सध्या छत्तीसगड राज्यातील कोरबा हे शहराची बरीच चर्चा होत आहे. त्यासाठी कारणही तसेच आहे. या शहरात एक मोठे धान्यकोठार आहे. तेथे जवळपास एक लाख क्विंटल, म्हणजेच 1 लाख पोती धान्य साठविले जाते. या कोरबा शहराच्या आसपासच्या वनक्षेत्रात हत्तींची मोठ्या प्रमाणात वस्ती आहे. या हत्तींनी या धान्य कोठाराला ‘लक्ष्य’ करण्याचा प्रयत्न अनेकवेळा केला आहे. या वन्य हत्तींनी काही दिवसांपूर्वीच या कोठाराच्या इमारतीवर हल्ला केला आणि इमारतीचे प्रवेशद्वार मोडले. तथापि कर्मचाऱ्यांचे लक्ष गेल्याने त्यांनी कसेबसे या हत्तींना पिटाळले.
प्रतिदिन संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर आसपासच्या वनपरिसरातील 12 ते 15 हत्ती येथे एकत्र येतात आणि या कोठारावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतात. कोठाराच्या जाड भिंतीनाही ते भिडतात आणि त्या पाडविण्याचा प्रयत्न करतात. त्यांना पिटाळण्यासाठी कर्मचारी विविध उपाय योजना करतात. हत्तींची येण्याची वेळ झाली की कर्मचारी ट्रॅक्टरची मिरवणूक हत्ती येण्याच्या मार्गावर काढतात. लग्नाची वरात काढली जावी तशी ही मिरवणूक असते. या मिरवणुकीत मोठ्या आवाजात डीजेचा दणदणाट केला जातो. हत्तींनी घाबरुन या कोठाराच्या जवळ येऊ नये यासाठी हा उपाय करण्यात येतो. तथापि, आता याचीही सवय हत्तींना झाल्याने ते बेधडक कोठाराजवळ येतात. या हत्तींना पिटाळणे ही एक मोठीची समस्या या कोठाराच्या कर्मचाऱ्यांसाठी निर्माण झाली आहे. हा प्रकार गेले पंधरा दिवस होत आहे. स्थानिक लोकांची यामुळे रात्री झोपमोड होते. तथापि, कर्मचाऱ्यांकडेही याखेरीज दुसरा उपाय नाही. हत्ती हा कायद्याने संरक्षित प्राणी आहे. त्यामुळे त्याला इजा होईल असे काहीही करता येत नाही. या भागातल्या शेतकऱ्यांनी आपले ट्रॅक्टर्स या कर्मचाऱ्यांना दिले आहेत. एकंदर, हत्तींचा जबर धाक सध्या आहे.