IPL लिलावातील १३ वर्षीय करोडती Vaibhav Suryavanshi च्या नावे आणखी एक विक्रम; बनला सर्वात युवा भारतीय...
esakal December 22, 2024 08:45 PM

Vaibhav Suryavanshi Set New Record : वैभव सुर्यवंशी (१३ वर्षीय) आयपीएलमध्ये पदार्पण करणारा सर्वात युवा खेळाडू ठरला. त्याला राजस्थान रॉयल्स संघाने १ कोटी १० लाखात करारबद्ध केले. १९ वर्षांखालील क्रिकेटमध्ये शतक ठोकणारा सर्वात युवा फलंदाज ठरला. त्याचबरोबर तो प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा चौथा युवा भारतीय आहे आणि आता देशांतर्गत क्रिकेटमध्ये सुर्यांशने आणखी एक विक्रम रचला आहे.

सुर्यांश सध्या बिहार संघाकडून विजय हजारे ट्रॉफी स्पर्धा खेळत आहे. त्याने काल मध्यप्रदेशविरूद्ध स्पर्धेतील पहिला सामना खेळला आणि लिस्ट ए क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा सर्वात युवा भारतीय बनण्याचा मान त्याने मिळवला. १३ वर्ष व २६९ दिवासांच्या सुर्यांशने अली अकबरचा विक्रम मोडला आहे. अली अकबरने ( १४ वर्ष ५१ दिवसाचा) वयाचा असताना १९९९/ २००० हंगामात लिस्ट ए क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

डावखुरा फलंदाज सर्यांशने आपल्या लिस्ट ए क्रिकेटची सुरूवात चौकाराने केली. पण त्याच्या पुढच्याच चेंडूवर तो झेलबाद झाला आणि माघारी परतला. बिहारचा डाव ४६.४ षटकांत १९६ धावांवर संपुष्टात आला. बिहारच्या बिपीन सौरभने सामन्यात अर्धशतक झळकावले. तर कर्णधार एस गानीचे अर्धशतक २ धावांनी हुकले.

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचलेल्या मध्यप्रदेशने हे लक्ष्य अवघ्या २५.१ षटकात पूर्ण केले. ज्यामध्ये सलामीवीर हर्ष गवळीने ११ चौकार व एका षटकाराच्या मदतीने ६३ चेंडूत ८३ धावांची खेळी केली. तर कर्णधार रजत पाटीदारने ४ चौकार व ३ षटाकारांच्या मदतीने ३३ चेंडूत ५५ धावा उभारल्या.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.