देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप अखेर जाहीर झालं आहे. यात फडणवीसांची गृह खातं स्वतःकडंच ठेवलं आहे. तर एकनाथ शिंदेंना नगर विकास आणि अजित पवारांना अर्थ खातं देण्यात आलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे तसंच अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर नागपूरमध्ये रविवारी (15 डिसेंबर) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला. यावेळी 33 कॅबिनेट मंत्र्यांनी आणि 6 राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली. त्यांनाही खाती वाटप करण्यात आली.
खातेवाटप रखडल्याने नागपूरच्या संपूर्ण हिवाळी अधिवेशनात सगळे बिनखात्याचे मंत्री ठरले होते. अखेर आज (21 डिसेंबर) अधिवेशनाचे सूप वाजल्यानंतर खतेवाटप जाहीर करण्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याकडे गृहमंत्रिपद कायम ठेवलं आहे. त्याचबरोबर ऊर्जा, कायदा, सामान्य व्यवस्थापन, माहिती यासह इतर शिल्लख खाती त्यांच्याकडं असतील.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे : एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास आणि गृहनिर्माण (सामाजिक उपक्रम) खाते असतील.
उपमुख्यमंत्री अजित पवार : अजित पवारांकडे अर्थ, नियोजन खात्यांचा कारभार असेल
BBC BBC कोणाला कोणती खाती मिळालीनागपूरमधील या शपथविधी कार्यक्रमात भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राषट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तिन्ही पक्षाच्या 33 नेत्यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.
त्याचं खातेवाटत करण्यात आलं. त्यानुसार मंत्री आणि त्यांना मिळालेली खाती खालीलप्रमाणे आहेत.
1. चंद्रशेखर प्रभावती कृष्णराव बावनकुळे - महसूलभाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील ते प्रमुख ओबीसी चेहरा असतील.
Screengrab/DD चंद्रशेखर बावनकुळेविदर्भातील कामठी विधानसभा मतदारसंघातून बावनकुळे आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा कार्यकाळ शेवटच्या टप्प्यात असताना त्यांना आता मंत्रिपद देण्यात आलं आहे.
चंद्रशेखर बावनकुळे 2004 पासून चारवेळा आमदार राहिलेले आहेत.
चंद्रशेखर बावनकुळे या आधी ऊर्जा, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय महाराष्ट्र, राज्य उत्पादन शुल्क मंत्री होते.
26 डिसेंबर 2014 रोजी नागपूरचे पालकमंत्री म्हणूनही त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.
2. राधाकृष्ण सिंधुताई एकनाथराव विखे पाटील- जलसंपदा (गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळ)शिर्डी विधानसभा मतदारसंघातून सलग आठवेळा निवडून आलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांना देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात कायम ठेवण्यात आलेलं आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीमधून राधाकृष्ण विखे पाटील सुमारे तीस वर्षे आमदार म्हणून निवडून येतात.
Screengrab/DD राधाकृष्ण विखे पाटील2024च्या विधानसभा निवडणुकीत राधाकृष्ण विखे पाटील 70 हजार 282 मतांनी निवडून आले आहेत.
वेगवेगळ्या पक्षांमधून भाजपमध्ये आलेले राधाकृष्ण विखे पाटील हे 2008 पासून प्रत्येक सरकारच्या मंत्रिमंडळात मंत्री राहिले आहेत. त्याआधी 1995 ते 1999 या युती सरकारच्या पहिल्या कार्यकाळात देखील ते मंत्री होते.
मंत्रिमंडळात काम करण्याचा मोठा अनुभव राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गाठीशी आहे. केवळ शिर्डी विधानसभा मतदारसंघातच नाही तर संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात विखे पाटील यांचा भाजपला मोठा फायदा झाल्याचं दिसून येतं.
3. हसन सकीनाबी मियालाल मुश्रीफ - वैद्यकीय शिक्षणराष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. कोल्हापूरच्या कागल मतदारसंघातून हसन मुश्रीफ सलग सहाव्यांदा आमदार बनले आहेत.
