संस्कृती-सोहळा – उत्साह, आनंदाची पर्वणी नाताळ सण
Marathi December 22, 2024 02:24 PM

<<<वर्षा चोपडे>>>

हिंदुस्थानची संस्कृती अत्यंत प्राचीन असली तरी आपला देश मनाने उदार आहे. अनेक धर्मांचे लोक इथे गुण्यागोविंदाने राहतात. धार्मिक, वैचारिक विविधता असली तरी देश एकजूट आहे याचा प्रत्यय स्वतंत्र्य लढ्यात आपण बघितला. आपल्या सारे जहाँ से अच्छा हिंदुस्थानात नाताळ सण उत्साहाने साजरा होतो.

हिंदुस्थानातच नव्हे तर जगभरात ख्रिसमस साजरा केला जातो. ‘ख्रिसमस’ हा शब्द मास ऑफ क्राइस्टपासून आला आहे. मराठीतील नाताळ (नाताळ) हा पोर्तुगीज भाषेतील ‘नताल’ या शब्दापासून आला आहे. नताल – नाताळ याचा लॅटीन अर्थ ‘जन्म’ असा आहे. लॅटीन नतालीस म्हणजे ‘जन्म किंवा उत्पत्तीशी संबंधित’ असा आहे. आपण त्याला नाताळ म्हणतो. ‘ख्रिस्त-मास’ संध्याकाळनंतर सुरू होतो. म्हणजे सूर्यास्त आणि दुसऱ्या दिवशी सूर्योदयाच्या आधी, म्हणजे मध्यरात्री… म्हणून या सणाला ख्रिसमस असे नाव मिळाले. जगभरातील ख्रिश्चनांसाठी सर्वात आनंदाची पर्वणी म्हणजे ख्रिसमस, जी येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या स्मरणार्थ पाळली जाते, येशू ख्रिस्ताला देवाचा पुत्र मानून आदर दिला जातो. सगळे जण कुटुंब, मित्र आणि इतर नातेवाईकांसह हा सण आनंदाने आणि प्रेमाने साजरा करतात.

रोमन चर्चमध्ये ख्रिसमस साजरा करण्याची पहिली नोंद तारीख 25 डिसेंबर 336मध्ये रोमन सम्राट कॉन्स्टंटाईनच्या काळात होती. साम्राज्याचा प्रभावी धर्म म्हणून ख्रिस्ती धर्म स्वीकारणारा तो पहिला ख्रिश्चन रोमन सम्राट होता. ख्रिसमस सुरू झाला आणि लोक नवीन धर्माचे अनुकरण करू लागले. नंतर इ.स. 529मध्ये पोप ज्युलियसने हॅपी ख्रिसमस डे ही नागरी सुट्टी घोषित केली आणि 25 डिसेंबर ही तारीख येशू ख्रिस्ताच्या जन्माची तारीख म्हणून घोषित केली. त्याबाबत काही मतभेद असले तरी हा सण अत्यानंदाने साजरा होतो. 25 डिसेंबरला ‘हिवाळी संक्रांती’ आणि ‘सॅटर्नलिया’ नावाचा लोकप्रिय रोमा सणदेखील साजरा केला गेला.

हिंदुस्थानातील इतर राज्यांपेक्षा केरळात अनेक प्राचीन अप्रतिम चर्चेस आहेत आणि प्रत्येकाचा काहीतरी इतिहास आहे. अलप्पुझा… केरळमधील एक नयनरम्य शहर. हे निसर्गरम्य शहर त्याच्या मोहक ख्रिसमस उत्सवासाठी प्रसिद्ध आहे. येशू ख्रिस्ताच्या वाढदिवसानिमित्त केरळभर या सणाचा उत्साह ओसंडून वाहत असतो. सणासुदीच्या काळात, शहर आकर्षक दिवे, ख्रिसमस ट्री आणि रंगीबेरंगी दागिन्यांनी सुंदरपणे सजलेले असते. चर्चमध्ये प्रार्थना केली जाते. केरळी स्टाईल मटण मिरपूड फ्राय, बीफ फ्राय – ठेंगा कोथूसह केरळ शैलीतील बीफ उलारथियाथू, केरळ स्टाईल अप्पम, तांदूळ आणि नारळ पॅनकेक, केरळ शैलीतील कोळंबी, कोंचू ओलाथियाथू, चिकन, बीफ, मटण बिर्याणी, स्कॅलॉप केलेले बटाटे, ग्रीन बीन कॅसरोल आणि क्रॅनबेरी सॉस हे खाद्यपदार्थ अत्यंत प्रसिद्ध आहेत.

स्ट्रासबर्ग, फ्रान्स येथे जगभरातून लोक ख्रिसमस साजरा करण्यासाठी जातात. केरळ ख्रिसमस बंपर लॉटरी लोकांमध्ये फार प्रसिद्ध आहे. ख्रिसमस कॅरोल गाण्यात आबालवृद्ध हिरारीने भाग घेतात. 1510मध्ये रिगा, लॅटव्हिया येथे पहिल्यांदा ख्रिसमस ट्री सुशोभित केले होते तसेच 19व्या शतकात पहिले कृत्रिम ख्रिसमस ट्री विकसित करण्यात आले. ख्रिसमस ट्रीचा हिरवा रंग समृद्धीची आशा आणि वसंत ऋतूच्या वचनाचे प्रतीक मानले गेले. या ख्रिसमस डेच्या सजावटींपैकी, सदाहरित नाताळ वृक्षांना एक विशेष स्थान आहे कारण अशी मान्यता आहे की त्यांच्याकडे अद्वितीय शक्ती असते. असे म्हणतात, सांताक्लॉजची उत्पत्ती सेंट निकोलस यांच्या जीवनावर आधारित आहे.

येशू ख्रिस्ताचा ऐतिहासिक अनुयायी सेंट निकोलसचा जन्म इ.स. 280च्या सुमारास तुर्कीमध्ये झाला. गरीब आणि गरजूंना मदत करण्यासाठी त्यांनी आपली सर्व संपत्ती दान दिली व ते संत बनले. ते मुलांचे संरक्षक संत म्हणून प्रसिद्ध आहेत आणि 6 डिसेंबर रोजी त्यांचे स्मरण केले जाते. प्रथेप्रमाणे ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला सांताक्लॉज मुलांना भेटवस्तू वितरित करतो. लोक केक खातात, नृत्य करतात, मेजवानी करतात आणि आनंद व्यक्त करतात. ख्रिसमस हा सण केवळ ख्रिचन धर्माचा नव्हे तर एक जागतिक उत्सव बनला आहे. जो प्रत्येकासाठी आनंद, सद्भावना निर्माण करतो आणि विविध राष्ट्रांच्या सांस्कृतिक परंपरांमध्ये स्वत:ला सामावून घेतो.

[email protected]
(लेखिका राजगिरी कॉलेज ऑफ सोशल सायन्सेस, कोची, केरळ येथे असिटंट प्रोफेसर म्हणून नियुक्त आहेत.)

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.