- डॉ. दिनेश बारी, saptrang@esakal.com
आजकाल 'बकेट लिस्ट' हा परवलीचा शब्द झाला आहे. तरुण असो किंवा वयस्कर... प्रत्येकाच्या तोंडून हा शब्द हमखास ऐकायला मिळतो. २००७ मध्ये या नावाचा एक नितांत सुंदर हॉलिवूड सिनेमा आला होता, तेव्हापासून बहुधा जगभरात बकेट लिस्ट हा विषय लोकांच्या चर्चेच्या केंद्रस्थानी आला असावा आणि तेव्हापासून आपापल्या बकेटी भरणे आणि खाली करणे सुरू झाले असावे. त्यातले काही शिंतोडे भारतातसुद्धा उडायला लागले.
२०११ मध्ये आलेला ''जिंदगी ना मिलेगी दोबारा'' हा बॉलीवूडचा सिनेमा थोड्या वेगळ्या धाटणीचा पण याच पठडीतला होता. तर नव्वदच्या दशकापासून भारतीयांच्या हृदयात आणि नंतर या ना त्या कारणाने स्वतः त्यांच्या बकेट लिस्टमध्ये स्थान मिळवणाऱ्या अभिनेत्री माधुरी दीक्षित हिचा २०१८ मध्ये आलेला तिचा पहिला मराठी सिनेमासुद्धा ‘बकेट लिस्ट’ ह्याच नावाचा होता. आता सोशल मीडियामुळे तर बकेट लिस्ट हे प्रकरण मान्सूनसारखे सर्वदूर पोहोचले आहे. त्यामुळे आम्हीसुद्धा कधी या बकेट लिस्टच्या वर्षावात चिंब भिजलो आणि उत्साहाच्या भरात केव्हा आमच्या बकेटी भरायला सुरुवात केली, कळलंच नाही...!
तसा आमचा गोतावळा मोठा... बालपणीचे मित्र वेगळे, त्यांचे विचार आणि विषय वेगळे... मग शाळेतील, कॉलेजमधील, नोकरीतील आले... प्रत्येक ठिकाणी विषयसुद्धा निराळेच आणि पुन्हा त्यात नातेवाईकही आलेच. त्यामुळे कुठे काही नवीन ऐकलं की लगेच ते बकेटमध्ये टाकायचे असं आमचं सुरू झालं. मग पाहता पाहता अशा बकेटच्या बकेट भरायला लागल्यात, पण त्या रिक्त करायची संधी काही मिळेना. कधी वेळ तर कधी आर्थिक गणित जुळेना.
पण जेव्हा नवीन बकेट घ्यायचीसुद्धा ऐपत राहिली नाही, तेव्हा मात्र कळलं की वेळेचा अभाव वगैरे ही कारणे म्हणजे आपला अंधविश्वास आहे, आपला फाटका खिसा हेच ह्या भरलेल्या बकेट रित्या न होण्याचं मुख्य कारण आहे. आपली किराणा लिस्टच कधी पूर्ण होत नाही तर ह्या बकेट लिस्टचं करायचं काय असा ''बिकट'' प्रश्न आम्हास पडायला लागला.
स्नान करण्यासाठी बाथरूममध्ये गेलो तरी तेथील बकेट ''विकट'' हास्य करून आम्हाला खिजवत आहे, असा भास व्हायला लागला. मग कंटाळून आम्ही बाथरूममधील बकेट बदलून घंगाळ वापरणं सुरू केलं. एवढंच नव्हे तर बाजारात किंवा मॉलमध्ये गेलो की बकेटींकडं पाहणंदेखील आम्ही टाळू लागलो.
नवीन बकेट लिस्ट तयार करणं तर आम्ही बंदच केलं पण आधी भरलेल्या काही बकेटाही आम्ही चारचौघात लपवू लागलो. वयोमानानुसार काही बकेटा तर अर्थच हरवून बसल्या उदा. फुल मॅरेथॉन, अवघड ट्रेकिंग, मग अशा बकेटला उगाच पाय मारून आम्हीच त्या सांडवून देऊ लागलो. तर कधी एक बीच बघितला काय किंवा एक हिल स्टेशन बघितलं काय मग इतर सर्व सारखेच अशी आमच्या मनाची समजूत घालून आम्ही त्यांची संख्या कमी करण्याचा जिवापाड खटाटोप करीत होतो.