1999 पासून सलग मुश्रीफ यांनी इथून विजय मिळवला आहे. यावेळी झालेल्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या समरजितसिंह घाटगे यांना पराभूत केलं होतं.
Screengrab/DDएकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्येही ते मंत्री होते. त्यांनी यापूर्वी ग्रामविकास आणि कामगार मंत्रालयाचा कारभार सांभाळला आहे. तसंच तो कोल्हापूरचे पालकमंत्रीही होते. राष्ट्रवादीतील फुटीदरम्यान त्यांनी अजित पवारांची साथ देत शरद पवारांच्या विरोधात बंड केलं होतं.
4. चंद्रकांत सरस्वती बच्चू पाटील - उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाजचंद्रकांत पाटील हे पुण्यातल्या कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. मुंबईत जन्मलेल्या चंद्रकांत पाटील यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली.
कोथरूड विधानसभा मतदारसंघातून ते सलग दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या दोन्ही मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात काम केलं आहे.
Screengrab/DD चंद्रकांत पाटीलराज्यातील भाजपचे वरिष्ठ नेते म्हणून चंद्रकांत पाटील यांच्याकडे बघितलं जातं. चंद्रकांत पाटील भाजपचे प्रदेशाध्यक्ष देखील राहिले आहेत.
यंदाच्या निवडणुकीत त्यांनी तब्बल 1 लाख 12 हजार 041 मतांनी विजय मिळवला आहे.
5. गिरीश गीता दत्तात्रय महाजन - जलसंपदा (विदर्भ तापी कोकण)देवेंद्र फडणवीसांचे विश्वासू समजले जाणारे जामनेरचे आमदार गिरीश महाजन हे देखील या मंत्रिमंडळात मंत्री असणार आहेत.
जामनेर विधानसभा मतदारसंघातून गिरीश महाजन सलग सातवेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.
Screengrab/DDदेवेंद्र फडणवीसांच्या पहिल्या कार्यकाळात पहिल्यांदा मंत्रिपद भूषविलेल्या गिरीश महाजन यांनी अनेकवेळा युती सरकारचे संकटमोचक म्हणून काम केलं आहे.
एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळात ग्रामविकास मंत्री राहिलेल्या गिरीश महाजन यांना यावेळी कोणतं खातं मिळतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
6. गुलाबराव रेवाबाई रघुनाथ पाटील - पाणीपुरवठा, स्वच्छता2009 पासून जळगाव ग्रामीणचे आमदार राहिलेल्या गुलाबराव पाटील यांना मंत्रिमंडळात संधी देण्यात आली आहे.
Screengrab/DDउद्धव ठाकरेंच्या महाविकास सरकारमध्ये पाणीपुरवठा मंत्री राहिलेल्या गुलाबराव पाटील यांनी 2022 मध्ये राजीनामा देऊन एकनाथ शिंदेंच्या सोबत सरकारमध्ये जाणं पसंत केलं.
गुलाबराव पाटील यांना एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या कोट्यातून मंत्रिपद मिळालं आहे.
7. गणेश रामचंद्र नाईक - वनमंत्रीऐरोली विधानसभेचे आमदार गणेश नाईक यांनाही मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे.
शिवसेनेमधून राजकीय प्रवासाची सुरुवात केल्यानंतर गणेश नाईक यांनी 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतरची 20 वर्षे ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच होते.
Screengrab/DD गणेश नाईकअखेर 2019मध्ये गणेश नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. गणेश नाईक याआधी ठाण्याचे पालकमंत्री देखील राहिले आहेत.
8. दादाजी रेश्माबाई दगडू भुसे - शालेय शिक्षणएकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून दादा भुसे यांचं मंत्रीपद कायम ठेवण्यात आलं आहे.
2004 मध्ये अपक्ष म्हणून निवडून आलेल्या दादा भुसेंनी त्यानंतरच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेकडून आमदारकी भूषवली आहे.
Screengrab/DDदादा भुसे मालेगाव बाह्य (आउटर) मतदारसंघातून सलग 4 वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.
