Music Therapy Benefits: बजाते रहो... मानसिक आरोग्यासाठी अत्यंत प्रभावी आहे ही थेरपी
Times Now Marathi December 23, 2024 05:45 AM

Benefits of Music Therapy: म्युझिक थेरपी मानसिक आरोग्यासाठी अत्यंत प्रभावी आहे. ती ताण कमी करण्यास, मूड सुधारण्यास, चिंतेला आराम देण्यास, आणि भावनिक पातळीवर मदत करण्यास प्रभावी ठरते. संगीताच्या उपचारांचा उपयोग नियमितपणे केल्यास मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होऊ शकते.

आजकाल धकाधकीच्या जीवनात सर्वकाही इतकं वेगवान झालं आहे की, त्यामुळे कोणालाही मोकळा श्वास घेण्यास सवड नाही. थांबला तो संपला या सूत्राखाली जो तो धावत आहे. मात्र, या दरम्यान येणारे चढ आणि उतार माणसाला अनेकदा निराश करतात. ही निराशा कालांतराने वाढत जाते,आणि त्याचा थेट परिणाम मानसिकतेवर होतो. त्यामुळे आजच्या स्पर्धात्मक युगात तग धरून राहण्यासाठी शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्यदेखील मजबूत असणे गरजेचे आहे. आणि त्यासाठीच वेगवेगळ्या थेरपी आज अवलंबल्या जातात. ज्यामधील एक थेरपी म्हणजे संगीत. ज्याला Music Therpy असे देखील म्हंटले जाते. सामान्यतः अनेक लोकं आपल्या दैनंदिन जीवनात संगीत ऐकतात, गाणे गुणगुणतात. पण हा एक थेरपीचा भाग असू शकतो याबद्दल आजही अनेक लोकं अनभिज्ञ आहेत. त्यामुळे आज आपण म्युझिक थेरपी किती मोठा कमाल करून दाखवू शकते याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. जेणेकरून नैराश्याचे शिकार झालेल्या तुमच्या जवळच्या लोकांना तुम्ही त्यापासून बाहेर काढण्यास आणि सामान्य आरोग्य जगण्यास त्यांना मदत करू शकाल.

म्युझिक थेरपी मानसिक आरोग्यासाठी कशी प्रभावी आहे?
म्युझिक थेरपी मानसिक आरोग्यासाठी अत्यंत प्रभावी आहे. म्युझिक थेरपी ही एक प्रकारची उपचार पद्धत आहे, ज्यात संगीताचा वापर करून मानसिक, भावनिक, आणि शारीरिक आरोग्य सुधारले जाऊ शकते. यामध्ये संगीत ऐकणे, गाणी गाणे किंवा वाद्य वाजवणे तसेच संगीताद्वारे आपल्या भावना व्यक्त करणे, विविध शारीरिक व्यायाम करणे या सर्वांचा समावेश होतो.

म्युझिक थेरपीचे फायदे
आपल्यापैकी असा कोणताच व्यक्ति शोधून सापडणार नाही ज्याला संगीताची आवड नसेल. जो कोणी अरसिक असेल त्याने किमान त्याच्या आयुष्यात काही दोन तीन गाणी तरी ऐकली किंवा गुणगुणली असतीलच. मूड चांगला करण्यासाठी म्युझिक थेरपी खूप फायदेशीर असून, मनातील अव्यक्त भावना देखील म्युझिक थेरपीद्वारे मांडता येऊ शकतात.

मानसिक ताण कमी करतो
म्युझिक थेरपी ताण कमी करण्यात खूप प्रभावी ठरते. संगीत ऐकणे किंवा गाणे गुणगुणणे यामुळे शरीरातील कोर्टिसोल (Stress hormones) च्या पातळीला कमी करण्यास मदत होऊ शकते. यामुळे तणाव आणि चिंता कमी होते.

मन: शांती आणि आराम
शांत, हलके संगीत ऐकणे मानसिक शांती साधण्यास मदत करते. हे संगीत ध्यानासारखे कार्य करते, यामुळे चित्त एकाग्र होते आणि आपले विचार शांत होतात. जेणेकरून मानसिक ताण दूर होतो.

