चिपळूण : चिपळूण तालुक्यात वाघ आढळ निश्चित झाला आहे. महिनाभरात या वाघाने तीन गुरांची शिकार केली असून, शिकार झाली तेथे त्याच्या पायाचे ठसे आढळून आले आहेत. यामुळे ‘सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा’तील वाघांचा अधिवास आणि सह्याद्री कोकण वन्यजीव भ्रमणमार्गचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. वनविभागाने या भागात आता ट्रॅप कॅमेरे लावण्याचा निर्णय घेतला आहे.
भारतीय वन्यजीव संस्थेने काही वर्षांपूर्वी सह्याद्रीत विष्ठेच्या ४४ नमुन्यांचे विश्लेषण केले होते. त्यातील सात नमुने हे वाघांचे होते; मात्र, हे सातही वाघ स्थलांतरित होते. २०१४ च्या गणनेत सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात वाघ आढळल्याच्या नोंदी आहेत; मात्र, येथे वाघ कधीच स्थिरावला नाही.
तज्ज्ञांच्या संशोधनात प्रकल्पातील कॉरिडॉर ब्रेक झाल्याने वाघाचे स्थलांतर थांबल्याचे पुढे आले.काही दिवसांपूर्वी कौंडर ताम्हाणे येथे वाघ आढळून आला होता. आता शिरगाव आणि तळसर येथे वाघाच्या पायाचे ठसे आढळून आले आहेत.