महाविकास आघाडी सरकारमध्ये कृषिमंत्री राहिलेल्या दादा भुसे यांना एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळात ग्रामविकास खात्याची जबाबदारी देण्यात आली होती.
9. संजय प्रमिला धुलीचंद राठोड - जल आणि मृदा संवर्धनसंजय राठोड महाराष्ट्राचे वने, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन आणि मृदा व जलसंधारण मंत्री या विभागांचे कॅबिनेट मंत्री राहिले आहेत. संजय राठोड बंजारा समाजाचे प्रतिनिधित्व करतात.
Screengrab/DDदिग्रस विधानसभा मतदारसंघातून संजय राठोड आमदार म्हणून निवडून आले आहेत. ते यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री देखील राहिले आहेत.
संजय राठोड यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
10. धनंजय रुक्मिणीबाई पंडितराव मुंडे - अन्न नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षणपरळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार धनंजय मुंडे यांनी देखील कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मागील सरकारमध्ये कृषिमंत्री राहिलेल्या धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा एकदा संधी दिली आहे.
परळीमधून मुंडे बंधू भगिनीची मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे.
Screengrab/DD 11. मंगलप्रभात लोढा - कौशल्यविकास आणि रोजगारमंगलप्रभात लोढा हे मुंबईच्या मलबार हिल विधानसभा मतदारसंघातून सलग सात वेळा निवडून आले आहेत. लोढा हे एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळात पर्यटन आणि कौशल्य विकास मंत्री होते. मंगलप्रभात लोढा यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे.
Screengrab/DD मंगलप्रभात लोढामंगलप्रभात लोढा यांचा 1995 नंतर विधानसभेच्या एकाही निवडणुकीत पराभव झालेला नाही. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून राजकीय करियरची सुरुवात केलेल्या लोढा यांनी भाजपचे मुंबई अध्यक्ष म्हणूनही काम केलं आहे.
देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी संस्कृतमधून शपथ घेतली आहे.
12. उदय सामंत - उद्योग आणि मराठी भाषारत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून सलग पाचवेळा निवडून आलेले उदय सामंत हे देखील फडणवीसांच्या मंत्रिमंडळात असतील.
उदय सामंत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. 2004 आणि 2009 मध्ये उदय सामंत राष्ट्रवादी काँग्रेसमधून आमदार झाले होते. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
Screengrab/DDशिवसेनेच्या फुटीनंतर उदय सामंत यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणं पसंत केलं. उदय सामंत रत्नागिरी आणि रायगडचे पालकमंत्री राहिले आहेत. एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळात ते उद्योग मंत्री होते.
आताही त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
13. जयकुमार रावल - विपणन आणि राजशिष्टाचारदेवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या कार्यकाळात पर्यटन आणि रोजगार हमी मंत्री राहिलेल्या जयकुमार रावल यांनाही यावेळी मंत्रिपद देण्यात आलं आहे.
जयकुमार रावल हे धुळे जिल्ह्यातल्या सिंदखेडा विधानसभा मतदारसंघांचं प्रतिनिधित्व करतात.
Screengrab/DDजयकुमार रावल 2009 पासून सलग पाचवेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. भाजपतर्फे गिरीश महाजन आणि जयकुमार रावल यांना उत्तर महाराष्ट्रातून संधी मिळाली आहे.
14. पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे - पर्यावरण आणि पशूसंवर्धनमागच्या काही वर्षांमध्ये राजकीय कारकिर्दीत अनेक चढउतार बघितलेल्या भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेलं आहे.
लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेवर आमदारकीची संधी देण्यात आलेली होती.
Screengrab/DDदिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या त्या कन्या आहेत. देवेंद्र फडणवीसांच्या तिसऱ्या कार्यकाळात पंकजा मुंडे मंत्री असतील.
महायुतीच्या विजयात ओबीसी मतांची भूमिका महत्त्वाची राहिल्याचं बोललं जातं. निवडणूक प्रचारात पंकजा मुंडे भाजपच्या स्टार प्रचारक राहिल्या होत्या.
