11:45 PM

वाशी, ता. १५ (वार्ताहर) : नेरूळ येथील डीपीएस फ्लेमिंगो तलावाला संवर्धन राखीव (कंझर्व्हेशन रिझर्व्ह) म्हणून घोषित करण्याची शिफारस राज्य सरकारने नियुक्त केलेल्या एका उच्चस्तरीय समितीने केली आहे. यानुसार हा तलाव आता अधिक चांगल्या प्रकारे संरक्षित केला जाईल आणि येथे विहार करण्याऱ्या फ्लेमिंगो पक्ष्यांचे अस्तित्व टिकून राहील, अशी आशा पर्यावरणवादी कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे.
नेरूळ येथील डीपीएस तलावात शेजारील खाडीचे भरतीचे पाणी येत असते; परंतु नैसर्गिक जलस्रोत बुजवले गेल्याने तलावाचे पाणी आटले होते. परिणामी, २०२४ वर्षाच्या सुरुवातीला या तलावात अनेक फ्लेमिंगो पक्षी मरण पावल्यामुळे पर्यावरणप्रेमींनी मोठा आक्रोश व्यक्त केला होता. याचे पडसाद विधानसभेत उमटले होते. यानंतर तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जुलै महिन्यात फ्लेमिंगो अधिवास संवर्धनासाठी उपाययोजना सुचवण्याकरिता एक उच्चस्तरीय समिती नेमून यावर उपाययोजना शोधण्याचे आदेश दिले होते. या समितीकडून २३ सप्टेंबरला हा अहवाल पूर्ण करण्यात आला असून, अद्याप सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आलेला नाही. अहवालातील तपशील जाणून घेण्यासाठी नॅटकनेक्ट फाउंडेशनतर्फे माहितीच्या अधिकारांतर्गत या समितीच्या शिफारशींची माहिती मागविण्यात आली होती. यातून १२ डिसेंबरला मिळालेल्या माहितीनुसार समितीने आपल्या अहवालात डीपीएस तलावात अखंडित पाणी प्रवाह राखण्याची शिफारस केली असून, तलावाला ‘संवर्धन राखीव’ म्हणून घोषित करण्याची शिफारसही केली असल्याचे समजते आहे.
-----------------
नवी मुंबईची फ्लेमिंगो सिटी म्हणून ओळख आणि जैवविविधता टिकवून ठेवण्यासाठी या शिफारशी खूप महत्त्वाची भूमिका बजावतील. समितीच्या या शिफारशी म्हणजे पर्यावरणवाद्यांनी केलेल्या सामूहिक प्रयत्नांचे परिणाम आहेत. तलावांचे संवर्धन करण्यासाठी शिफारशींचे पालन केले जाईल.
- संदीप सरीन, एन्व्हायर्नमेंटल प्रिझर्वेशन सोसायटी, नवी मुंबई

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.