मात्र त्याचवेळी आमच्या काही मित्र-नातेवाइकांचे बकेट लिस्ट तयार करणे, बकेटा रीतसर रिक्त करणं अन् पुन्हा नव्यानं भरणं अविरत सुरू होतं. त्यांचे सोशल मीडियामधील फोटो पाहून इकडे आमच्या कुटुंबाच्या बकेट लिस्टसुद्धा आमच्या नावावर जमा व्हायला लागल्या.
मग बकेटमधील थोडं तांब्याभर पाणी कमी करायचा प्रयत्न केला म्हणजे एखाद्या जवळच्या छोट्या-मोठ्या पर्यटनस्थळी गेलो तरी ते समाधान क्षणिक ठरतं, कारण यांचे सिमला-मनाली किंवा काश्मीरवरून सोशल मीडियाच्या वॉलवर धडाधड फोटो अपलोड होऊ लागतात.
मग पुढील वर्षी आणखी ओढाताण करून अशाच एखाद्या ठिकाणी धडपडत आमचं पाऊल पडेपर्यंत ही मंडळी उड्डाणं करून परदेशात पोहोचलेली असतात, तिथून दुबई-सिंगापूर दर्शन किंवा युरोप-अमेरिका येथील स्नो-फॉलचे फोटो झळकू लागतात.
त्यामुळे कितीही प्रयत्न केले तरी आमच्या बकेटा काही कमी व्हायचं नाव घेत नाहीत आणि यांच्याशी स्पर्धा करावी तर बकेटऐवजी ''टँकर''च लागणार या विचारानं आमचं सर्वांग स्नो-फॉलशिवायच थरारून जातं. बरं, मित्रांना विचारावं, की हे सर्व तुम्ही मनापासून करता की तुमच्यावरही काही सामाजिक किंवा कौटुंबिक प्रेशर आहेत, तर उत्तर काही देत नाही, फक्त गूढ हसतात.
त्यामुळे हे हसणं मनापासून आहे की हतबलतेतून? हेसुद्धा समजायला मार्ग नाही. ही झाली फक्त पर्यटनाची बकेट, शिवाय खाणं-पिणं, कपडे-लत्ते, दाग-दागिने, बंगला-गाडी अशा इतर अनेक बकेटी बाजूलाच राहिल्यात. या बकेट लिस्टच्या धुंदीमध्ये सहज घडणाऱ्या किंवा करता येणाऱ्या छोट्या-छोट्या गोष्टींमधला आनंद हरवून गेला का...?
याचा अर्थ, अशा बकेट लिस्ट करूच नये किंवा आपल्या इच्छा पूर्ण करूच नये, असा अजिबात नाही. मात्र त्याबाबतीत इतरांशी स्पर्धा किंवा तुलना नको. जे सक्षम आहेत आणि ज्यांची खरोखर इच्छा आहे, ते निश्चितच या सर्व गोष्टींचा मनापासून आनंद घेत असतील, मात्र बहुसंख्य कुटुंबे ही सोशल कम्पॅरिजन किंवा फोमो (FOMO - Fear of Missing Out) यांचे बळी ठरत आहेत, असं वाटतं. साध्या भाषेत ''कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे'', मात्र या ओझ्यामुळे लोकांचे खांदे झुकत चाललेत, हेही तेवढंच खरे!
या बकेट लिस्टच्या नादात आजकाल नोकरदार मंडळी सुट्टीत गावी जाण्याऐवजी आपापल्या बकेट लिस्ट पूर्ण करण्यात मग्न असतात. गावी जाणं, शेतात, माळरानावर मनसोक्त भटकंती करणं, नातेवाईक, गुरुजन, थोरामोठ्यांच्या गाठी-भेटी घेऊन त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी करणं व त्यांचे अनुभवाचे बोल ऐकणं, जुन्या मित्रांना भेटणं, त्यांचेसोबत गप्पांच्या मैफिली जमवणं, पुस्तक वाचन हे सर्व कमी होत चाललंय.
त्यामुळं या गोष्टींचा आणि सोबतच इतर काही समाजविधायक व आत्मिक उन्नतीसाठी आवश्यक काही बाबींचा समावेश जर या ''बकेट लिस्ट'' मध्ये केला, तर या प्रयासात बकेट तर रिक्त होईल पण जगणं भरभरून आणि अर्थपूर्ण होऊन जीवनप्रवास पूर्णत्वास जाईल.....