15. अतुल लीलावती मोरेश्वर सावे - ओबीसी कल्याण, दुग्धउत्पादन आणि अपारंपरिक ऊर्जाऔरंगाबाद पूर्व मतदारसंघाचे आमदार अतुल सावे यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. एआयएमआयएमचे उमेदवार इम्तियाझ जलील यांचा पराभव करून ते निवडून आले आहेत.
अतुल सावे याआधी देखील मंत्री राहिलेले आहेत.
16. अशोक जनाबाई रामाजी उईके - आदिवासी विकासराळेगाव मतदारसंघाचे आमदार अशोक उईके यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली.
अशोक रामजी उईके भारतीय जनता पक्षाचे दोनवेळचे आमदार आहेत. ते 2014 मध्ये राळेगाव मतदारसंघातून निवडून गेले. त्यानंतर 2019 मध्ये त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात आदिवासी विकास मंत्री म्हणून संधी मिळाली.
आता तिसऱ्यांदा आमदार झाल्यावर पुन्हा एकदा त्यांना फडणवीसांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे.
Screengrab/DD 17. शंभुराज विजयादेवी शिवाजीराव देसाई - पर्यटन, खनिकर्म आणि माजी सैनिक कल्याणशिवसेनेच्या शिंदे गटाकडून पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांचं मंत्रीपद कायम ठेवण्यात आलं आहे. याआधी शिंदेंच्या मंत्रिमंडळात ते गृहराज्यमंत्री होते.
Screengrab/DD2014 नंतर सलग तीन निवडणुका जिंकत शंभूराज देसाई यांनी आमदारकीची हॅट्ट्रिक साधली आहे. त्याआधी 2004 साली ते शिवसेनेकडून निवडून आले होते.
सातारा जिल्ह्यातून चार आमदारांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे.
18. आशिष मीनल बाबाजी शेलार - माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यआशिष शेलार यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. भाजपचे राज्यातील मुख्य नेत्यांपैकी शेलार एक आहेत.
वांद्रे पूर्व मतदारसंघातून असिफ झकारिया यांचा त्यांनी यावेळी पराभव केला आहे. सलग तिसऱ्यांदा ते या मतदारसंघातून विजयी झाले आहेत.
Screengrab/DD आशिष शेलार 19. दत्तात्रय गिरिजाबाई विठोबा भरणे - क्रीडा आणि युवक कल्याण, अल्पसंख्याक विभाग तसेच औकाफअजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून इंदापूर मतदारसंघातून निवडणूक लढवलेल्या दत्तात्रय भरणे यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
Screengrab/DDशरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढणाऱ्या हर्षवर्धन पाटील यांचा त्यांनी पराभव केला आहे.
20. आदिती वरदा सुनील तटकरे - महिला व बालकल्याणमागील सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या आदिती तटकरे यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या त्या कन्या असून, याआधी देखील त्यांनी मंत्रिपद भूषवलं आहे.
Screengrab/DDरायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाचं त्या प्रतिनिधित्व करतात.
21. शिवेंद्रसिंह अरुणाराजे अभयसिंहराजे भोसले - सार्वजनिक बांधकामपश्चिम महाराष्ट्रातल्या सातारा विधानसभा मतदारसंघातून शिवेंद्रराजे भोसले आमदार म्हणून निवडून आले आहेत.
भोसले राजघराण्याचे वारस असलेले शिवेंद्रराजे भोसले सलग सहाव्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत.
Screengrab/DDशिवेंद्रराजेंना पहिल्यांदाच राज्याच्या मंत्रिमंडळात संधी देण्यात आली आहे. 2024 च्या निवडणुकीत त्यांनी तब्बल 1 लाख 42 हजार 124 मतांनी विजय मिळवला आहे.
22. माणिकराव सरस्वती शिवाजी कोकाटे - कृषी Screengrab/DDसिन्नर विधानसभा मतदारसंघाचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
माणिकराव कोकाटे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती.