भावना व्यक्त करण्याचा मार्ग
संगीतामुळे आपल्या भावनांना व्यक्त करण्यास मदत मिळते. गाणं किंवा वाद्य वाजवताना व्यक्ती आपल्या आंतरिक भावना व्यक्त करू शकतो, ज्यामुळे मानसिक पातळीवर एक मोकळेपणाची भावना निर्माण होते.

चिंता आणि नैराश्यावर उपचार
डिप्रेशन किंवा अनिद्रतेसारख्या मानसिक आरोग्याच्या समस्येवर म्युझिक थेरपीने सकारात्मक प्रभाव पाडला जाऊ शकतो. गोड गाणी आणि उत्साही संगीत आपल्या मूडला उत्तेजन देतात आणि नकारात्मक विचार कमी होतात.

मूड चांगला करतो
संगीत आपल्या मूडवर प्रभाव टाकू शकते. त्यातील लय, रिदम आणि टोन या आपल्या भावनांवर प्रभाव टाकतात. उदाहरणार्थ, वेगवेगळी प्रकारचे संगीत आपल्या भावना व्यवस्थापित करू शकतात. जसे की, डार्क मूडसाठी भावुक संगीत ऐकले जाते, तर उत्साही मूडसाठी ऊर्जा देणारे संगीत ऐकले जाते.

सामाजिक संबंध सुधारते
म्युझिक थेरपी समूहांमध्येही केली जाऊ शकते, जिथे एकत्र संगीत ऐकून किंवा गाणं गाऊन समूहातील सदस्य एकमेकांशी संवाद साधतात. हे सामाजिक बंध मजबूत करण्यात मदत करते आणि एकटेपणाच्या भावना कमी होतात.

स्मरणशक्तीला उत्तेजन मिळते
संगीत आपल्या स्मरणशक्तीला उत्तेजन देते. अनेक अभ्यासांनी दाखवले आहे की, खास करून अल्झायमर किंवा डिमेंशियाच्या रुग्णांमध्ये संगीताने मानसिक कार्यक्षमता सुधारली आहे. संगीत ऐकणे आणि गाणं गाणे रुग्णांच्या स्मरणशक्तीला उत्तेजन देतात.

हॉर्मोनल संतुलन
संगीत शारीरिक पातळीवरही प्रभाव टाकू शकते. संगीत ऐकल्यामुळे शरीरातील हॉर्मोनल संतुलन साधता येऊ शकते, जसे की "ऑक्सिटोसिन" आणि "डोपामाइन" सारखे हॉर्मोन रिलीज होतात, जे आनंद आणि समाधानाची भावना वाढवतात.

म्युझिक थेरपी कशाप्रकारे केली जाते?म्युझिक थेरपीमध्ये वेगवेगळ्या सांगीतिक पर्यायांचा वापर केला जातो. ज्यात संगीत ऐकण्यापासून ते नृत्य करण्यापर्यंत सर्व गोष्टींचा समावेश होतो.

  • गाणी ऐकणे: साधे आणि सौम्य संगीत ऐकणे, ज्यात तुमच्या आवडीचे किंवा मन शांत करणाऱ्या संगीताचा समावेश असतो.
  • गाणी गाणे: काही लोकांना गाणी गायला आवडते. गाणी गाऊन अनेकांचे मन शांत होते. यामुळे मानसिक आणि भावनिक व्यक्तिमत्व व्यक्त होण्यास मदत होते.
  • वाद्य वाजवणे: काही लोक वाद्य वाजवून किंवा संगीतांची निर्मिती करून आपल्या अव्यक्त भावना बाहेर काढतात. ज्यामदये पियानो, गिटार, किंवा ड्रम्स यासारखी साधने वापरली जातात.
  • नृत्य करणे: गायन आणि नृत्य हा देखील म्युझिक थेरपीचा एक भाग आहे. यामुळे शारीरिक व्यायाम तर होतोच सोबत मन देखील रीफ्रेश होऊन जाते. शारीरिक हालचाल आणि संगीत एकत्र केल्यास सकारात्मक मानसिक आणि शारीरिक परिणाम होऊ शकतात.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.