23. जयकुमार कमल भगवानराव गोरे - ग्रामीण विकास आणि पंचायती राजसातारा जिल्ह्यातील माण-खटावचे आमदार जयकुमार भगवानराव गोरे यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
जयकुमार गोरे देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात.
Screengrab/DD 24. नरहरी सावित्रीबाई सीताराम झिरवाळ - अन्न व औषध प्रशासनविधानसभेचे माजी उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी राज्याच्या मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. ते देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील प्रमुख आदिवासी चेहरा असणार आहेत.
Screengrab/DDनाशिक जिल्ह्यातील दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचे ते प्रतिनिधित्व करतात.
25. संजय सुशीला वामन सावकारे - वस्त्रोद्योगआमदार संजय सावकारे यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. संजय सावकारे यांनी भुसावळमधून भाजपकडून निवडणूक लढवली आणि विजय मिळवला.
Screengrab/DD 26. संजय शकुंतला पांडुरंग शिरसाट - सामाजिक न्यायऔरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय शिरसाट यांनी मंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात त्यांना मंत्रिपद मिळालेलं नव्हतं.
यावेळी मात्र संजय शिरसाट यांना मंत्रिपद देण्यात आलं आहे.
Screengrab/DD 27. प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक - परिवहनएकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील महत्त्वाचे नेते प्रताप सरनाईक यांनाही मंत्रिपद मिळालं आहे.
2024च्या विधानसभा निवडणुकीत प्रताप सरनाईक ओवळा माजिवडा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत.
Screengrab/DDराष्ट्रवादी काँग्रेसमधून राजकारणाची सुरुवात केलेल्या सरनाईक यांनी 2008 मध्ये शिवसेनेत प्रवेश केला होता. 2009 पासून प्रताप सरनाईक हे आमदार राहिलेले आहेत.
28. भरत विठाबाई मारुती गोगावले - रोजगार हमीशिवसेना शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. कोकणातील महाड विधानसभा मतदारसंघातून भरत गोगावले चार वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली नव्हती. मात्र आता त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
Screengrab/DD 29. मकरंद सुमन लक्ष्मणराव जाधव पाटील - मदत आणि पुनर्वसनवाई विधानसभा मतदारसंघाचे आमदार मकरंद जाधव पाटील यांनाही मंत्रिपद मिळालं आहे. नागपूरमध्ये झालेल्या शपथविधी सोहळ्यात त्यांनी मंत्रिपद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.
Screengrab/DD मकरंद जाधव पाटीलदेवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात सातारा जिल्ह्यातील चार मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. मकरंद पाटील हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत.
30. नितेश नीलम नारायण राणे - मत्स्यपालन आणि बंदरेकोकणातल्या कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांना मंत्रिमंडळात पहिल्यांदाच संधी देण्यात आली आहे. आमदार नितेश राणे हे राज्यसभा खासदार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र आहेत.
नितेश राणे यांनी कणकवलीमधून सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे. 2014च्या विधानसभा निवडणुकीत नितेश राणे पहिल्यांदा कणकवलीमधून आमदार झाले होते.
Screengrab/DDनितेश राणे यांना मंत्रिपद मिळाल्यामुळे भाजपला कोकणात पक्ष वाढवण्यात मोठी मदत होऊ शकते. यासोबतच नितेश राणे यांनी मागच्या पाच वर्षांमध्ये हिंदुत्वाचा आक्रमक प्रचार केला आणि त्याचं फळ त्यांना आता मिळालेलं दिसतं आहे.
31. आकाश सुनिता पांडुरंग उपाख्य भाऊसाहेब फुंडकर - श्रमविभागआकाश फुंडकर यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. आकाश फुंडकर हे बुलढाणा जिल्ह्यातील खामगावचे आमदार आहेत.
आकाश हे भाजप नेते पांडुरंग फुंडकर यांचे पुत्र आहेत.
Screengrab/DD 32. बाबासाहेब शांताबाई मोहनराव पाटील - सहकारलातूर जिल्ह्यातील अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. बाबासाहेब पाटील हे मराठवाड्यातून आहेत.
Screengrab/DDअजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ते आमदार झाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय बनसोडे यांना मात्र मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेलं नाही.
33. प्रकाश सुशिला आनंदराव आबिटकर - सामाजिक आरोग्य आणि कुटुंबकल्याण Screengrab/DDकोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी विधानसभेचे आमदार प्रकाश आबिटकर यांना एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून मंत्रिपदाची संधी मिळाली आहे.
राज्यमंत्री 1. माधुरी मीरा सतीश मिसाळ - नागरी विकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्याक विभाग व औकाफपुण्याच्या पर्वती मतदारसंघात सलग 4 वेळा निवडून आलेल्या माधुरी मिसाळ यांना राज्य मंत्रिपदाची संधी देण्यात आली आहे.
नगरसेवक पदापासून राजकीय कारकिर्दीची सुरुवात केलेल्या माधुरी मिसाळ मागच्या 18 वर्षांपासून भाजपमध्ये कार्यरत आहेत.
Screengrab/DDमाधुरी मिसाळ यांनी पुण्यात भाजपने मिळवलेल्या यशामध्ये मोठी भूमिका बजावली आहे. माधुरी मिसाळ यांच्या रूपाने भाजपने पुण्याला आणखीन एक मंत्रिपद दिलं आहे. यंदाच्या निवडणुकीत मिसाळ 36 हजार 737 मतांनी विजयी झाल्या होत्या.
2. आशिष उमादेवी नंदकिशोर जायस्वाल - अर्थ, नियोजन, कृषी, मदत आणि पुनर्वसन, विधी आणि न्याय तसेच श्रमशिवसेना शिंदे गटाचे रामटेकचे आमदार आशिष जायस्वाल यांनीही राज्य मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
आशिष जयस्वाल 1999 पासून पाचवेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.
Screengrab/DD 3. पंकज कांचन राजेश भोयर - गृह (ग्रामिण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार, खनिकर्ममुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात वर्ध्याचे आमदार पंकज भोयर यांना देखील संधी देण्यात आली आहे. 2014 साली काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या पंकज भोयर यांना मंत्रिपद मिळालं आहे.
वर्धा विधानसभा मतदारसंघातून भोयर हे तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी राज्य मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
Screengrab/DD 4. मेघना दीपक साकोरे-बोर्डीकर - सामाजिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा, ऊर्जा, महिला-बालकल्याण, सार्वजनिक बांधकामपरभणी जिल्ह्यातील जिंतूरच्या आमदार मेघना बोर्डीकर यांनीही राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. मेघना बोर्डीकर 2019 मध्ये पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. ज्येष्ठ नेते रामप्रसाद बोर्डीकर यांच्या त्या कन्या आहेत.
Screengrab/DDमेघना बोर्डीकर यांच्या रूपाने भाजपने आणखीन एका महिला मंत्र्यांची निवड केली आहे. मराठवाड्यात पंकजा मुंडे यांच्यानंतर मेघना बोर्डीकर यांनाही मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे.
5. इंद्रनील अनिता मनोहर नाईक - उद्योग, सार्वजनिक बांधकाम, उच्च आणि तंत्रशिक्षण, आदिवासी विकास, पर्यटन, मृदा आणि जलसंधारणमहाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे नातू आणि पुसदचे राष्ट्रवादीचे आमदार इंद्रनील नाईक यांनीही राज्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.
Screengrab/DD 6. योगेश ज्योती रामदास कदम - गृह (शहर), महसूल, ग्रामविकास आणि पंचायती राज, अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण अन्न व औषध प्रशासन विभागशिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम यांनाही देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे.
दापोली विधानसभा मतदारसंघातून सलग दोनवेळा आमदार म्हणून निवडून आलेले योगेश कदम हे मंत्रिमंडळातील तरुण चेहरा असतील.
Screengrab/DDयोगेश कदम यांनी नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत 24 हजार 093 मतांनी विजय मिळवला होता. कोकणातून दीपक केसरकर यांच्या ऐवजी योगेश कदम यांना राज्यमंत्री म्हणून पसंती देण्यात आलेली आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)